Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 September 2021
Time 1.00 to 1.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली
नवी दिल्लीमध्ये नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे. दिवसभर चालणाऱ्या
या बैठकीत गृहमंत्री शाह या राज्यातील नक्षलवाद्यांच्या कारवायांच्या सद्य: स्थितीचा आढावा घेतील, त्याचबरोबर
भविष्यातील सुरक्षाविषयक धोरणांवर विचारविनिमय करतील. नक्षलग्रस्त राज्यांमध्ये चालवल्या
जाणाऱ्या नक्षलविरोधी अभियानाचा आढावाही ते घेतील. याशिवाय या राज्यात रस्ते, पूल,
शाळा, आरोग्य केंद्र यासारख्या सुविधा निर्माण करण्याच्या कामाचाही ते आढावा घेतील.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे नितीशकुमार, ओडिशाचे नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या बैठकीला उपस्थित आहेत.
****
येत्या
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी जनतेनं खादीची खरेदी करुन नवा अनोखा विक्रम करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरून आज प्रसारीत झालेल्या ‘मन की बात’
या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. गेल्या काही वर्षांत देशात खादी आणि हातमागचं उत्पादन
अनेक पटींनी वाढलं आहे. दिल्लीच्या खादी शोरूममध्ये अनेकदा एका दिवसात एक कोटी रूपयांहून जास्त व्यवहार झाला आहे. आता येत्या २ ऑक्टोबरला आपल्या शहरांमध्ये जिथे कुठे
खादी, हातमाग, हस्तकला यासारख्या वस्तुंची विक्री होत असेल,
तिथून त्याची खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे. दिवाळीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व खरेदी करुन ‘व्होकल फॉर
लोकल’ या अभियानाचे आत्तापर्यंतचे सगळे विक्रम मोडण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
आजच्या
जागतिक नदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना
जल प्रदूषण टाळून नद्या वाचवण्याचं आवाहन केलं आहे. आपल्याला लोकांनी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा ई-लिलाव होत आहे. या लिलावातून
येणारा निधी नमामि गंगेसाठी दिला जात असल्याचं सांगत त्यांनी
देशभरात नद्यांना पुनर्जिवीत करण्यासाठी, पाण्याच्या
स्वच्छतेसाठी अनेक स्वयंसेवी संघटना, सरकार निरंतर कार्यरत
असल्याचं सांगितलं.
****
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील औरंगाबाद इथं जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेत आहेत.
याबैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी वैजापुर तालुक्यातल्या वाकला
- चांदेश्वर जलप्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी, तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास
महामंडळाची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. हा प्रकल्प दुष्काळात परिसरातल्या
सर्व गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवणारा असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी महसूल मंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्यातील
आमदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
****
'प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन'
या अभियानामुळे व्यक्तिगत
आरोग्य नोंदणी केली जाणार असून त्याचा फायदा
'नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम' ची यंत्रणा तयार करण्यासाठी होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर
भारती पवार यांनी म्हटलं आहे.नागपूर इथल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्सच्या तिसऱ्या
वर्धापन दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या.
याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,
एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर पी.के. दवे, संचालिका
डॉक्टर विभा दत्ता, राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे सहभागी
झाले होते. केंद्र शासनानं प्रत्येक राज्यात एम्स उभारण्याचं धोरण स्वीकारल्या पासून
देशभरात २२ रुग्णालयांचं बांधकाम सुरु असल्याचं पवार म्हणाल्या.
****
४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. संमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांची
रवींद्र तांबोळी, गजानन जाधव आणि पृथ्वीराज तौर यांनी मुलाखत
घेतली. त्यानंतर आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारणांचा बळी तसंच मराठी लेखिका - कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकलं आहे
या विषयांवर परिसंवाद झाले. दुपारी कथाकथन, कविसंमेलन आणि सायंकाळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार आणि राज्याचे
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होणार आहे.
****
यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणी केलेल्यांना नोंदणी शुल्काचा परतावा
येत्या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यादरम्यान परत मिळणार असल्याचं श्री अमरनाथ मंदिर समितीनं जाहीर केलं आहे. सध्या
कोरोना विषाणू संसर्गस्थितीमुळं यंदाचीही यात्रा रद्द झाली. शुल्क
परत घेण्यासाठी यात्रेचा परवाना दिलेल्या बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे. तसंच शुल्क
परत न घेता याच परवान्याचं नूतनीकरण करून पुढच्या वर्षी यात्रा करण्याचा पर्यायही खुला
असणार आहे.
****
आपलं पहिलं प्राधान्य जलमार्गांना असून, राज्यात
जलमार्गांचा विकास व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ
वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल कऱ्हाड इथं
रस्ते प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं माहिती देतांना
गडकरी यांनी पुण्यापासून बेंगलोरपर्यंत एक नवीन जलदगती महामार्ग बांधला जाणार आहे. यामुळे सुरत मार्गे मुंबई – ठाणे - पुणे- सातारा आणि पुणे - सोलापूर असा
असणार आहे. तसंच सुरत पासून एक नवा महामार्ग प्रस्तावित
असून तो नाशिक - अहमदनगर - सोलापूर आणि नंतर दक्षिणेमध्ये
जाण्याची सोय त्याद्वारे होईल असं ते म्हणाले.
पुणे इथून कोल्हापूर तसंच अहमदनगर आणि सोलापूर या तीन शहरांना मेट्रोनं
जोडण्याचाही प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन असल्याचं ते म्हणाले. ताशी
१४० किलोमीटर वेगानं धावणारी रोपियन मेट्रोसारखा हा प्रकल्प दिशादर्शक असेल असं ते म्हणाले.सातारा, सांगलीसह कोल्हापूरच्या खासदार-आमदारांनी आपल्याला आराखडा दिल्यास इथला एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा बांधता येईल असं त्यांनी सांगितलं.
//************//
No comments:
Post a Comment