Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २९ सप्टेंबर २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पूरस्थिती; शेतीचं मोठं नुकसान, जनजीवन
विस्कळीत,
· विविध
घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू तर चार जण वाहून गेले
·
ऑक्टोबर महिन्यापासून शिवभोजन थाळीची विनामूल्य
सेवा बंद करण्याचा निर्णय
·
राज्यात नवीन महाविद्यालय तसंच अभ्यासक्रम सुरु
करण्यासाठी निश्चित केलेलं वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकललं
·
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभेची ३० ऑक्टोबरला
पोटनिवडणूक
आणि
·
राज्यात दोन हजार, ८४४ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा
मृत्यू तर ९४ बाधित
****
जोरदार पावसामुळे राज्यात काल अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात
औरंगाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान
झालं असून मराठवाड्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात
पुरात अडकलेल्या काही जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या पावसाशी
संबंधित घटनांमध्ये विभागात पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण वाहून गेले आहेत. आता
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पाऊस थांबला आहे.
औरंगाबाद
शहरासह जिल्ह्यात काल ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातले बहुतांश लहान मोठे
सगळेच जल प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. शहरानजीक असलेला हर्सूल तलाव पूर्ण क्षमतेनं भरला
असून, औरंगाबाद शहरातली खाम नदी दुथडी भरून वाहत आहे. औरंगाबाद महानगपालिका मुख्यालय
परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडल्यानं, महापालिकेच्या संरक्षक भिंतीचं
नुकसान झालं.
पैठण
शहरातल्या कहारवाडा इथं घराची भिंत कोसळून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वैजापूर
तालुक्यात बोरसर इथं एक महिला भिंगी गावातल्या पुलावरुन बोर नदीत वाहून गेली.
कन्नड
तालुक्यातल्या शिवना टाकळी आणि वैजापूर तालुक्यातल्या नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणी साठा सुमारे
९० टक्क्यांहून अधिक झाला आहे.
लासूर
परिसरात शिवना नदीला पूर आल्यानं गावात पुराचं पाणी शिरलं. मुंबई नागपूर महामार्गवर
असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. फुलंब्री तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून, बाबरा
गावातली अनेक दुकानं पुराच्या पाण्यात वाहून गेली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सद्यस्थितीत येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले
आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येलदरी धरण आणि
धरणा समोरील नदी पात्राच्या ५०० मीटर परिसरात कलम १४४ नुसार मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी
आंचल गोयल यांनी जारी केले आहेत.
पूर्णा
तालुक्यात नदीच्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली. जिल्ह्यातली धरणं, उच्च पातळी बंधारे,
मध्यम प्रकल्प, तसंच साठवण तलावातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं असून, परिसरातील सर्व शेती पुराच्या पाण्याखाली
गेली आहे. कळमनुरी तालुक्यात उमरा ते बोल्डा मार्गावरील कयाधू नदीवरील पुलावरून पाणी
वाहत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातल्या
सिद्धेश्वर धरणाच्या बारा दरवाजातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात तेरणा आणि मांजरा या दोन प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. निम्न तेरणा, तेरणा
आणि मांजरा हे सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. कळंब तालुक्यात वाकडेवाडी इथं अडकलेल्या
वीस जणांची सुटका करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं हेलिकॅप्टरच्या
सहाय्यानं दाऊतपुर इथल्या सहा जणांना, तर सौंदना आंबा इथल्या दहा जणांना सुरक्षित स्थळी
हलवलं.
इर्ला
इथले बालाजी कांबळे हे भंडारवाडी पुलावरून तोल जाऊन नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून
गेले असून, शोध कार्य सुरू आहे. तसंच वाशी तालुक्यातही एकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासन
परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, तेरणा आणि मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल ६५ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. शहरातल्या सखल भागात पाणी साचलं असून, अनेक घरात पाणी शिरलं. नांदेड शहर आणि
सिडको भागाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं, या पुलावरची
वाहतुक बंद करण्यात आली होती. अर्धापूर तालुक्यातल्या लोणार नदीला आलेल्या पुरामूळे
शेकडो हेक्टर शेतजमिनीवरचं पिक वाहून गेलं. नांदेड तालुक्यात राहटी इथं नदीच्या पुरात
दुचाकीसह वाहून जाणाऱ्या एकाला नागरिकांनी वाचवलं. हदगाव तालुक्यातल्या निवघा इथं नाल्याच्या
पुरात वाहून गेल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला.
डॉक्टर
शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहे, यामुळे गोदावरी
नदीला पूर आला आहे.
****
लातूर
जिल्ह्यात मांजरा, तेरणा नदीसह लहान मोठ्या नद्या, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. तेरणा
नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे औसा - तुळजापूर हा चार पदरी मार्ग वाहतुकीसाठी
बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. पुराच्या
पाण्यात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुटका करण्यात आली.
जळकोट
तालुक्यातल्या सोरगा इथं एक जण, देवणी तालुक्यातल्या चवणहिप्परगा इथं, तर अहमदपूर तालुक्यात
विळेगाव इथं प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला.
****
जालना जिल्ह्यात १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आल्यानं अनेक
भागांमधली पिकं पाण्याखाली गेली आहेत. शहरात एका घराची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू
झाला. तालूक्यात पूरजळ इथल्या आरोग्य उपकेंद्रातही पाणी शिरलं. जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला मोठा पूर आला आहे. तर भोकरदन
तालुक्यातील केळना, अंबड तालुक्यातल्या दुधना,
गल्हाटी या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे खरीप
पिकांचे मोठे नुकसान झालं असून, घरांची पडझड झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात आवरगावचा पूल वाहून गेल्यानं धारूर - आडस तसंच मांडवा पुलावरुनही
पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबादकडे येणारा रस्ता बंद झाला होता. परळी ते बीड रस्त्यावर पांगरी नदीच्या पुलावरुन
पाणी वाहत असल्यानं, पाचशे वाहनं अडकली होती.
जिल्ह्यात
विविध ठिकाणी पुरात अडकलेल्या ७७ व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यात आली. केज तालुक्यातल्या
आरणगाव इथं बंधाऱ्यावरुन जाताना पाण्यात पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
केज विधानसभा मतदारसंघातल्या गावांमध्ये शंभर टक्के नुकसान झालं आहे. हे नुकसान
टक्केवारी मध्ये मोजता येणार नसल्यानं, पंचनामे न करता अगदी सरसकट शेतकऱ्यांना १००
टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.
जिल्ह्याचे
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली, जिल्ह्यात शेतीचं अतोनात नुकसान झालं असून, मुख्यमंत्री
तसंच उपमुख्यमंत्री यांना आपण प्रत्यक्ष बोलून परिस्थिती बाबत माहिती देणार असल्याचं
मुंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
शेतीचं पूर्ण नुकसान झालयं, आणि महत्वाचं, पशुधन वाहून
गेलं, जिल्ह्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. गायी, म्हशी होत्या, शेळ्या
होत्या, त्यामुळे पंचनामा हा विषय आता प्रशासन किंवा शासन पातळीवर महत्वाचा नाहीये.
नुकसान झालेलं याठिकाणी दिसतंय, जमिन खरडून गेल्यानं त्याच्यावरची पिकं पण पूर्ण गेलेली
आहेत, त्यामुळे सोयाबीन असो, कापूस असो, पूर्णपणाने नुकसान शेतकर्यांचं याठिकाणी झालेलं
आहे. काहीही हाताला लागत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांशी, माननीय उपमुख्यमंत्र्यांशी
बोलून ही परिस्थिती आम्ही त्यांना अवगत केली आहे. पूर्ण सरसकट मदत करण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडी सरकारचा राहील.
यवतमाळ
जिल्ह्यात उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात नागपूर आगाराची
एसटी बस काल सकाळी वाहून गेली होती. बसमधल्या दोघांना वाचवण्यात आलं असून, तिघांचे
मृतदेह सापडले आहेत, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे.
****
मराठवाडा,
मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
काल आढावा घेतला. मराठवाड्यात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत
पाटील, तसंच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. राज्य
तसंच जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी
बचाव आणि मदतकार्य तत्काळ सुरु करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा आपत्कालिन
मदत यंत्रणांना दिल्या आहेत.
****
ऑक्टोबर महिन्यापासून शिवभोजन थाळीची विनामूल्य
सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातल्या नागरिकांना आता पूर्वीप्रमाणे
१० रुपये देऊन शिवभोजन थाळी विकत घ्यावी लागेल. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं प्रमाण
कमी होत असल्यानं हा निर्णय घेतल्यांचं राज्य सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. याशिवाय
शिवभोजन केंद्रावर उपलब्ध असलेली पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे.
****
राज्यात नवीन महाविद्यालय तसंच अभ्यासक्रम सुरु
करण्यासाठी निश्चित केलेलं वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय, काल
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार
नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणं, तसंच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त
तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी, परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली
आहे. या संदर्भात विद्यापीठ अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात
येणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेचे तीन मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातल्या
देगलूरसह १४ राज्यातल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. आठ
ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून, १३ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
३० ऑक्टोबरला मतदान तर दोन नोव्हेंबरला मतमोजणी होईल. देगलूरचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब
अंतापूरकर यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेतली जात आहे.
****
राज्यात
काल दोन हजार, ८४४ नवे
कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४४ हजार, ६०६ झाली आहे. काल ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ९६२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के
झाला आहे. काल तीन हजार २९ रुग्ण बरे
झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २६ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार, ७९४
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, बीड
आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल ४१ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात २१, औरंगाबाद १३, लातूर सात, परभणी चार, जालना तीन, तर नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले.
****
जालना जिल्ह्यातले हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक, शिवभक्त कीर्तनकार
हरिभक्त परायण ताजोद्दीन महाराज शेख यांच्या पार्थिव देहावर, काल घनसावंगी तालुक्यातल्या
बोधलापुरी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातल्या जामदे
इथं ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यानिमित्त परवा सोमवारी कीर्तन करत असताना, ताजोद्दीन महाराज
यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला, त्यात त्यांचं निधन झालं. जन्मानं मुस्लीम असलेले
ताजोद्दीन महाराज शेख यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगिकारली होती.
****
हवामान - गुलाब चक्रीवादळाचा कमी दाबाच्या
क्षेत्राचा प्रभाव ४८ तास कायम राहणार असल्यानं, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment