आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ सप्टेंबर २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आयुष्मान भारत डिजिटल मिशन या आरोग्य
अभियानाचं लोकार्पण करणार आहेत. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी या अभियानाची घोषणा केली होती. देशातल्या सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये
सध्या हे अभियान प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आलं आहे.
****
असंघटीत क्षेत्रातल्या प्रत्येक कामगारानं ई-श्रम पोर्टलवर
नोंदणी करावी, असं आवाहन, केंद्रीय
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. जे कामगार यावर नोंदणी करतील, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या
विम्याचा लाभ मिळणार असल्याचं यादव यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
रक्तपेढ्यांकडे सध्या फक्त ३५ हजार युनिट म्हणजे सरासरी दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा
आहे. रक्ताच्या तुटवड्याचं संकट टाळण्यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन राज्य रक्तसंक्रमण
परिषदेनं केलं आहे.
****
औरंगाबाद
इथं काल मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं,
आजादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. औरंगाबाद शहराच्या स्वच्छतेचा
नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून, येणाऱ्या काळात औरंगाबाद शहर हे पहिल्या पाच मध्ये
आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं पांडेय यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसण्याकरता सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याशिवाय पर्याय नाही, असं मत खासदार संजय जाधव यांनी
व्यक्त केलं आहे. काल परभणीत एका सत्कार सोहळ्यात ते बोलत
होते. दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा सरू असून, जिल्हा विकासाचं आपलं उत्तरदायित्व सर्वांनी पूर्ण
करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
नांदेड जिल्ह्यात सर्व न्यायालयात झालेल्या लोक
अदालतीमध्ये एकूण
चार हजार २०६
प्रकरणं निकाली निघाली. यात १३ कोटी ४६ लाख ९० हजार रुपयांची
विविध प्रकरणात तडजोड झाली. जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर
यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
****
No comments:
Post a Comment