Thursday, 30 September 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक - ३० सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशाला आरोग्य क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपाय योजले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

·      सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार - महसूल राज्य मंत्री अब्दूल सत्तार यांची माहिती.

·      नांदेड जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

आणि

·      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची विविध पक्ष, संघटनांची मागणी.

****

स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत लोककल्याणासाठी आणि देशाला आरोग्य क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक उपाय योजले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर पेट्रो केमिकल तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात तीन टप्प्यांत एकशे सत्तावन्न नवी वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राकडे दिलेलं लक्ष आणि सुरु करण्यात आलेल्या योजना यांचे परिणाम आता दिसू लागले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

****

सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते आज नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यात वीस लाख हेक्टर वरील पिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल, ती सर्व मदत सरकार करणार आहे. काही पैसे केंद्र सरकार कडून येणं बाकी आहेत, पन्नास हजार कोटी त्याच्यामधील ३२ हजार कोटी रुपये हे जीएसटीचे आहेत. आणि हे एकदा राज्यात आले तर निश्चित किंवा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जही घेण्याची परिस्थिती आली तर कर्जही घेवू परंतू हवालदिल झालेला शेतकरी याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने नेते निर्णय घेतील आणि किती हेक्टरने द्यायचे आहे नुकसान त्याची घोषणा येणाऱ्या कॅबिनेट पर्यंत होईल.

****

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात कुठेही पावसाची नोंद झाली नसली तरी जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर आदी धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग शहरातून वाहणार असल्यानं जुन्या पुलावरलं पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शहरातल्या नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प आणि निम्न मानार प्रकल्पही १०० टक्के भरलं असून तिथं अतिवृष्टी झाल्यानं पाणी नदीत सोडण्यात येत आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी केलं आहे.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर या भागाचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. मोर्चाचे प्रदेश महामंत्री जालिंदर शेंडगे यांच्यासह एका शिष्टमंडळानं याबाबतचं निवेदन आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर केलं.

****

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान, शासनातर्फे राज्यातल्या प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद इथं जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी केली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे नुकसानभरपाई संबंधी योजनांच्या लाभांपासून वंचित राहू शकतो, अशी शक्यताही त्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.

****

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या सुमारे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या दोन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचं काम महसूल आणि कृषी विभागानं सुरू केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भास्कर रणदिवे यांनी दिली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाची सर्व दारं आज दुपारी पूर्णतः बंद करण्यात आली असून त्यामुळे पूर्णा नदीस आलेला पूर हळूहळू ओसरेल असं चित्र दिसत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून येलदरी जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु होती मात्र आज सकाळपासून खडकपूर्णेतून पाण्याची आवक कमी झाल्यानंतर पाटबंधारे खात्यानं सर्व दरवाजे बंद केलेत.केवळ विद्युत प्रकल्पास शहात्तर पूर्णांक शेहेचाळीस घनफूट प्रतीसेंकद वेगानं पाणी सोडण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//********//

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...