आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ सप्टेंबर २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. कोरोनाविरोधातली लढाई,
पर्यावरण बदल आणि हिंद प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये
सविस्तर चर्चा झाली. जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध
असणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. पुढच्या आठवड्यात महात्मा गांधी
जयंती आहे, त्याचा उल्लेख करत बायडन यांनी, सर्व जगासमोर गांधीजींच्या विचारांचा आदर्श
असल्याचं सांगितलं.
****
२०२०-२१ या आर्थिक
वर्षात, या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत पाच लाख ७० हजार ५६८ कोटी रुपये इतकं कर संकलन
झालं असल्याचं, केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे. गेल्या
वर्षीच्या तुलनेत कर संकलनातील ही वाढ ७४ पुर्णांक चार शतांश टक्के आहे.
****
केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये ७६१ उमेदवारांची
नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. बिहारचा शुभम कुमार देशांत प्रथम, भोपाळची जागृती
अवस्थी द्वितीय तर अंकिता जैन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. देशात ३६वा क्रमांक
प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यातून प्रथम आली आहे. तर नगरच्या विनायक नरवाडेनं देशात
३७वा, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
****
राज्यातल्या
आगामी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीमध्ये इतर मागास प्रवर्ग
- ओबीसी आरक्षण लागू होणार नसल्याचं निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं
अध्यादेश काढून ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर केला, मात्र निवडणुकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया
त्याआधीच पूर्ण झाली असल्यानं, या निवडणुकीत आरक्षण लागू होणार नाही, असं आयोगानं सांगितलं
आहे.
****
जालना जिल्ह्यात
आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास बहुतांश भागात हलका ते
मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या चांधई एक्को इथं घराची भिंत कोसळून
एका ४४ वर्षीय व्यक्तीसह दोन शेळ्यांचा दबून मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात
काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment