Tuesday, 28 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीची नोंद झाली. अर्धापूर तालुक्यात रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे उमा नदीला महापूर आला आहे. 

बीड जिल्ह्यात आवरगाव चा पूल वाहून गेल्यानं धारूर - आडस रस्ता बंद झाला आहे. परळी ते बीड रस्त्यावर पांगरी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं, पाचशे वाहनं अडकली आहेत. मांडवा पुलावरुनही पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबादकडे येणारा रस्ता बंद झाला आहे.

परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. सोनपेठ तालुक्यातल्या धारडिघोळ गावाला पाण्याचा वेढा पडला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सीना कोळेगाव आणि निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण भरले असून, पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मांजरा नदीतून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मांजरा नदीकाठच्या कळंब तालुक्यातल्या वाकडेवाडी या गावात पंधरा नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल झालं आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात नागपूर डेपोची एसटी बस वाहून गेली. बसमधे चार ते सहा प्रवासी होते. स्थानिक नागरिक आणि तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतीपिकांच्या ३५ वाणांचं लोकार्पण होणार आहे. हवामान बदल आणि कुपोषण या समस्यांचा सामना करण्याच्या दृष्टीनं ही वाणं भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केली आहेत. यात चणे, सोयाबिन, तांदूळ, गहू, मका, बाजरी, पशुखाद्य म्हणून वापरली जाणारी धान्यं, डाळी यांचा समावेश आहे.

****

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९२ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कालपासूनच लता मंगेशकर यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटर संदेशाद्वारे लता दिदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments: