Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 September 2021
Time 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा
करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही,
साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या
तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
येत्या सात ऑक्टोबरपासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं, तर चार ऑक्टोबरपासून
शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे आरोग्य विभागाची गट क आणि
गट ड संवर्गाची आजपासूनची लेखी परिक्षा पुढे ढकलली
·
पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची राज्य
सरकारची विनंती राज्य निवडणूक आयोगानं फेटाळली
·
४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आज औरंगाबादमध्ये उद्घाटन
आणि
·
राज्यात तीन हजार, २८६ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा
मृत्यू तर १२२ बाधित
येत्या सात ऑक्टोबरपासून
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं, तर चार ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं
काल घेतला.
नवरात्रीच्या
पहिल्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोबर पासून राज्यातली सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आरोग्याचे
नियम पाळून खुली करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. प्रार्थनास्थळं
खुली होत असून सर्वांनी आरोग्याच्या नियमांचं पालन करत, मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा
वापर केला पाहिजे, असंही त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. सध्या कोरोना विषाणू
संसर्गाच्या रुग्ण संख्येमध्ये घट होत असली तरी आपल्याला अधिक सावध राहावं लागेल, असं
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात चार
ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी
दिली आहे.
चार ऑक्टोबरला आम्ही शाळा सुरु करत आहोत,
ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामधल्या पाचवी ते बारावी, आणि शहरी भागामधल्या आठवी ते बारावी.
या शाळा सुरु करत असताना आम्ही टास्क फोर्सशी चर्चा केली, मधल्या काळामध्ये आम्ही आरोग्य
विभागाशी चर्चा केली, आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा याला अनुमती मिळालेली आहे,
आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी सुद्धा आज या निर्णयाला अनुमती दिलेली आहे,
आणि त्याप्रमाणे आज महाराष्ट्रामधल्या शाळा सुरु करण्यासंदर्भातला निर्णय हा शालेय
शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि इतर मंत्रिमंडळाच्या
माध्यमातून घेण्यासंदर्भामधला निर्णय झाला आहे
कृती दल आणि
राज्य सरकारनं तयार केलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार
आहे. शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी राहणार नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच पालकांची संमती आणि शाळेत उपस्थितीची सक्ती नसल्याचं गायकवाड म्हणाल्या. शिक्षक
आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या
असणं आवश्यक आहे.
****
राज्याच्या आरोग्य
विभागाची गट क आणि गट ड संवर्गाची लेखी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. लेखी परिक्षा घेण्याचं काम न्यासा या संस्थेला देण्यात
आलं होतं, मात्र संस्थेनं परिक्षेच्या तयारीसाठी आणखी वेळ हवा असल्याचं सांगत ऐनवेळी
परिक्षेला नकार दिल्याचं, टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मला त्याचं मनस्वी दु:ख आहे, की याला आपल्याला थोडं
पोस्टपोण्ड करावं लागलं आहे, परंतू लवकरात लवकर म्हणजे एखाद्या आठवड्याच्या भरात, दहा
दिवसांच्या आत कुठल्याही परिस्थितीत नवीन तारीख आम्ही देऊ. ही परिक्षा निश्चित प्रकारे
घेतली जाईल. परंतू मला यानिमित्ताने पुन्हा एवढंच सांगायचंय की आरोग्य यंत्रणा सक्षम
करणे, हाच प्रामाणिक हेतू ठेऊन मी याठिकाणी या जागा भरुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील
आहे, होतो आणि राहीन. त्यामुळे जो काही मानसिक त्रास आपणा सर्वांना झाला असेल, त्याबद्दल
पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.
****
राज्यातल्या
आगामी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची
विनंती राज्य निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याचं, या निवडणुका पुढे ढकलणं शक्य नसल्याचं
आयोगानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे न्यायालयानं जर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
दिला, तर तो बदलता येईल, असंही आयोगानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद इथं
आयोजित ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण
नाट्यगृहात होणाऱ्या या समारंभाला आमदार सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे
अध्यक्ष म्हणून साहित्यिक बाबू बिरादार यांची निवड झाली आहे. दोन दिवसीय संमेलनात निमंत्रितांचं
कविसंमेलन, विविध विषयावर परिसंवाद, नाट्यप्रयोग, कथाकथन, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून दिला
जाईल, अशी ग्वाही, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. परभणीत ते काल
वार्ताहरांशी बोलत होते. पूर्णा नदीवर चार ठिकाणी बंधारे उभारण्यास पाटबंधारे खात्यानं
मंजुरी दिली असून, त्यापैकी तीन बंधारे परभणी जिल्ह्यात, आणि एक बंधारा वसमत तालुक्यात
असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे
आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना, त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना
दिल्या.
