Monday, 27 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वैद्यकीय उपचारातल्या समस्या दूर करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन या आरोग्य अभियानाचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण केल्यानंतर ते आज बोलत होते. तंत्रज्ञानाद्वारे आयुष्मान भारत योजनेनं देशभरातल्या रुग्णांना जोडण्यासाठी केलेलं कार्य अधिक विस्तारीत केलं जात असून, योग्य व्यासपीठ दिलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानामुळे आता संपूर्ण देशभरातल्या रुग्णालयांच्या डिजिटल आरोग्य सुविधा एकमेकांशी जोडणार आहेत, याअंतर्गत, देशबांधवांना आता एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार असून, प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक माहिती डिजिटली सुरक्षित राहील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

गेल्या सात वर्षांत, देशातल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी जे अभियान सुरु आहे, ते अभियान आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे, आजही अशा मोहिमेची सुरुवात होत आहे, जिच्यात भारतातल्या आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

१३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल ग्राहक, सुमारे ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते, सुमारे ४३ कोटी जनधन बँक खाती इतक्या व्यापक प्रमाणात परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा जगात कुठेही नाही, या डिजिटल सुविधा रेशनपासून प्रशासनापर्यंत जलद, पारदर्शकरित्या सामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८६ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ३८ लाख १८ हजार ३६२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८६ कोटी एक लाख ५९ हजार ११ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २६ हजार ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३६ लाख ७८ हजार ७८६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४७ हजार १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २९ हजार ६२१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २९ लाख ३१ हजार ९२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ९९ हजार ६२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज भारत बंद पुकारला आहे. या कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती, त्यास एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल हे आंदोलन करण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात बेलखेड आणि मसला या फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे काही काळ रिसोड -वाशिम आणि अकोला - रिसोड या राज्य मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं वाशिम शहरात या आंदोलनाला पाठिंबा देणारा मोर्चा काढण्यात आला.

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड, जव्हार, तलासरी या आदिवासी भागांत भारत बंद आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. या भागांत मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर दगड ठेवून बसलेले दिसून आले. ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

****

जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन महत्वाची भुमिका बजावत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोविड महामारीनंतर पर्यटन पुन्हा सुरु झालं असून, या क्षेत्रातल्या प्रत्येकास लाभ सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करुया, असं पवार यांनी म्हटलं आहे.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसी समाजातल्या सर्व बांधवांनी एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकांना सहकार्य केलं तरच समाजाचा विकास होऊ शकतो, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं ओबीसी हक्क परिषदेत बोलत होते. भानावर नाही आलो तर फार मोठं नुकसान होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

शिवसेना नेते अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना सक्तवसुली संचालनालयानं सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावलं आहे. आज सकाळी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीनं अडसूळ यांच्या कांदिवली इथल्या घरीही चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात सर्व न्यायालयात झालेल्या लोक अदालतीमध्ये एकूण चार हजार २०६ प्रकरणं निकाली निघाली. यात १३ कोटी ४६ लाख ९० हजार रुपयांची विविध प्रकरणात तडजोड झाली. जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...