Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 September 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २७ सप्टेंबर २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य
अभियानाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
लोकार्पण
·
येत्या एक ऑक्टोबरपासून प्लास्टीक आणि इतर कचऱ्याच्या निर्मुलनासाठी केंद्र सरकारचं स्वच्छ भारत अभियान
·
राज्यातल्या नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक हजार
२०० कोटी रुपयांच्या निधीची केंद्र सरकारकडे मागणी
·
असंघटीत
क्षेत्रातल्या प्रत्येक कामगारानं ई-श्रम पोर्टलवर
नोंदणी करण्याचं केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं
आवाहन
·
राज्यात तीन हजार, २०६ नवे कोविड बाधित रुग्ण;
मराठवाड्यात तीन जणांचा
मृत्यू तर १०४ बाधित
·
मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप; विविध दहा ठराव पारित
आणि
·
मराठवाड्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर, गुलाब चक्रीवादळामुळे आजही राज्यातल्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय
डिजिटल आरोग्य अभियानाचं लोकार्पण करणार आहेत. गेल्या
वर्षी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी या अभियानाची घोषणा केली होती. देशातल्या सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये
सध्या हे अभियान प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आलं आहे.
****
एकदा वापरुन टाकून देण्याचं प्लास्टीक आणि इतर
कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, केंद्र सरकार येत्या एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत,
स्वच्छ भारत अभियान राबवणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर
यांनी ही माहिती दिली. गांधीजींच्या स्वप्नातला भारत साकारणं
हे प्लास्टीक मुक्ती अभियानाचं उद्दिष्ट आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीनं स्वच्छतेला सर्वोच्च महत्त्व आहे.
ही जगातली सर्वात मोठी स्वच्छता मोहीम ठरणार असून, ७६ लाख
टनांहून जास्त घनकचरा पुनर्प्रक्रीयेसाठी देशभरातून गोळा होणार असल्याचं ठाकुर
म्हणाले.
****
नक्षलग्रस्त राज्यांच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं
आहे. नक्षली कारवायांबाबत शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एक आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्रासह १० नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरीष्ठ अधिकारी
उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नक्षली
कारवायांमधे २३ टक्के घट झाली आहे, गेल्या दोन वर्षात संवेदनशील भागात विशेषतः महाराष्ट्र, ओदिशा
आणि छत्तीसगढ मध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं गृहमंत्री
म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक हजार
२०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी यावेळी
केली. केंद्रीय मंत्रिमंडळातले इतर मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते.
****
असंघटीत क्षेत्रातल्या प्रत्येक कामगारानं ई-श्रम पोर्टलवर
नोंदणी करावी, असं आवाहन, केंद्रीय
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईत असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ई-श्रम कार्ड वितरीत करताना काल ते बोलत
होते. या ई-श्रम पोर्टलवर देशातल्या प्रत्येक गाव आणि गल्लीतल्या असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांची नोंदणी होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत
चारशेपेक्षा अधिक व्यवसाय क्षेत्रांची नोंदणी या पोर्टलवर झाली असून, जे कामगार यावर नोंदणी करतील, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळणार असल्याचं यादव यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांची
वहन क्षमता कमी झाल्यानं, या क्षेत्राचं
संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं,
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गोदावरी मराठवाडा
पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक काल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
झाली, त्यावेळी ते बोलत होते. सर्व्हेक्षणानंतर
त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करुन शासनाला सादर
करावेत, प्रस्ताव प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी जागतिक बँकेकडे
पाठवण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांनी रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध
करून देण्याला प्राधान्य द्यावं, असं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं चिकलठाणा जिल्हा
रुग्णालयात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत
होते. जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टरांची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, आवश्यक
असणारी यंत्र सामुग्री याचा विभागनिहाय आढावा घेत, शासनाकडून
साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरणं, औषधी याचा वेळेत पुरवठा होत असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
****
औरंगाबाद तालुक्यातल्या शरणापूर, साजापूर,
पंढरपूर, नक्षत्रवाडी सिमेंट कॉक्रींटकरण
रस्ता आणि शरणापूर, साजापूर रस्ता रुंदीकरणासह, चौपदरी सिमेंट कॉक्रीट रस्त्याच्या बांधकामाचं भूमिपूजन, काल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी
खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज, माजी खासदार
चंद्रकांत खैरे, आदी उपस्थित होते.
पैठण तालुक्यातल्या टाके डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर रस्त्याच्या
रुंदीकरणासह सुधारणा कामाचं भूमिपूजनही चव्हाण यांच्या हस्ते काल झालं. यावेळी रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके तसंच माजी राज्यमंत्री
अनिल पटेल आदी उपस्थित होते.
****
राज्यात
काल तीन हजार, २०६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४४
हजार, ३२५
झाली आहे. काल ३६
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ८७०
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला
आहे. काल तीन हजार २९२
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६४
हजार २७ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २४
शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३७ हजार, ८६०
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १०४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल ३२ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात २७, लातूर १८,
उस्मानाबाद १५, नांदेड सहा, जालना पाच, तर परभणी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
समाजमनाला
कोणत्या प्रागतिक विचारांची गरज आहे, हे साहित्यिकांनी ओळखायला हवं, असं गृहनिर्माण
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल ४१व्या मराठवाडा साहित्य
संमेलनाचा समारोप आव्हाड यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. लोकशाही अबाधित
ठेवण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज असल्याचं ते म्हणाले.
संमेलनाध्यक्ष
बाबू बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आदी मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
या
संमेलनात दहा ठराव पारित करण्यात आले. मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करण्यात यावं, समृद्धी
महामार्गालगत असलेल्या बाजारपेठा, नवे उद्योग, प्रक्रिया उद्योग यासाठी दळणवळणाच्या
इतर सुविधांची उभारणी करावी, इंग्रजी शाळांमधूनही मराठीला प्रथम भाषेचा दर्जा द्यावा,
परभणी - मनमाड आणि लातूर- मुंबई रेल्वेमार्ग दुहेरी करावेत, तसंच रेल्वेचा नांदेड विभाग
मध्य रेल्वे विभागाशी जोडावा, अजिंठा- वेरुळला औरंगाबादशी उपनगरी रेल्वेमार्गानं जोडण्यासंदर्भात
या मार्गाचं सर्वेक्षण करावं, आदी मागण्या करणारे ठराव यावेळी पारित करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग
आणि केंद्र सरकारच्या 'वॅपकॉस लिमिटेड'
यांच्यात काल करार करण्यात आला. सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद
विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद इथं या करारावर स्वाक्षरी
केली. माहूरचं रेणुकादेवी मंदीर, दत्त
शिखर मंदीर, अनुसुया माता मंदिरासाठी 'रोप
वे' उभारणं तसंच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' आणि 'लिफ्ट'
उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत जवळपास ५१ कोटी रूपयांची निधी मिळणार आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या उदगीर तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख तथा हिंदी प्रचार सभेचे परीक्षा
मंत्री, सुरेश पुरी यांना काल प्रदान करण्यात आला. यावेळी
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीरला माहिती
विभागाचे उप माहिती कार्यालय आणि पत्रकार भवन लवकरच कार्यान्वित करण्यात
येणार असल्याचं जाहीर केलं.
****
मराठवाड्यातल्या
अनेक भागात सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूर
परिस्थिती निर्माण झाली आहे.
परभणी शहर, जिंतूर, पालम तसंच, गंगाखेड तालुक्यात काल
जोरदार पाऊस झाला. गंगाखेड
तालुक्यातल्या राणीसावरगाव आणि परिसरात तीन दिवसापासून सततच्या पावसामुळे गौतमी
नदी दुथडी भरून वाहत आहे. बेलवाडी इथंल्या नदीस सुद्धा मोठा पूर आला असून, नदीकाठच्या शेतातील पिके पाण्यामुळे सडून
जात आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तेरणा नदीला
पूर आला आहे. तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या बोरी धरण परीसरात परवा
रात्री जोरदार पाऊस झाल्यानं, पुन्हा एकदा
बोरी धरण पूर्ण भरलं आहे, यामुळे नळदुर्ग शहराजवळून
वाहणाऱ्या बोरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नळदुर्ग शहरातल्या नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनानं केलं आहे.
परंडा तालुक्यातलं सिना कोळगाव धरणही भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण
भरल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडलं जाणार आहे, या
पार्श्वभूमीवर धरण परिसर आणि नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ईसापूर धरणाच्या ११ दरवाजातून १८ हजार ७९१ घनफुट
प्रतीसेकंद वेगानं पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातल्या
हदगाव, हिमायतनगर, माहूर आणि
किनवट तालुक्यातल्या पेनगंगा नदीला पूर आला आहे. तर परभणी जिल्ह्यात होत असलेल्या
पावसामुळे नांदेड शहराजवळच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ
दरवाजे उघडण्यात आले आहेत.
डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे
उघडण्यात आले असून, एक लाख ११ हजार २०४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी
नदी पात्रात करण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचेही
१६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****
बीड
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव आणि मांजरा हे दोन्ही धरण भरले आहेत. माजलगाव
धरणाचे अकरा, तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर
करण्यात येत आहे. केज तालुक्यातल्या १२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या
परिसरात अनेक भागातले रस्ते वाहून गेले आहेत, तर पुलांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली
आहे, गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
पैठणच्या
जायकवाडी धरणात १३ हजार ७९३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असल्यानं, धरणाचा
पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
हवामान
गुलाब चक्रीवादळानं ओडीशाला धडक दिली असून, याचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही
जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे. आज आणि उद्या राज्यातल्या अनेक भागामंध्ये जोरदार
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज रायगड, रत्नागिरी, पुणे,
सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या
जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment