Tuesday, 28 September 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·            मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस, विभागातील जवळपास सर्व नद्यां- नाल्यांना पूर

·            औरंगाबाद ते पुणे तसंच हैदराबाद ते मुंबई व्हाया नांदेड जालना, ही शहरे हायस्पीड रेल्वेनं जोडण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानाकडे मागणी

·            एफ.आर.पीची रक्कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या राज्यातल्या २७ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाचे महसुल वसुलीचे आदेश

·            कृषी विषयक कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

·            राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची नोकर भरतीसाठीची परीक्षा आता २४ आणि ३१ ऑक्टोबरला

·            राज्यादोन हजार, ४३२ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन रुग्णांचा मृत्यू तर ८९ बाधि

आणि

·            अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे काटेकोर पंचनामे करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश  

****

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून जोरदास पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. यामुळे विभागातील जवळपास सर्व नद्यां- नाल्यांना पूर आला आहे.

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं आज पहाटे धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जवळपास ७१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी मांजरा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली. अंबाजोगाई शहर आणि परिसरातही रात्रभर पाऊस सुरु होता. केजचा पुल पाण्याखाली गेल्यानं अंबाजोगाई रस्ता बंद झाला आहे. केज तालुक्यातल्या आनंदगाव इथं शेतातील गोठ्यात अडकलेल्या पाच जणांचा संपर्क तुटला आहे.

होळणा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहत असल्यानं, सोमनाथ बोरगाव गावाचा संपर्क तुटला आहे.

 

नांदेड मध्ये रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता. डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या आठ दरवाजातून दोन हजार ९२८ घनमीटर प्रतीसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातलं सिना कोळेगाव धरण पूर्ण भरलं आहे. आज पहाटे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

परभणी जिल्ह्यात सोनपेठ, पालम तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

जालना जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. सध्या पावसाची संततधार सुरु आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरातही रात्रभर पाऊस सुरु होता, पहाटे पावसाचा जोर आणखी वाढला. जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८४ टक्क्यांवर गेला आहे.

सोलापूर, धुळे, वाशिम जिल्ह्यातही पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

****

पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं गुलाब चक्रीवादळ आंध्र आणि ओडीशाच्या किनारपट्टीला धडकून पुढे निघालं आहे. वादळाची शक्ती क्षीण होत असली तरी हवामान खात्यानं राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद याठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद ते पुणे तसंच हैदराबाद ते मुंबई व्हाया नांदेड जालना, ही शहरे हायस्पीड रेल्वेनं जोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबई -नाशिक- नागपूर हायस्पीड रेल्वेच्या कामाला  गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.  याशिवाय राज्य शासनानं पुणे ते नाशिक दरम्यान हायस्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकांना जोडली जातील असं या पत्रात म्हटलं आहे.

****

गेल्या गाळप हंगामात रास्त आणि किफायतशीर ऊसदर- एफ.आर.पीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली नसल्याच्या कारणावरून राज्यातल्या २७ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयानं महसुल वसुली प्रमाणपत्र  आर. आर. सी.चे आदेश जारी केले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांच्या या थकबाकीची वसुली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. यामध्ये सर्वाधिक १३ कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. लातूरमध्ये ३, सांगली सातारा उस्मानाबाद बीड या चार जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर नाशिक, नंदूरबार आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कारखान्याचा यात समावेश आहे.

****

आगामी काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागानं जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

गेल्या आठवड्यामध्ये संभाजीनगरला गेलो होतो तिथे काही लोकं भेटले, आपल्याकडे कास पठार आहे, ते म्हणाले साहेब आम्हाला संधी द्या, आम्ही आणखी काही असे ठिकाणं करु, की त्याला आपण झकास पठार म्हणू शकू इतर ठिकाणी. कास पठाराला हात नाही लावायचा. येणारा पर्यटक जो आहे, तो पहिल्यांदा येताना येऊ कसा, जाऊ कसा, त्यांच्या सुविधा आपण केलेल्या आहेत. पण गेल्यानंतर राहणार कुठे, त्या सुविधा कशा असतील. आलेला प्रत्येक पर्यटक ज्याला सुविधा आपण अशा दर्जेदार दिल्या पाहिजे, याची सोय आपण केलेली आहे. मी तर म्हणेल आपल्याला दुसरा ब्रँड ॲम्बेसेडर नेमण्याची गरज लागता कामा नये, येणारा प्रत्येक पर्यटक हा आपला ब्रँड ॲम्बेसेडर असला पाहिजे. असेच पुढे चला, महाराष्ट्राला पुढे न्या, जगाला आकर्षित करा आणि महाराष्ट्राचं वैभव जपा, जोपासा आणि वाढवा.

पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

कृषी विषयक कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोलीत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं देशातील शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केलं.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळी फीत बांधून केंद्र सरकारचा निषेध केला. शहरातही क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन करुन निदर्शनं करण्यात आली.

परभणी जिल्ह्यापालम ते ताडकळस या राज्य रस्त्यावर  धानोरा काळे इथल्या  पुलावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं काल दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही अशाप्रकारचं आंदोलन करण्यात आलं.

****

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची नोकर भरतीसाठीची परीक्षा आता २४ आणि ३१ ऑक्टोबरला होणार आहे. गट क साठीची परीक्षा २४ ऑक्टोबरला तर गट ड साठीची परीक्षा ३१ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. सर्व परीक्षार्थींना परीक्षेचे प्रवेश पत्र ९ दिवस आधी देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं त्या बिनविरोध निवडून आल्या. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक

जाहीर करण्यात आली होती.

****

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या राज्यातील सर्व महामार्गांवरील खड्डे १५ ऑक्टोबरपूर्वी डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले आहेत. मुंबईत राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

राज्यात काल दोन हजार, ४३२ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, हजार, ७६२ झाली आहे. काल रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ९०२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख हजार २४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३ हजार, ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ८९ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३६ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात २०, औरंगाबाद १३, जालना नऊ, लातूर सहा, नांदेड तीन, तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे काटेकोर पंचनामे करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिले. औरंगाबादमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत उपस्थिहोते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा शारदिय नवरात्र महोत्सव २९ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. उद्या बुधवारी देवीच्या मंचकी निद्रेनं या महोत्सावाला प्रारंभ होईल. ०७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ होईल. तर १४ ऑक्टोबरला होमकुंडावरील धार्मिक विधीनं नवरात्रची सांगता होईल. देवीचे  सीमोल्लंघन १५ ऑक्टोबर  रोजी पहाटे होईल.

****

ब्रिटीश सत्तेला सुरूवातीपासूनच भारतीयांनी विरोध केला. देशाच्या प्रत्येक भागातून त्यांच्या सत्तेला विरोध झाला. मात्र भारतीयांचा प्रतिकार हा पारंपारिक स्वरूपाचा होता, असं पुण्याच्या एस एम महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक दिनकर मुरकुटे यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत नागरी असंतोष या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. ते म्हणाले….

ब्रिटीशांनी जसा जसा देश काबिज केला व आपली सत्ता याठिकाणी स्थिर केली, तसं तसं येथील जनतेमध्ये असंतोष आणि विरोध होत होता. तो वाढत गेला. ब्रिटीशांच्या भारतीय सैन्यात जे विदेशी सैनिक होते, त्यांच्यापर्यंत तो असंतोष पोचला. सुमारे शंभर वर्ष हा जनतेतील असंतोष सशस्त्र प्रतिकाराच्या रुपाने व्यक्त होत होता. खालसा केलेल्या गाद्यांचे राजे, त्यांचे वारसदार व नातेवाईक, जहागिरदार, खजिनदार, माजी सैनिक, अधिकारी किंवा इतर संस्थानिक यापैकी कोणीतरी या प्रतिकाराचे नेतृत्व करत असे. शेतकरी व कारागिर वर्गातील बरेच लोक या बंडामध्ये सामील होत असत. कारण त्यांचे दु:खे व हालअपेष्टा अनेकदा या बंडांचे मुख्य आधार असे.

आज सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून हे व्याख्यान प्रसारीत होणार आहे. आकाशवाणी समाचार औरंगाबाद या युट्युब चॅनेलवरही श्रोत्यांना हे व्याख्यान ऐकता येईल.

****

परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आमदार आपल्या दारी या उपक्रमातर्गंत काल झरी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ  ग्रामस्थांनी घेण्याचं आवाहन केलं.

****

हातलाई तलावात उभारण्यात येत असलेल्या पर्यटन विषयक कामांना गती देण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा पर्यटन विकास समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीनं काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ४१९ दात्यांनी रक्तदान केलं.

****

No comments: