Friday, 24 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

सेवा योजनेमध्ये कार्यरत असलेल्या युवकांनी देशाच्या विकासासाठी क्रियाशील व्हावं, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०१९-२० साठीच्या पुरस्कारांचं वितरण आज सकाळी राष्ट्रपतींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी यांच्या आदर्शांपासून एनएसएसच्या वैचारिक अभिमुखतेनं प्रेरणा घेतली असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर आणि केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री निसीत प्रामाणिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुणे इथल्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयातला विद्यार्थी मनोज गुंजाळ याला, तर अकोला इथल्या श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी सपना बाबर हिला, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या ग्रंथालयाचं ५४ कोटी रुपयांचं अनुदान अर्थ खात्याकडून मंजूर करुन लवकरात लवकर वितरीत करण्याची मागणी, राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातल्या १२ हजार १४९ ग्रंथालयामधल्या २१ हजार ६१५ कर्मचाऱ्यांचं सहा महिन्याचं वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं, बेडगे यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या उद्योजकांना निर्यातवृद्धीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आणि राजाच्या उद्योग महासंचालनालयाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित निर्यातदारांच्या संमेलनाचं उद्घाटन आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा आपली विविध उत्पादनं परदेशी बाजारपेठेत निर्यात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करणारे उत्पादन निर्मितीचा ध्यास उद्योजकांनी धरावा, असं आवाहन त्यांनी केलं. उद्योजकांनी भरवलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं. जिल्ह्यातले जवळपास ७० उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाल्याचं आयोजकांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या गलथान कारभाराविरुध्द रिपब्लिकन सेनेनं काल जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला. रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध नसतात, रक्ताचा तुटवडा, शस्त्रक्रियेस लागणारा वेळ, आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली नाही, रुग्णांचा औषधी आणि इतर साहित्य बाहेरुन आणावं लागत असल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांना प्रश्न विचारण्यात आले. येत्या दोन दिवसांत रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेनं दिला आहे.

****

यवतमाळ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईसापूर धरण पूर्णतः भरलं आहे. धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून, ५३२ पूर्णांक ९० घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे यवतमाळच्या पुसद, उमरखेड, महागाव, हिंगोलीच्या कळमनुरी आणि नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांतल्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा परंतू सोयाबीन पिकाचं नुकसान होईल असा पाऊस मागील चार दिवसांपासून सुरु आहे.

****

औरंगाबाद इथं ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्यासह, आमदार सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय संमेलनात निमंत्रितांचं कविसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, नाट्यप्रयोग, कथाकथन, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. परवा २६ तारखेला संमेलनाचा समारोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या सर्व ठिकाणी उद्या शनिवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पूर्व प्रकरणं, धनादेश अनादर, दिवाणी दावे, बँकाची कर्ज प्रकरणं, कौटुंबिक कलह प्रकरणासहीत इतर अनेक प्रकरणं या न्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आली असल्याचं, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिक्षकांनी सांगितलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...