आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ सप्टेंबर २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, आज ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट
घेणार आहेत. तसंच क्वाड गटाच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. अमेरिका दौऱ्याच्या कालच्या
पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी, अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
स्कॉट मॉरीसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांची स्वतंत्रपणे भेट घेत, द्विपक्षीय
चर्चा केली. तसंच, भारताच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या पाच क्षेत्रांमधल्या आघाडीच्या
कंपन्याच्या प्रमुखांशीही त्यांनी चर्चा केली.
****
कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेत भारतानं ८४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६५ लाखाहून
अधिक नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ८४ कोटी आठ लाख २१ हजार
मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
वायू प्रदूषण
आणि हवेची गुणवत्ता या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं सुधारित मार्गदर्शक सूचना जारी
केल्या. या सूचनांमुळे देशांना वायू प्रदूषणामुळे होणारे मृत्यू टाळण्याची प्रेरणा
मिळेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ह्या सूचना विशेषत: इंधनाच्या वापरामुळे
होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
****
स्थानिक स्वराज्य
संस्थांमधलं इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र
सरकारनं मागितलेली लोकसंख्येची जातीनिहाय संकलित केलेली माहिती अर्थात इम्पेरिकल डाटा
देण्यास केंद्र सरकारनं नकार दिला आहे. प्रशासकीय अडथळे आणि मूळ माहितीतल्या असंख्य
त्रुटी यामुळे हा डाटा राज्यांना देता येणार नाही, असं केंद्रानं काल सर्वोच्च न्यायालयात
सादर केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केलं.
****
क्रांतिसिंह
नाना पाटील यांची कन्या आणि माजी आमदार भगवान बाप्पा पाटील यांची पत्नी क्रांतिवीरांगणा
हौसाताई पाटील, यांचं काल सातारा जिल्ह्यात कराडमधल्या रुग्णालयात निधन झालं, त्या
शहाण्णव वर्षांच्या होत्या. हौसाताई पाटील यांनी क्रांतिसिंहांच्या बरोबरीनं स्वातंत्र्य
चळवळीतल्या भूमिगत कारवायांमध्ये मुख्य भूमिका बजावली. त्या इंग्रजांची माहिती गोळा
करून भूमिगत क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असत.
****
No comments:
Post a Comment