Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2021
Time 1.00 to 1.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात
आज पावसानं उघडीप दिली असली, तरीही अनेक भागात पूर परिस्थिती कायम आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असून, धरणाचा पाणीसाठा ९५
टक्के झाला आहे. धरणातून सध्या नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट संदेशाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी
आज जायकवाडी धरणाची पाहणी केली. पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी
सावध राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या रुई धानोरा परिसरात कयाधू नदीला पूर आला असून, आज
पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे हदगाव ते निवघा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. हदगाव
आगाराची निवघा गावाकडे जात असलेली बस रूईचे सरपंच अमोल कदम, पोलीस पाटील सुभाष पवार
आणि अन्य लोकांनी पुलावरून न जाऊ देता हदगावकडे परत पाठवली, त्यामुळे मोठी दुर्घटना
टळली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड
शहराजवळच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात वरच्या भागातून पाण्याची आवक
वाढली असल्यामुळे आज सकाळपासून एकूण १४ दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, सखल भागात पाणी शिरलं आहे.
नाशिक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात रात्रीपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे
गंगापूर धरणातून दहा हजार ५३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत
आहे.
****
विदर्भ
मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे १२ दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे.
उमरखेड मधल्या मार्लेगाव पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली असून, नागपूर - बोरी -तूळजापूर
हा महामार्गही बंद झाला आहे.
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या देवजना परिसरात कयाधू नदीच्या महापुराने गेल्या
४८ तासांपासून शेतांना वेढा घातला आहे. शेतात आखाड्यावर अडकलेल्या नागरिकांना आज सकाळी
बाहेर काढण्यात आलं.
****
राज्यात
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत,
अशा विद्यार्थ्यांच्या एमएच सीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात
येणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ट्विटरद्वारे ही माहिती
दिली. पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू
शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सीईटी परीक्षा
देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार असून, याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील,
असं सामंत यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या
विविध जल प्रकल्पांची उंची वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे जलसाठ्यात
आणि पर्यायाने सिंचन क्षेत्रातही वाढ होईल, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं
आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सिंचनाचं
क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने मराठवाड्यात ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता असेल तिथली
कामं प्राधान्यानं केली जातील, असं पाटील म्हणाले.
दरम्यान,
पाटील यांनी काल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत परळी, अंबाजोगाई आणि केज तालुक्यातल्या
विविध गावात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली.
****
शेतकऱ्यांना
यावर्षीच्या हंगामात दर्जेदार सुरळीत वीज पुरवठयासाठी रोहित्र वेळेत उपलब्ध करून देण्याची
सूचना, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली आहे. मराठवाड्यातल्या
औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडळातल्या शेतीपंपाचे नादुरूस्त रोहित्र दुरूस्तीसाठी
लागणारे ऑईल, मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’
या उपक्रमाचा शुभारंभ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या उपस्थितीत
झाला. स्वच्छता ही सेवा, स्थायित्व आणि सुजलाम या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या प्रत्येक
ग्रामपंचायतीनं सहभागी होऊन, उघड्यावर शौचमुक्त, प्लॉस्टिकमुक्त गाव, सांडपाणी आणि
घनकचरा व्यवस्थान ही कामं प्राधान्यानं करावी, असं आवाहन वानखेडे यांनी यावेळी केलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर भर दिल्यास, येणाऱ्या
काळात सक्षम आणि उदयोन्मुख पिढी घडण्यास मदत होऊ शकेल, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे. परभणी इथं कन्या शाळेत जिल्ह्यातले सर्व
गटशिक्षणाधिकारी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख
यांची संवाद बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment