Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2021
Time 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा
करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही,
साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या
तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
राज्यात आता, २२ ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू करण्यासही परवानगी
**
समृध्दी महामार्ग नांदेडला जोडण्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया
येत्या मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण होईल- सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
**
४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रारंभ
**
राज्यात तीन हजार, २७६ नवे कोविड बाधित रुग्ण;
मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ९२ बाधित
आणि
**
जालना जिल्ह्यात सर्वत्र दमदार तर परभणी
जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात संततधार पाऊस
****
राज्यात शाळा, धार्मिक स्थळांपाठोपाठ
आता, २२ ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृहे
सुरू करण्यासही परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी घोषित केलं आहे. कृती दल सदस्य खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त
मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास तसंच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल
कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे,
आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी काल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी
ही घोषणा केली.
आरोग्याचे नियम पाळून ही परवानगी देण्यात येईल, यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचं काम
सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं पुन्हा एकदा समन्स
बजावलं आहे. परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब
नोंदवण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी
रुपयांच्या वसुली प्रकरणात परब यांना याआधी ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं
होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी
वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.
****
पंतपधान नरेंद मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या 'मन की बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असेल. दूरदर्शन, प्रसार
भारती आणि आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
मराठवाड्यात मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग नांदेडला जोडण्यास मंत्रीमंडळ उपसमितीनं मान्यता दिल्यानं जालना-परभणी-हिंगोली-नांदेड या चारही जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार असून येत्या
मार्च -२०२२
पर्यंत संबंधीत भूसंपादन प्रक्रीया पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत
ते काल बोलत होते. मराठवाड्यात अतिजलद रेल्वेसाठीही केंद्रीय मंत्री नितिन
गडकरींसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कुंभेफळ इथं १४ व्या वित्त आयोगातून महिला आणि बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचं लोकार्पण तसंच
कुंभेफळ इथल्या विविध विकास कामांचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते
झालं, यावेळी बोलतांना त्यांनी मराठवाड्याच्या विकासाकरीता
दळणवळणाची साधनं तसंच रस्त्याच्या कामांकरीता निधीची कमतरता भासू देणार नसल्याची
ग्वाही दिली.
पुढील तीन वर्षात मराठवाड्यात जवळपास
९०० किलोमीटर रस्त्यांची कामे
करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरुड काझी ते एमआयडीसी, लाडगाव ते जडगाव या रस्त्यांकरीता ४ कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करुन
देण्यात येईल, असं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं.
यावेळी बोलतांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी
नुकसान झालेल्या फळबागांकरीता जाचक अटी रद्द करुन छाननी समिती देखील बरखास्त
करण्यात आली आहे, यामुळे शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळेल असा
विश्वास व्यक्त केला.
****
जालना जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक कामं करण्याबरोबरच
प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास
मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कामे पूर्ण करताना प्रशासकीय पातळीवर
येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, असं पाटील
यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री
राजेश टोपे यांनी जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची कामं आणि दुरुस्तीसाठी आवश्यक
निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. आमदार कैलास
गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर,आमदार
नारायण कुचे यांनीही विविध कामांसाठी जलसंपदा मंत्र्यांकडे निधी उपलब्ध करून
देण्याची मागणी केली.
****
औरंगाबाद इथं काल ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं
उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलतांना त्यांनी मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी
शासनानं समिती स्थापन केली असल्याचं सांगितलं. पैठण इथं संतपीठही लवकरच पूर्णवेळ
कार्यान्वित होत असल्याचं ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू
बिरादार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदघाटनानंतर
निमंत्रितांचं कवी संमेलन काल झालं, त्यानंतर प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर
आली आहे या तसंच आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर या विषयांवर
परिसंवाद झाले. रात्री लिव्ह इन रिलेशनशिप नाट्यप्रयोग सादर झाला. आज या संमेलनाचा
समारोप होणार आहे.
****
राज्यात काल तीन हजार, २७६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४१ हजार, ११९ झाली आहे. काल ५८
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ८३४ झाली
असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल
तीन हजार ७२३ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६३ लाख ६० हजार ७३५ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३७ हजार, ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातील
दोन, तसंच औरंगाबाद आणि जालना
जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल ३२ नवे रुग्ण
आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात २८, औरंगाबाद १७, लातूर १०, जालना तीन, तर नांदेड
आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण
आढळला, परभणी जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण
आढळला नाही.
****
लातूर जिल्ह्यात नवनवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध
करुन दिल्या जातील, तसंच जिल्ह्याला ‘क्रीडा
केंद्र’ करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुधाकर
शृंगारपुरे यांनी म्हटलं आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त नेहरु युवा
केंद्रातर्फे आयोजित फिट इंडिया फ्रीडम दौडचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी
मोठ्या प्रमाणात या दौडमध्ये सहभाग नोंदवला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा इथंही युवा संकल्प दौंडच आयोजन करण्यात आलं
होतं. केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून संकल्प दौडचं
उद्घाटन केलं.
नेहरू युवा केंद्राची नांदेड शाखा आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि खेळ
मंत्रालयाच्या वतीनं आज नांदेड इथंही फिट इंडिया रन घेण्यात आली. जिल्हा पोलिस
अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली.
****
बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर
जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची एक सदस्यीय प्रशासक म्हणून
नियुक्ती करण्यात आली आहे. कारभारात अनियमितता आढळून आल्यानं भारतीय रिजर्व बँकेनं या बँकेवर प्रशासक नियुक्त
करण्याचे आदेश दिले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात शिवना नदी काठच्या सर्व नुकसानग्रस्त भागांची खासदार
इम्तियाज जलील यांनी काल पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील नुकसानीसंदर्भात आढावा
बैठक घेतली. नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत
मिळण्यासाठी सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवडी इथं वीज पुरवठा खंडित
केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी काल औरंगाबाद-नांदेड
महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जवळपास दिड तास नागरिकांनी रस्ता अडवल्यानं
या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज बिलं न भरल्यानं महावितरण कंपनीनं
आठ दिवसांपासून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
****
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कालही पावसाचा जोर दिसून आला. जालना जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. शहरात काल सकाळी जोरदार
पाऊस झाला. मंठा तालुक्यात पाटोदा गावात रामतीर्थ नदीचं पाणी अनेकांच्या घरात घुसलं,
त्यामुळे या गावाचा अन्य भागाशी संपर्क तुटला होता. अंबड तालुक्यातील सुखापुरीच्या
नदीलाही पूर आल्यानं चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
औरंगाबाद जिल्ह्याच्या काही तालुक्यात मध्यम तर, बीड
जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात गेल्या
दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास डोंगरतळा
शिवारात अतिवृष्टी झाली. त्यामुळे गावाजवळच्या सिंचन तलावात क्षमतेपेक्षा जास्त
पाणी आल्यानं काल तलावातील पाणी गावात शिरलं. जिंतूर ते येलदरी मार्गावरील शेवडी
गावाजवळील मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहतूक काही काळ
बंद झाली होती.
सेलू तालुक्यातला लोअर निम्न दुधना धरणाचे कालच्या पावसामुळे
चौदा दरवाजे उघडून दुधना नदीत पाणी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातही काल पाऊस
झाला. जिल्ह्यातील डिग्रस काळे फाटा ते गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने
दाटेगाव, लोहगाव, सावळी, कंजारा, भोसी, खिल्लार,
नंदगाव, सिद्धेश्वर, करंजाळा,
गांगलवाडी या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्याच्या औंढा
तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे काल सलग चौथ्या दिवशी बारा दरवाजे उघडून पाणी नदी
पात्रात सोडण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उजनी भागात काल झालेल्या
जोरदार पावसामुळं तेरणा नदीला पूर आला. त्यामुळं उजनी - एकंबी रस्त्यावरील पुलावरुन वेगानं पाणी वाहात असल्यानं दोन गावातील संपर्क तुटला होता. रात्री
उशिरापर्यंत तिथलं पाणी ओसरलं नव्हतं. जिल्ह्यातलं माकणी इथलं निम्न तेरणा धरण
भरण्याची शक्यता आहे. धरण भरल्यास तेरणा नदीत पाणी सोडावं लागणार असल्यानं
नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
बीड नजिकच्या पाली गावाजवळ चारचाकी दुभाजकाला धडकून अपघातात दोन जण ठार, तर एक
गंभीर जखमी झाला. काल पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
//**************//
No comments:
Post a Comment