Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी
जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध
राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा
धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही
कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना
बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** राज्यातील नक्षलग्रस्त
भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांच्या निधीची मुख्यमंत्र्यांची
केंद्राकडे मागणी
** शाखा नसलेल्या भागात बँक शाखा
सुरू करण्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन
** असंघटीत
क्षेत्रातील प्रत्येक कामगारानं ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव
** पैठणच्या जायकवाडी
धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या वहन क्षमतेचं सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश
आणि
** ग्रामीण भागातील
मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी यशस्वीपणे
पार पाडण्याचं अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन
****
राज्यातील नक्षलग्रस्त
भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांच्या निधीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची
बैठक झाली. या बैठकीत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती, या भागाच्या
विकासासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आणि
त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती दिली.
नक्षलग्रस्त भागांत शाळांची संख्या वाढवणे, सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा, तसंच दळणवळणाचं जाळं तयार करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
****
देशाच्या ज्या भागात बँकाच्या शाखा नाहीत त्यांचे डिजिटल
नकाशे तयार करून शाखा नसलेल्या भागात बँक शाखा सुरू कराव्या असं आवाहन केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातल्या बँकांना केलं आहे. मुंबईत इंडियन बँक असोसिएशनच्या ७४
व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
देशाला स्टेट बँकेसारख्या चार ते पाच बँकाची गरज
आहे. त्यामुळे बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्ग काळात जीव
गमावलेल्या बँक कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सरकारी योजना
सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून प्रयत्न करा असं आवाहन केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यावेळी केलं.
****
असंघटीत क्षेत्रातील प्रत्येक कामगारानं ई-श्रम पोर्टलवर
नोंदणी करावी, असं आवाहन केंद्रीय
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईत
असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड वितरीत करताना आज ते बोलत होते. या ई-श्रम पोर्टलवर देशातील प्रत्येक गाव आणि गल्लीतील असंघटीत
क्षेत्रातल्या कामगारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. या नोंदणीच्या आधारावरच कामगार धोरणात
आवश्यक ते बदल करता येतील असं ते म्हणाले. आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक
व्यवसाय क्षेत्रांची नोंदणी या पोर्टलवर झाली असल्याचं त्यांनी
सांगितलं. जे कामगार पोर्टलवर नोंदणी करतील, त्यांना दोन लाख
रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळणार असल्याचं
यादव म्हणाले.
मध्य विभागाचे मुख्य कामगार आयुक्त डी
पी एस नेगी यांनी देशात अंदाजे ३८ कोटी कामगार हे असंघटीत क्षेत्रात असल्याचं सांगितलं, त्यापैकी
आतापर्यंत एक कोटी ६६ लाख कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याचं ते म्हणाले.
****
पैठणच्या जायकवाडी
धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्यानं या क्षेत्राचे
संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले
असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. आज औरंगाबादमध्ये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक त्यांच्या
अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. सर्हेक्षणानंतर त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्तावही करण्यात येत आहे. हा प्रस्ताव प्राप्त
होताच पुढील कार्यवाहीसाठी जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल, असं मंत्री पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढवण्याला प्राधान्य
देण्यात येत असून सर्व प्रकल्पांचे पाणी शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला मिळेल.
त्यादृष्टीनं जायकवाडी सह जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांच्या
दुरूस्तीसाठीचे देखील सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
यावेळी दिले.
****
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांनी रुग्णांना सेवा
सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावं, असं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं चिकलठाणा जिल्हा रुग्णालयात
आरोग्य विभागाची आढावा बैठक आज झाली त्यावेळी ते बोलंत होते. जिल्हा रुग्णालयात
उपलब्ध असलेल्या डॉक्टरची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, आवश्यक असणारी
यंत्र सामुग्री याचा विभागनिहाय आढावा घेत, शासनाकडून साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरण, औषध साठा याचा
वेळेत पुरवठा होत असल्याचही टोपे यांनी स्पष्ट केलं.
****
सुसंस्कृत समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून
ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी यशस्वीपणे
पार पाडावी, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि
ग्राहक कल्याण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचं
उद्घाटन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. कोरोना विषाणू संसर्ग काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी ऑनलाईन
शिक्षणप्रणालीचा चांगला वापर झाला असून, विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळावं यासाठी शासनानं विशेष लक्ष देऊन, त्यासाठी विविध
योजना आखल्या असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात
ग्रामीण भागात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना
अंगणवाडी सेविकांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून केलेले कार्य गौरवास्पद आहे, असं राज्याचे
पर्यावरण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी
म्हटलं आहे. महिला आणि बालविकास विभागानं आयोजित केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला मेळावा आणि गौरव सोहळा, पोषण आहार
कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल
केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तेरणा नदीला पूर
आला आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथंल्या बोरी धरण परीसरात काल रात्री
जोरदार पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा बोरी धरण पुर्ण भरलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment