Monday, 1 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाजात व्यत्यय

·      राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान- निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर विविध पक्षांची टीका

·      वक्फ कायद्याबाबतच्या याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      जागतिक एड्स दिवस विविध उपक्रमांनी साजरा

आणि

·      मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. त्यापूर्वी सदनाचं कामकाज सुरू होताच, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनातील दिवंगत माजी सदस्य अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक सभागृहात सादर केलं. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, विरोधकांच्या गदारोळातच आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

 

राज्यसभेत आज सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यांनी नमूद केलं. लोकशाहीच्या सक्षमतेबाबत पंतप्रधान म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्यसभेत नवीन सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सदनाचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ७२ लाखांहून अधिक कारागीरांनी नोंदणी केली आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. आतापर्यंत २३ लाख कारागीरांना अपेक्षित प्रशिक्षण तर सात लाख लाभार्थींना २३ कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन निधी देण्यात आल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह सर्वच ठिकाणी निवडणूक केंद्रांवर पथकं दाखल होत आहेत. निवडणूकीच्या मतदानासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. ज्या कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना दोन तासांची सवलत देण्याचा आदेशही शासनानं दिला आहे.

****

या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री १० वाजता हा प्रचार संपेल. 

 

मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, तसंच सोलापूर जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही पैठण तालुक्यात सभा घेतल्या.

****

राज्यात काही मतदारसंघांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं मत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. २० नगरपालिका आणि काही प्रभागांमधल्या निवडणुका पुढं ढकलायचा निर्णय आयोगानं घेतला आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, मात्र हा निर्णय इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं मत नोंदवलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली. मतदान एका दिवसावर आलेलं असताना असा निर्णय घेणं हे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

****

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून, या निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. आयोगाने आपल्या निर्णयाचा सहानभूतीपूर्वक पुर्नविचार करावा अशी मागणी चव्हाण यांनी या निवेदनातून केली आहे.

****

देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगताच्या क्षमतेचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ते आज बोलत होते. AI आधारित तंत्रज्ञानाच्या काळात आपणही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

वक्फ दुरुस्ती कायदा, २०२५ अंतर्गत वक्फ मालमत्ता नोंदणीसाठी सहा महिन्यांची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. वक्फ मालमत्ता धारकाला नोंदणीत येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर, वक्फ न्यायाधिकरणासमोर सहा डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करता येईल, असा पर्याय न्यायालयानं सुचवला आहे.

****

एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिवस पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या वतीनं सायकल फेरी काढण्यात आली. चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयातून सुरूवात झालेली ही फेरी शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण करत आयएमए हॉल इथं विसर्जित झाली.

**

लातूर इथं सिध्देश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीपर सादरीकरण केलं. यावेळी त्यांनी समाजात एड्सबाबत जागरूकता वाढवून 'सुरक्षेचा घेऊन पुढाकार एड्समुक्त भारताचा निर्धार' करण्याचं आवाहन केलं.

****

राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आठ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

****

कापूस, सोयाबीन मका ही पिके हमी भावाने विकता यावी यासाठी शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ आणि ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणी करावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यात आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. तर सोयाबीन तसंच मका खरेदीसाठी नऊ ठिकाणी ११ केंद्रं उभारली आहेत.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे तीन ते पाच डिसेंबर दरम्यान मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांसाठी ही सफर पूर्णपणे नि:शुल्क आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या आठ डिसेंबरपर्यंत मोफत रक्तगट तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञांमार्फत सर्व नागरिकांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे.

****

दित्वा चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं आहे. परिणामी तमिळनाडू तसंच कर्नाटकमधे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वार वाहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद अहिल्यानगर इथं झाली. त्याखालोखाल पुणे तसंच नाशिक इथं दहा अंश, बीड इथं दहा पूर्णांक तीन, तर जळगाव इथं १० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सहा, धाराशिव १३ पूर्णांक सहा तर परभणी इथं १६ पूर्णांक सात दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई - दिनांक 01.12.2025 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे प्रादेशिक बातमीपत्र

Audio - آکاشوانی‘خبریں‘ تاریخ : 01.12.2025 ‘وقت: دوپہر 01.50

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच अभिनेते धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक या सदनातल्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंध महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या विजेतेपदाबद्दल सभागृहानं या महिलांचं अभिनंदन केलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, विरोधकांनी विशेष मतदार यादी पुनरिक्षणासह विविध मुद्दे उपस्थित करत घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी या सदस्यांना शांत राहून कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन केलं, मात्र घोषणाबाजी सुरुं राहिल्यानं सदनाचं कामकाज सुरवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांचंही स्वागत करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राधाकृष्णन यांचा सामान्य पार्श्वभूमीतून उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास देशाच्या लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो, असं नमूद केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह पुढे जाण्यासाठी चर्चा करेल आणि महत्त्वाचे निर्णय घेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. उपसभापती हरिवंश आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सभापतींचं स्वागत केलं.

****

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात, १८व्या लोकसभेचं सहावं अधिवेशन सुरू होत असल्याचं सांगितलं. संसद ही राष्ट्राच्या अपेक्षा, जनतेच्या आकांक्षा, लोकशाही मूल्यं आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी व्यक्त करण्यासाठीचं सर्वोच्च व्यासपीठ असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व सदस्य लोकशाही परंपरा पाळतील आणि सक्रिय सहभागातून या अधिवेशनाला उत्पादक आणि अर्थपूर्ण बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला.

****

अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हिवाळी अधिवेशन हे फक्त एक औपचारिकता नाही, तर राष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ते नवी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला. भारताने प्रत्येक वेळी लोकशाहीची भावना आणि उत्साह जपत खऱ्या अर्थाने लोकशाही जगली आहे, अशा घटना राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करतात, असं पंतप्रधान म्हणाले.

****

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज जम्मू काश्मीरमधल्या काही भागात छापे टाकले. पुलवामा, शोपियाँन सह दक्षिण काश्मीरमध्ये आठ वेगवेगळया ठिकाणी हे छापा सत्र सुरु आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात एनआयएनं इरफाम मौलवीच्या निवासस्थानाची झडती घेतली.

****

एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिन पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात जागतिक एड्स दिनाच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीनं काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथच वार्ताहरांशी बोलत होते. कोणीही न्यायालयात गेलं म्हणून निवडणुकीला विलंब करणं, ही पद्धत आजवर लागू झाली नव्हती. या विषयावर निवडणूक आयोगाकडे माहिती मागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून त्यांनी आज पैठण इथं माध्यमांशी संवाद साधला. निवडणुका स्थगित करण्याच्या मुद्दयावर शिंदे यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच बोलणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.

****

दरम्यान, राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपणार असून, या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात बार्शी - लातूर महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व बार्शी इथून तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना भरधाव ट्रकची कारला धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राजस्थान इथं सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेत काल महाराष्ट्रानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य पदकं जिंकली. सायकलिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिद्धी शिर्के आणि मंगेश ताकमोगे यांनी पाच फेऱ्यांच्या एलीट शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. कोल्हापूर विद्यापीठाच्या सायली आरंडेनं सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत दोन कास्य पदकं मिळवली, तर महिलांच्याच स्क्रॅच प्रकारात पुणे विद्यापीठाच्या आदिती डोंगरेनं रौप्य पदक जिंकलं.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १५ बैठका होतील. या अधिवेशनात १३ विधेयकं चर्चेला येणार असून, २०२५-२६ साठीच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानही होणार आहे.

अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हिवाळी अधिवेशन हे फक्त एक औपचारिकता नाही, तर राष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ते नवी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला. भारताने प्रत्येक वेळी लोकशाहीची भावना आणि उत्साह जपत खऱ्या अर्थाने लोकशाही जगली आहे, अशा घटना राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करतात, असं पंतप्रधान म्हणाले.

****

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव २०२५चं उद्घाटन करणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातल्या २५ राज्यांमधल्या सुमारे ३०० लखपती दीदी आणि स्वयंसहायता गटातल्या महिला या महोत्सवात सहभागी होतील. महाराष्ट्रासह हरियाणा, अरुणाचल प्रदेश, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि गुजरात ही राज्य या महोत्सवात सहभागी होत आहेत.

****

एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिन पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात जागतिक एड्स दिनाच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

गीता जयंती आज साजरी होत आहे. पाच हजार वर्षापूर्वी करुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीतेचे कालातीत उपदेश दिले, त्या क्षणाचं स्मरण या दिवशी केलं जातं. गीता जयंती हा केवळ धार्मिक दिवस नसून, तो भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या वैश्विक ज्ञानाची आठवण करुन देतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये विशेषत: तरुणांमध्ये पोलिसांबद्दलची सार्वजनिक धारणा बदलण्याची तातडीची गरज असल्याचं सांगून, व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव वाढवून हे शक्य असल्याचं म्हटलं आहे. रायपूर इथं काल ६०व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेत ते बोलत होते. नॅटग्रीड अंतर्गत एकत्रित केलेल्या माहितीचा प्रभावी वापर करण्याचे तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे या प्रणालींना जोडून कृतीशील बुद्धिमत्ता निर्माण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

****

छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथं ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी २७ जणांवर एकूण ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२४ मध्ये तुळतुली इथं झालेल्या चकमकीत या नक्षलवाद्यांचा समावेश होता.

****

मतदारयाद्या पुनरिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं आठवडाभरानं वाढवली आहे. नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधे सध्या ही प्रक्रीया सुरु आहे. सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रारूप मतदार याद्या १६ डिसेंबरला, तर अंतिम मतदारयाद्या येत्या १४ फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील.

****

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपणार असून, या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.

दरम्यान, न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काल जाहिर केला. यानुसार त्यानुसार १० डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, आवश्यकता भासल्यास २० डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.

****

या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण, आणि बीड जिल्ह्यात बीड नगरपरिषदेत प्रचारसभा घेणार आहेत.

****

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडगोळीनं पटकावलं आहे. लखनौमधे झालेल्या अंतिम सामन्यात काल त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जोडीचा १७-२१, २१-१३, आणि २१ -१५ असा पराभव केला.

****

मलेशियात इपोह इथं झालेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारतावर १-० असा निसटता विजय मिळवला. भारताकडून मोहित एच. एस. आणि पवन मलिक यांनी उत्तम खेळ केला, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...