****
राज्यात काल
तीन हजार, २८६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ६५ लाख, ३७ हजार, ८४३ झाली आहे. काल ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ७७६
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ९३३ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ५७ हजार १२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३८
हजार, ४९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये बीड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
बीड जिल्ह्यात
काल ५१ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ४०, लातूर १५, औरंगाबाद १२, जालना तीन,
तर परभणी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग
झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
शेती पूरक उद्योगातून
बायोगॅस, बायोडिझेल, इथेनॉल यासारखे प्रक्रिया उद्योग उभारल्यानं, उस्मानाबाद जिल्ह्याची
निर्यातक्षम जिल्हा अशी नवी ओळख तयार होऊ शकते, असं मत कृषिरत्न भैरवनाथ ठोंबरे यांनी
व्यक्त केलं आहे. उस्मानाबाद इथं आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित निर्यातदार मार्गदर्शन
मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले…
नॅचरल शुगरने गेल्या तीन वर्षामध्ये १४०
कोटी रुपयांची साखर निर्यात करुन या देशाला दोन कोटीचं परकीय चलन मिळवून दिलं. आणि
त्यामुळे या जिल्ह्याची ओळख आता अतिमागासाकडून निर्यातक्षम जिल्हा इकडे चालू आहे. आणि
हे करण्याचं काम आमचा तरुणवर्ग निश्चितपणे घेईल आणि मुख्यत: कृषी मालातून जे काही अन्न
आणि ऊर्जेची गरज आहे ती आम्ही या ठिकाणी निश्चितपणे भागवू. आणि त्यामाध्यमातून संपूर्ण
भारत हा जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न एपीजे अब्दुल कलामांचं आपल्याला साकार करता
येईल.
जिल्हा उद्योग
केंद्रानं नवउद्योजकांना सोयी सवलती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी तसंच उत्पादन
आणि निर्यात वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज ठोंबरे
यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर इथंही
काल निर्यातदारांची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यावेळी
मार्गदर्शन केलं. उद्योजकांच्या समस्यांबद्दल जिल्हा प्रशासनामार्फत लघु मध्यम उद्योग
तथा विकास आयुक्त यांच्याकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करण्याचं
त्यांनी आश्वासन दिल.
****
औरंगाबाद इथंही
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत निर्यातदारांचं संमेलन काल पार पडलं.
जिल्ह्यातल्या उद्योजकांना निर्यातवृद्धीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील
असल्याचं, जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
****
प्रादेशिक परिवहन
प्राधिकरणानं ठरवून दिलेल्या भाडे दर आणि मीटर प्रमाणेच ऑटो रिक्षाधारकांनी भाडे आकारणी
करावी, असं आवाहन, औरंगाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी स.प्र. मैत्रेवार यांनी केलं
आहे. ऑटोरिक्षांवर कोणत्याही प्रकारे विना परवानगी जाहिरात प्रसिद्ध करुन नये, प्रवासी
वाहतूक करतांना चालकानं गणवेश परिधान करावा, तसंच सर्व ऑटोरिक्षा धारकांनी क्युआर कोड
स्टीकर्स रिक्षाच्या दर्शनी भागात लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
****
आयटक प्रणित
महाराष्ट्र अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी.
त्यांना देण्यात आलेल्या निकृष्ट मोबाईल विरोधात. काल औरंगाबाद जिल्हा परिषदेवर मोबाईल
अंत्ययात्रा काढली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल बंद पडलेल्या कंपनीचे
आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत, ते वारंवार खराब होतात, हे मोबाईल परत करण्याचे राज्यभर
आंदोलन सुरु असतांना, औरंगाबाद जिल्हा परिषदेनं मोबाईल परत घेण्यास नकार दिल्यानं,
ही अंत्ययात्रा काढल्याचं आयटकचे राज्य उपाध्यक्ष राम बाहेती यांनी सांगितलं.
****
नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्यावतीनं घेण्यात येत असलेल्या
एम. ए. प्रथम, द्वितीय आणि एम. कॉम. प्रथम वर्षाची उन्हाळी परिक्षा पुढे ढकलण्यात आली
आहे. ही परिक्षा आज होणार होती, ती परवा २७ सप्टेंबरला होईल, अशी माहिती दूरशिक्षण
विभागाचे संचालक डॉ रमजान मुलानी यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
वाशीमध्ये प्रभू माळी यांच्या शेतात काल अचानक आकाशातून मोठा दगड कोसळला. हा दगड उस्मानाबाद
इथल्या भूवैज्ञानिक कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, हा उल्कापातचा प्रकार
असल्याचं भूवैज्ञानिकांनी मत व्यक्त केलं आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या
मांजरा धरणाचे १२ दरवाजे काल उघडण्यात आले. यामुळे नदीला पूर आला असून, नदीकाठावरील
गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात
पालमसह पेठशिवणी परिसरात काल सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात
सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं
आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, त्यांनी नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांमध्ये
संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर, तसंच कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधींकडे
लेखी स्वरुपात द्यावी, असं आवाहन, जिल्हा कृषी
अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केलं आहे.
****
हवामान
मराठवाड्यात
उद्या औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment