Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2021
Time 1.00 to 1.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात
सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन
विस्कळीत झालं आहे.
नांदेड
जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीची नोंद झाली. अर्धापूर तालुक्यात रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे
उमा नदीला महापूर आला आहे. यामुळे बामणी, शेलगाव, पिंपळगाव इथल्या शेतकऱ्यांचे कापणीस
आलेले सोयाबिन पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. पहाटेपासून शेलगाव, बामणी या गावांचा संपर्क
तुटला आहे.
बीड जिल्ह्यात
आवरगावचा पूल वाहून गेल्यानं धारूर - आडस रस्ता बंद झाला आहे. परळी ते बीड रस्त्यावर
पांगरी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं, पाचशे वाहनं अडकली आहेत. मांडवा पुलावरुनही
पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबादकडे येणारा रस्ता बंद झाला आहे.
परभणी
जिल्ह्यातही काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. सोनपेठ तालुक्यातल्या धारडिघोळ गावाला
पाण्याचा वेढा पडला आहे. वाण नदीला पूर आला असून, नागापूरकर धरणातूनही पाण्याचा विसर्ग
सुरु आहे.
उस्मानाबाद
जिल्ह्यात ३१ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक
बचावकार्य करत आहे. मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव धरण पूर्ण भरल्यामुळे पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदी रात्री पूर आल्यामुळे
तेर, इरला, रामवाडी, दाऊतपूर या चार गावातही पाणी घुसलं आहे.
कळंब तालुक्यातल्या
वाकडी इथं सतरा जण, तर सौंदना आंबा इथं आठ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तेरणा नदीला
आलेल्या पुराच्या पाण्यामुळे दाऊतपूर इथंही एका कुटुंबातले सहा नागरिक अद्यापही पुराच्या
पाण्यात अडकले आहेत, तर तेर इथं तेरणा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या चार नागरिकांना
यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. इर्ला इथं दीडशे नागरिकांचं स्थलांतर जिल्हा
परिषद शाळेत करण्यात आलं असून, रामवाडी इथं १२५ लोकांना ग्रामपंचायतीच्या सभागृहात
हलवण्यात आलं आहे.
हिंगोली
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून, कयाधु नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. कळमनुरी तालुक्यातला
उमरा फाटा ते बोल्डा महामार्ग, तसंच हारवाडी ते नांदापूर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
नांदापूर, सोडेगाव, हारवाडी, कंजारा, वसई, पूर आदी गावांचा संपर्क तुटला आहे.
जालना
जिल्ह्यातल्या सर्वच भागांत आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर
आला असून, अनेक भागातली पिकं पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातल्या १२ मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली आहे.
औरंगाबाद
शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे
अंजना नदीला पूर आला आहे. कन्नड तालुक्यातल्या पिशोर इथे रामेश्वर वस्तीवर जाण्यासाठी
जीवघेणा एक दोरखंड बांधण्यात आलं आहे. नागरिकांनी अशा धोकादायक प्रकार थांबण्याचं आवाहन
प्रशासनानं केलं आहे. सिल्लोड तालुक्यातल्या बोरगाव बाजार परिसरात रात्रीपासून जोरदार
पाऊस सुरु आहे.
नाशिक
शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू आहे. गंगापूर आणि काही धरणांमधून विसर्ग करण्यात
येत आहे. आज सकाळपासून गंगापूर धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं, विसर्ग सुरू
आहे.
यवतमाळ
जिल्ह्यात उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात नागपूर डेपोची
एसटी बस वाहून गेली. बसमधे चार ते सहा प्रवासी होते. स्थानिक नागरिक आणि तालुका टीमच्या
सहाय्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. दोघांना वाचवण्यात आलं असून,
एकाचा मृतदेह सापडला आहे.
****
भारतीय
बाजरीला आंतरराष्ट्रीय नेण्यासाठी राज्यांनी कृती दलाची स्थापना करावी, असे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. शेतीपिकांच्या ३५ वाणांचं दूरदृश्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण केल्यानंतर ते आज बोलत होते. हवामान बदल आणि कुपोषण
या समस्यांचा सामना करण्याच्या दृष्टीनं ही वाणं भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित
केली आहेत. विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून बाजरी आणि अन्य धान्यांना विकसित करणं
गरजेचं असून, यामुळे देशातल्या विविध भागात गरजेनुसार या पिकाचं उत्पादन घेता येईल,
असं पंतप्रधान म्हणाले. आधुनिक कृषी मशिन आणि उपकरणांना प्रोत्सान देण्याचे फायदे आज
दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी पंतप्रधानांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या
शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
शेतकऱ्यांना
दिलासा देण्याचं राज्य सरकारचं धोरण असून, बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय
देण्याचं काम राज्याचं मंत्रीमंडळ करत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यांत
आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ते काल बोलत होते. अतिवृष्टीने फुटलेल्या
तलावांच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्यात येईल, जेणेकरून या भागातल्या शेतकऱ्यास त्याचा
फायदा होईल, असं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment