Monday, 27 September 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियानामुळे नागरिकांना चांगल्या आणि गतिमान आरोग्य सेवा उपलब्ध होतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

** रास्त आणि किफायतशीर ऊसदर थकवणाऱ्या २७ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाचे महसुल वसुली प्रमाणपत्राचे आदेश जारी

** राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक ब्रँड ॲम्बेसेडर व्हावा, इतक्या चांगल्या दर्जाचं पर्यटन विकसित करण्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

** भारतीय जनता पक्षाच्या माघारीमुळे राज्यसभा सदस्यपदाच्या पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

आणि

** कृषी विषयक कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

****

प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियानामुळे नागरिकांना आणखी चांगल्या आणि गतिमान आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या महत्वाकांक्षी अभियानाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या अभियानामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याला एक नवीन दिशा मिळाली असून, देश एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.

या अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्य ओळख पत्र दिलं जाईल. प्रत्येकाच्या आरोग्य नोंदी डिजिटली सुरक्षित ठेवल्या जातील. गरीब आणि मध्यम वर्गाला या सेवांचा सर्वाधिक लाभ होणार असून त्यांना सहजपणे उपचार सुविधा उपलब्ध होतील. देशातील कोणत्याही रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता येईल, असं ते म्हणाले.

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या पथदर्शी प्रकल्पाची घोषणा केली होती. सध्या सहा केंद्र शासित प्रदेशांमध्ये या पथदर्शी प्रकल्पाची अमलबजावणी सुरु आहे.

****

गेल्या गाळप हंगामात रास्त आणि किफायतशीर ऊसदर- एफ.आर.पीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली नसल्याच्या कारणावरून राज्यातल्या २७ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयानं महसुल वसुली प्रमाणपत्र आर. आर. सी.चे आदेश जारी केले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांच्या या थकबाकीची वसुली जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली जाईल. यामध्ये सर्वाधिक १३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. लातूरमध्ये ३, सांगली सातारा उस्मानाबाद बीड या चार जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर नाशिक, नंदूरबार आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कारखान्याचा यात समावेश आहे. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

****

आगामी काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागानं जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

गेल्या आठवड्यामध्ये संभाजीनगरला गेलो होतो. तिथं काही लोकं भेटली. आपल्याकडे कास पठार आहे. ते म्हणाले आम्हाला संधी द्या, आम्ही आणखीन काही अशी ठिकाणी करु कि त्याला आपण झकास पठार करु शकतो इतर ठिकाणी. कास पठाराला हात नाही लावायचा. येणारा पर्यटक जो आहे, तो पहिल्यांदा येताना, येऊ कसा? मी जाऊ कसा? त्याच्या सुविधा आपण केलेल्या आहेत. पण गेल्यानंतर राहणार कुठे? त्या सुविधा कशा असतील? आलेला प्रत्येक पर्यटक त्याला सुविधा आपण अशा दर्जेदार दिल्या पाहिजेत, ज्याची सोय आपण केलेली आहे. मी तर म्हणेन आपल्याला दुसरा ब्रँड अँबेसिटर नेमण्याची गरज लागता कामा नये. येणारा प्रत्येक पर्यटक हा आपला ब्रँड अँबेसिटर असला पाहिजे. असेच पुढे चला. महाराष्ट्राला पुढे न्या. जगाला आकर्षित करा आणि महाराष्ट्राचं वैभव जपा, जोपासा आणि वाढवा.

 

राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

राज्यसभा सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवारानं माघार घ्यावी, असं आवाहन केलं होतं.

****

कृषी विषयक कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ. वाढते खासगीकरण थांबवा यासह अन्य मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. 

 

हिंगोलीत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं देशातील शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्यासह विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळी फीत बांधून केंद्र सरकारचा निषेध केला. जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही अशाप्रकारचं आंदोलन करण्यात आलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा शारदिय नवरात्र महोत्सव २९ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. येत्या बुधवारी देवीच्या मंचकी निद्रेनं या महोत्सावाला प्रारंभ होईल. ०७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ होईल. तर १४ ऑक्टोबरला होमकुंडावरील धार्मिक विधीनं नवरात्रची सांगता होईल. देवीचे  सीमोल्लंघन १५ ऑक्टोबर  रोजी पहाटे होईल.

****

आयकर विभागानं गुरुवारी जालना, औरंगावाद, पुणे, मुंबई आणि  कोलकता येथील पोलाद उद्योगांवर छापे टाकले. यात बँकेच्या लाँकर्समध्ये दोन कोटी १० लाख रुपयांची रोकड तसचं एक कोटी सात लाख रुपयांचे बेहिशोबी दागिणे आढळून आल्याचं आयकर विभागानं दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यात काही महत्वाची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत.

//********//

No comments: