Friday, 24 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      लोकसंख्येची जातीनिहाय संकलित केलेली माहिती देण्यास केंद्र सरकारचा नकार

·      पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्वत: तज्ज्ञांची समिती स्थापन करणार

·      स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राखीव मतदारसंघातून लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचं राज्य निवडणूक आयोगाचं आवाहन

·      राज्यात तीन हजार, ३२० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर १०९ बाधित

·      ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस

आणि

·      अनधिकृत मालमत्ता खरेदी न करण्याचं औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जनतेला आवाहन

****

स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मागितलेली लोकसंख्येची जातीनिहाय संकलित केलेली माहिती अर्थात इम्पेरिकल डाटा देण्यास केंद्र सरकारनं नकार दिला आहे. प्रशासकीय अडथळे आणि मूळ माहितीतल्या असंख्य त्रुटी यामुळे हा डाटा राज्यांना देता येणार नाही, असं केंद्रानं काल सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केलं. जातीनिहाय जनगणनेमुळे ओबीसींची खरी संख्या समजण्यास मदत होऊ शकणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. डाटा मधल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं तज्ज्ञांची समिती बनवण्याचा निर्णय घेतला होता, आणि तत्कालीन नीती आयोगाचे उपाध्यक्ष पनगाडीया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बनवली होती. या समितीची एकही बैठक झाली नाही आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्या माहितीवर कुठली हालचाल झालेली नसल्याचं, समाजकल्याण मंत्रालयानं सांगितलं. केंद्र सरकारच्या या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारनं चार आठवड्यांचा वेळ मागितला असून त्या नंतर या प्रकरणावर पुढची सुनावणी होणार आहे.

****

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्वत: तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नेते तसंच अन्य प्रमुख लोकांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी झाली. केंद्रानं चौकशीला चालढकल करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास नकार दिला होता. यावर सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी, कठोर भुमिका घेत आपण स्वत: तांत्रिक समिती नेमणार असल्याचं सांगितलं. न्यायालय यासंदर्भात पुढील आठवड्यात आदेश देणार आहे. 

****

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातली भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडली जात असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी नमूद केलं. आरोग्य विभागाच्या गट `क` संवर्गातल्या पदासाठी उद्या, तर गट `ड` संवर्गातल्या पदांसाठी, २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा टोपे यांनी आढावा घेतला. उमेदवारांना प्रवेश पत्र वेळेत मिळावं, यंत्रणा सज्ज असावी, उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचं समाधान करण्यासाठी `मदत वाहिनी` सुरु करावी, अशा सूचना टोपे यांनी यावेळी दिल्या.

****

महाराष्ट्र राज्य परिषदेची शिक्षक पात्रता- टीईटी ही परीक्षा आता १० ऑक्टोबर ऐवजी ३१ ऑक्टोबरला होणार आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्यानं हा बदल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीमुळे गेल्या दीड वर्षांपासून ही परीक्षा झालेली नाही.

****

राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी, ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी, जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी केलं आहे.

****

आगामी महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीनं घेतला असून, महापालिका निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारीही आघाडीनं केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी काल पुण्यात ही माहिती दिली.

****

 राज्यात काल तीन हजार, ३२० नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ३४ हजार, ५५७ झाली आहे. काल ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ७२५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ५० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ५३ हजार ७९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३९ हजार, १९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १०९ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात काल ४० नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ३२, लातूर १८, औरंगाबाद १४, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून अत्याचार करण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २६ आरोपींना ताब्यात घेतलं असून, यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींना सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

नागरिकांनी अनधिकृत मालमत्ता खरेदी न करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे. तुकडी बंदीमुळे मुद्रांकावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरु असून, यावर जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी वार्ताहरांशी बोलत होते. चार ते पाच जणांनी एकत्र येऊन अर्धा एकर क्षेत्राची नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे केली, आणि त्यामध्ये तुकडे करुन अनधिकृत भूखंड पाडले जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती, त्यांनी दिली. नागरिकांनी सहाशे चौरस फूट असे तुकडे पाडलेले भुखंड खरेदी करु नये, मुद्रांक शुल्क विभागात भूखंड, शेती खरेदी विक्रीची नोंदणी सुरू असून, या संदर्भातल्या अफवांना बळी पडू नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

****

ब्रिटीश सत्ता आणि त्यांच्या जुलुमाविरुद्ध अविरत संघर्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावल्यानेच, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना, सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रर्वतक मानले जात असल्याचं, जळगाव जिल्ह्यातल्या मूळजी जेठा महाविद्यालयातले इतिहास विषयाचे प्राध्यापक, जुगलकिशोर दुबे यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, ते आज आज्ञ क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, यांच्या कार्याबद्दलची माहिती देणार आहेत. ते म्हणाले..

सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य होता की अयोग्य, तो यशस्वी होणार की नाही, याविषयीचा ऊहापोह न करता स्वातंत्र्याच्या एकमेव गुर्मीने प्रेरित झालेल्या फडके यांनी, आपल्याला या कार्यास समर्पित केलं. परकीय सत्तेविरुद्ध व जुलुमाविरुद्ध अविरत संघर्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावल्यानेच, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना, सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रर्वतक मानले जाते.

आज संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन हे व्याख्यान प्रसारित होणार आहे. आमच्या आकाशवाणी समाचार औरंगाबाद- Aurangabad AIR News या युट्युब चॅनेलवरही श्रोत्यांना हे व्याख्यान ऐकता येईल.

****

जालना जिल्ह्यात परतूर-आष्टी मार्गावरील श्रीष्टी पुलावरून काल सायंकाळी २३ प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली. चालकाला अरुंद पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. श्रीष्टी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात अर्ध्याहून अधिक बुडालेल्या बसवर चढून खिडक्यांच्या काचा फोडून आतल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. बसमधल्या प्रवाशांमध्ये सात महिलांसह दोन बालकांचाही समावेश आहे. बसमधील एक मुलगी वाहून जात असताना ग्रामस्थांनी पाण्यात मानवी साखळी करत तिला वाचवलं.

****

परभणी जिल्ह्यात काल सर्वदूर पाऊस झाला. जिंतूर इथं दुपारी एक तास झालेल्या या पावसानं परिसरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे काल उघडण्यात आले असून, एक हजार ८८४ दशलक्ष घनमीटर प्रतीसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान, अर्धापूर तालुक्यातल्या महादेव पिंपळगाव शिवारातून बैलगाडी घेऊन गावाकडे येत असतांना सुदर्शन झुंजारे हा तरुण बैलगाडीसह आसना नदीच्या पूरात वाहून गेला. बैलांचे प्रेत सापडले असून, तरुणाचा अद्याप शोध लागला नाही.

****

लातूर जिल्ह्यातल्या मांजरा प्रकल्पात सातत्यानं पाण्याची आवक सुरु असल्यानं हा प्रकल्प पुर्ण क्षमतेनं भरला आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातलं अतिरिक्त पाणी मांजरा नदी तसंच कालव्याद्वारे सोडण्याचं नियोजन करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांना सतर्क राहण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं आहे.

****

हवामान: येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...