Wednesday, 29 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे १२ दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या उमरखेड मधल्या मार्लेगाव पुलावर पाणी आल्यामुळे या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुरस्थितीमुळे नागपूर - बोरी -तूळजापूर हा महामार्ग बंद झाला असून, पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनं थांबवण्यात आली आहे. इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे यवतमाळच्या पुसद, उमरखेड आणि महागाव, हिंगोलीच्या कळमनुरी आणि नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या देवजना परिसरात कयाधू नदीच्या महापुरानं गेल्या ४८ तासांपासून शेतांना वेढा घातला आहे. शेतात आखाड्यावर अडकलेल्या नागरिकांना आज सकाळी बाहेर काढण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

****

निवृत्तीवेतन धारकाच्या मानसिक किंवा शारीरिक दिव्यांग असलेल्या मुलांना किंवा भावंडांना, कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्यासाठी उत्पन्नाचे निकष वाढवण्याचा निर्णय, संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे. कौटुंबिक निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त अन्य स्त्रोतांमधून मिळणारं एकंदर उत्पन्न, सामान्य दराप्रमाणे कौटुंबिक निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल, तर अशा व्यक्ती निवृत्तीवेतनासाठी आयुष्यभर पात्र असतील.

****

देशात पूर, तसंच थंडीच्या आणि उष्णतेच्या लाटेसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे एकही मृत्यू होणार नाही यासाठी सरकार प्राधान्यानं प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. देशातल्या ३५० जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा अंतर्गत, आपदा मित्र स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा दिली जाईल असं शहा यांनी सांगितलं.

****

No comments: