Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2021
Time 1.00 to 1.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात
आज सलग दुसऱ्या दिवशी पावसानं उघडीप दिली आहे, मात्र अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग
सुरु असल्याचं पूर परिस्थिती कायम आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या १५ दरवाजांतून दोन लाख ६२ हजार २०६ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून,
सखल भागात पाणी साचलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही जलाशयातून
पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा
नदीला मोठा पूर आला आहे. परभणी ते वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी इथल्या पूर्णा
नदीच्या पुलावरून या पुराचं पाणी वाहत आहे. त्यामुळे रहाटी वरील पुलावरील वाहतूक पूर्णतः
ठप्प झाली. या पुलाजवळ बांधकाम विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजुंनी अडथळे
उभारून रस्ता बंद केल्यामुळे परभणी ते नांदेड आणि परभणी ते हिंगोली कडील वाहतूक ठप्प
झाली आहे.
धुळे जिल्ह्यातल्या
अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे धुळे शहरातून
वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे.
****
बीड जिल्ह्यात
झालेल्या अतिवृष्टीत सहा लाख ६५ हजार ९१० शेतकऱ्यांचं पाच लाख २४ हजार २१२ हेक्टर वरील
पिकांचं नुकसान झालं आहे. या बरोबरच जिल्ह्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
तीनशेच्या जवळपास घराची तर जवळपास दोन हजार झोपड्यांचं नुकसान झालं आहे. ५७ लहानमोठी
पूलं वाहून गेली, तर ३२ तलाव फुटले आहेत.
दरम्यान,
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यास सर्वाधिक फटका बसला आहे.
या तालुक्यातल्या देवळा आणि आपेगाव या गावात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांना जिल्हा परिषद
शाळेत स्थलांतरित करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा,
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक उध्वस्त झालं असून, शेतकरी
संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन प्रत्येक नुकसानग्रस्त
घराला आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी, जनता दल
सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रेवण भोसले यांनी केली आहे. ते
आज उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला मोठा फटका
बसला असल्यामुळे ओला दुष्काळही तातडीने जाहीर करावा, असंही भोसले यांनी म्हटलं आहे.
****
देशव्यापी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८८ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ७५ लाख
३४ हजार ३०६ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८८ कोटी ३४ लाख ७०
हजार ५७८ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या २३ हजार ५२९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३११ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३७ लाख ३९
हजार ९८० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४८ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. काल २८ हजार ७१८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८
रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७७ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
राज्यातल्या
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती
आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. रस्त्यांसाठी दिलेल्या निधीचा विनियोग
व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचं निदर्शनास आलं, तर संबंधित कंत्राटदाराची
गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे, त्यालाही जबाबदार
धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना यावेळी दिले. संपूर्ण
रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करा, रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी
कृती आराखडा तयार करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी
होत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ४११ मतदान केंद्रावर आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात
आली असून, योग्य खबरदारी घेत असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी दिली.
पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मतदानासाठी येणाऱ्या
प्रत्येक मतदाराचं थर्मल स्कॅनिंग, तपासणी करुन त्यांना मतदान करण्यास अनुमती देण्यात
येईल. कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment