Saturday, 25 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य सरकार साहित्यिक चळवळीला नेहमीच सहकार्य करत आहे, आणि यापुढेही करत राहील, अशी ग्वाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष असेल, पण साहित्य निर्मितीचा अनुशेष नाही, असं ते म्हणाले. मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी शासनानं समिती स्थापन केली आहे, पैठण इथं संतपीठही लवकरच पूर्णवेळ कार्यान्वित होत असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार हे आहेत. यावेळी आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषद विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन संमेलनाचे मावळते अध्यक्ष ॠषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. संमेलनात आज निमंत्रितांचं कविसंमेलन आणि परिसंवाद होणार आहेत.

****

राज्यांना दिल्या जाणाऱ्या केंद्राच्या विशेष सहाय्यअंतर्गत २०२१-२२ करता भांडवली खर्चासाठी महाराष्ट्राला २५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या संसाधनांमध्ये वाढ करण्यासाठी ही रक्कम ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाच्या रूपात दिली जात आहे.

****

देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८४ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ७१ लाख चार हजार ५१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८४ कोटी ८९ लाख २९ हजार १६० मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २९ हजार ६१६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३६ लाख २४ हजार ४१९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४६ हजार ६५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २८ हजार ४६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख एक हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल सिकंदराबाद इथल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्यालयास देऊन आढावा बैठक घेतली. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायाभूत सुविधेमध्ये वाढ करण्याबरोबरच, प्रवासी सुविधेमध्ये देखील वाढ करण्याच्या कार्यात वेग साधण्याचं आवाहन, दानवे यांनी केलं. औरंगाबाद, जालना यासारख्या शहरांतून माल वाहतूक वाढवण्याकरता विविध उपाय योजना कराव्यात, मालवाहतुकीत वाढ होण्यासाठी विविध कंपन्याची भेट घेऊन त्यांना रेल्वेमधून मालवाहतूक करण्यास प्रोत्साहित करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या. दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर वापरत असलेल्या सुरक्षा कॅमेरा यंत्रणेचं दानवे यांनी कौतुक केलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित नेहरू युवा केंद्राची नांदेड शाखा आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि खेळ मंत्रालयाच्या वतीनं आज नांदेड इथं फिट इंडिया रन घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. यावेळी बोलताना शेवाळे यांनी, देशातल्या प्रत्येकाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचं सांगितले. शंभरहून अधिक युवक युवती या दौडमध्ये सहभागी झाले होते.

 

मुंबई विद्यापीठातही आज फिट इंडिया फ्रिडम रनचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला.

 

नंदुरबार इथंही फ्रिडम रन घेण्यात आली. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयापासुन सुरु झालेल्या या दौडला जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात येत असून, आज जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींमध्ये महाश्रमदान मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक जागांची स्वच्छता, वृक्षलागवड, स्वचछतेची शपथ अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात आले.

****

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या नागेशवाडी इथला वीज पुरवठा वीज बिल न भरल्यानं महावितरण कंपनीने आठ दिवसापासून खंडित केला आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज औरंगाबाद - नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे दीड तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

जालना शहरासह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला मोठा पूर आला असून, शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे.

****

No comments: