Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल
जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्यात
येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
· राष्ट्रीय
सेवा योजनेमध्ये कार्यरत युवकांनी देशाच्या विकासासाठी क्रियाशील होण्याचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांचं आवाहन.
· औरंगाबाद
जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी तातडीनं निधी उपलब्ध
करून देण्याचं जलसंपदा मंत्र्यांचं आश्वासन.
आणि
· ४१व्या
मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्यापासून औरंगाबादमध्ये प्रारंभ.
****
राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू
करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असल्याचं
त्या म्हणाल्या. राज्यात ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू
होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वी चे वर्ग सुरू होतील. यासाठी कृती दल
आणि राज्य सरकारनं तयार केलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू
असणार आहे. शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच पालकांची संमती आणि शाळेत उपस्थितीची सक्ती नसणार असल्याचं गायकवाड म्हणाल्या.
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा
घेतलेल्या असणे आवश्यक आहे.
****
भारतीय वायु सेनेसाठी ५६ सी २९५ एम डब्ल्यू
या वाहतूक विमानांची खरेदी करण्याकरता आज स्पेनच्या एअरबस डिफेन्स आणि स्पेस कंपनीसोबत
भारतानं करार केला. अलिकडेच सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समितीनं या खरेदीसाठी मंजुरी दिली
होती. भारतीय वायू सेनेच्या वाहतूक ताफ्याच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं ही विमानं महत्त्वाची
ठरणार आहेत. यामुळे उत्तर त्याचबरोबर ईशान्य क्षेत्र तसंच अंदमान आणि निकोबार मध्ये
भारतीय वायू सेनेच्या वाहतूक क्षमतेत देखील वाढ होणार आहे.
****
राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्यरत असलेल्या
युवकांनी देशाच्या विकासासाठी क्रियाशील व्हावं, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
म्हटलं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०१९-२० साठीच्या पुरस्कारांचं वितरण आज सकाळी
त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
महात्मा गांधी यांच्या आदर्शांपासून एनएसएसच्या वैचारिक अभिमुखतेनं प्रेरणा घेतली असल्याचं
राष्ट्रपती म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर आणि केंद्रीय
क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री निसीत प्रामाणिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुणे इथल्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयातला
विद्यार्थी मनोज गुंजाळ याला, तर अकोला इथल्या श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची
विद्यार्थिनी सपना बाबर हिला, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात
आले.
****
पुणे शहरातलं प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण
असलेल्या रिंग रोडचं भूमी अधिग्रहण राज्य सरकारनं करावं, आणि केंद्र सरकार या प्रकल्पाचा
सर्व खर्च करून प्रकल्प पूर्ण करेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक
मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात केली. सिंहगड रस्त्यावरच्या राजाराम पूल ते फन
टाईम या दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यात सर्व प्रकारचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न
करणं गरजेचं असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८१
वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या
डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे हाती घेतली
जातील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. परभणीत ते आज
वार्ताहरांशी बोलत होते. पूर्णा नदीवर चार ठिकाणी बंधारे उभारण्यास पाटबंधारे खात्यानं
मंजुरी दिली असून त्यापैकी तीन बंधारे परभणी जिल्ह्यात आणि एक बंधारा वसमत तालुक्यात
असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागांचे
आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना
दिल्या.
****
४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन
उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद इथं होणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या समारंभाला आमदार
सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक बाबू बिरादार
यांची निवड झाली आहे. दोन दिवसीय संमेलनात निमंत्रितांचं कविसंमेलन, विविध विषयावर
परिसंवाद, नाट्यप्रयोग, कथाकथन, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. परवा २६ तारखेला
संमेलनाचा समारोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
शेती पूरक उद्योगातून बायोगॅस, बायोडिझेल,
इथेनॉल यासारखे प्रक्रिया उद्योग उभारल्यानं उस्मानाबाद जिल्ह्याची निर्यातक्षम जिल्हा
अशी नवी ओळख तयार होऊ शकते, असं मत कृषिरत्न भैरवनाथ ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे.
उस्मानाबाद इथं आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित निर्यातदार मार्गदर्शन मेळाव्यात
ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्रानं नवउद्योजकांना सोयी सवलती देण्यासाठी एक खिडकी
योजना सुरू करावी तसंच उत्पादन आणि निर्यात वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय पातळीवर
प्रयत्न होण्याची गरज ठोंबरे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
आयटक प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी - बालवाडी
कर्मचारी युनियनसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी त्यांना देण्यात आलेल्या निकृष्ट
मोबाईल विरोधात आज औरंगाबाद जिल्हा परिषदेवर मोबाईल अंत्ययात्रा काढण्यात आली. अंगणवाडी
कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल बंद पडलेल्या कंपनीचे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे
आहेत, ते वारंवार खराब होतात, हे मोबाईल परत करण्याचे राज्यभर आंदोलन सुरु असतांना
औरंगाबाद जिल्हा परिषदेनं मोबाईल परत घेण्यास नकार दिल्यानं ही अंत्ययात्रा काढल्याचं
आयटकचे राज्य उपाध्यक्ष राम बाहेती यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं भारत सरकारच्या
युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेहरु युवा उस्मानाबाद केंद्रामार्फत आजादी का
अमृत महोत्सव फीट इंडीया फ्रीडम रन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment