Saturday, 25 September 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृहं २२ ऑक्टोबरपासून खुली करण्यास परवानगी देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

·      परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाचं पुन्हा समन्स, २८ सप्टेंबरला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची सूचना.

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचं वेळात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार.

·      ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला औरंगाबादमध्ये प्रारंभ.

आणि

·      प्रख्यात स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचं निधन.

****

राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृहं २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती - एसओपी तयार करण्याचं काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. कृती दल सदस्य खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास तसंच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आज चर्चा केली.

****

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालय -ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात परब यांना याआधी ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.

****

केवळ भाषांतर किंवा पाठांतरापुरता संस्कृत भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजे असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. रामटेकच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी इथल्या उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. संस्कृत भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचं पाऊल या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलेली संतपीठाची सुरुवात आणि  आज संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची रत्नागिरी इथं होत असलेली सुरुवात हे दोन सुवर्ण क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचं वेळात साडेसहा वाजता न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राला संबोधित करणार आहेत. कोविड महामारीची आव्हानं, दहशतवादाचं उच्चाटन, जलवायू परिवर्तन आणि अन्य काही महत्वाच्या मुद्द्यांवर मोदी आपल्या भाषणात बोलणार असल्याचं आमच्या विशेष वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पंतपधान नरेंद मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असेल. दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

****

जालना जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक कामं करण्याबरोबरच प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कामे पूर्ण करताना प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची कामं आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर,आमदार नारायण कुचे यांनीही विविध कामांसाठी जलसंपदा मंत्र्यांकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

****

औरंगाबाद इथं आज ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलतांना त्यांनी मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी शासनानं समिती स्थापन केली असल्याचं सांगितलं. पैठण इथं संतपीठही लवकरच पूर्णवेळ कार्यान्वित होत असल्याचं ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार हे आहेत आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या कमला भसीन यांचं आज पहाटे निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगानं आजारी होत्या. महिला हक्क चळवळीच्या लढ्यात त्यांचं विशेष योगदान होतं. दक्षिण आशियाई भागात भसीन यांनी महिला हक्क आंदोलन पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ‘क्योंकि मै लडकी हूं’, ‘मुझे पढना है’ या त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय होत्या. भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, ही पुस्तकं ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.

****

लातूर जिल्ह्यात नवनवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, तसंच जिल्ह्याला ‘क्रीडा केंद्र’ करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुधाकर शृंगारपुरे यांनी म्हटलं आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजित फिट इंडिया फ्रीडम दौडचं उद्घाटन आज शृंगारपुरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या दौडमध्ये सहभाग नोंदवला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा इथंही युवा संकल्प दौंडच आयोजन करण्यात आलं होतं. केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून संकल्प दौडचं उद्घाटन केलं.

नेहरू युवा केंद्राची नांदेड शाखा आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि खेळ मंत्रालयाच्या वतीनं आज नांदेड इथंही फिट इंडिया रन घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. 

रत्नागिरी इथंही नेहरू युवा केंद्राच्या पुढाकारानं आज विशेष दौड आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय सेवा योजना तसंच राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचे विद्यार्थी या दौडमध्ये  सहभागी झाले होते.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवडी इथं वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज औरंगाबाद-नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जवळपास दिड तास नागरिकांनी रस्ता अडवल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज बिलं न भरल्यानं महावितरण कंपनीनं आठ दिवसांपासून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

//********//

No comments: