Monday, 1 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १५ बैठका होतील. या अधिवेशनात १३ विधेयकं चर्चेला येणार असून, २०२५-२६ साठीच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानही होणार आहे.

अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हिवाळी अधिवेशन हे फक्त एक औपचारिकता नाही, तर राष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ते नवी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला. भारताने प्रत्येक वेळी लोकशाहीची भावना आणि उत्साह जपत खऱ्या अर्थाने लोकशाही जगली आहे, अशा घटना राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करतात, असं पंतप्रधान म्हणाले.

****

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव २०२५चं उद्घाटन करणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातल्या २५ राज्यांमधल्या सुमारे ३०० लखपती दीदी आणि स्वयंसहायता गटातल्या महिला या महोत्सवात सहभागी होतील. महाराष्ट्रासह हरियाणा, अरुणाचल प्रदेश, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि गुजरात ही राज्य या महोत्सवात सहभागी होत आहेत.

****

एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज जगभरात एड्स दिन पाळला जात आहे. या निमित्तानं देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतल्या विज्ञान भवनात जागतिक एड्स दिनाच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

गीता जयंती आज साजरी होत आहे. पाच हजार वर्षापूर्वी करुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीतेचे कालातीत उपदेश दिले, त्या क्षणाचं स्मरण या दिवशी केलं जातं. गीता जयंती हा केवळ धार्मिक दिवस नसून, तो भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या वैश्विक ज्ञानाची आठवण करुन देतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये विशेषत: तरुणांमध्ये पोलिसांबद्दलची सार्वजनिक धारणा बदलण्याची तातडीची गरज असल्याचं सांगून, व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव वाढवून हे शक्य असल्याचं म्हटलं आहे. रायपूर इथं काल ६०व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेत ते बोलत होते. नॅटग्रीड अंतर्गत एकत्रित केलेल्या माहितीचा प्रभावी वापर करण्याचे तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे या प्रणालींना जोडून कृतीशील बुद्धिमत्ता निर्माण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

****

छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथं ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी २७ जणांवर एकूण ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२४ मध्ये तुळतुली इथं झालेल्या चकमकीत या नक्षलवाद्यांचा समावेश होता.

****

मतदारयाद्या पुनरिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं आठवडाभरानं वाढवली आहे. नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधे सध्या ही प्रक्रीया सुरु आहे. सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रारूप मतदार याद्या १६ डिसेंबरला, तर अंतिम मतदारयाद्या येत्या १४ फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील.

****

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपणार असून, या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.

दरम्यान, न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काल जाहिर केला. यानुसार त्यानुसार १० डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, आवश्यकता भासल्यास २० डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.

****

या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण, आणि बीड जिल्ह्यात बीड नगरपरिषदेत प्रचारसभा घेणार आहेत.

****

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडगोळीनं पटकावलं आहे. लखनौमधे झालेल्या अंतिम सामन्यात काल त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जोडीचा १७-२१, २१-१३, आणि २१ -१५ असा पराभव केला.

****

मलेशियात इपोह इथं झालेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारतावर १-० असा निसटता विजय मिळवला. भारताकडून मोहित एच. एस. आणि पवन मलिक यांनी उत्तम खेळ केला, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...