Saturday, 20 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान-उद्या मतमोजणी

·      धर्माबाद इथं पैसे वाटपाचा आरोप-निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन

·      बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

·      रामायण-महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ-पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

आणि

·      टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार कर्णधार-शुभमन गिलला विश्रांती

****

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली.

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत साडे ३७ टक्क्यापेक्षा जास्त, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी जवळपास ४६ टक्के मतदानाची नोंद झाली.

 

हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषदेसाठी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत छपन्न टक्के मतदान नोंदवलं गेलं.

बीड जिल्ह्यात परळी इथं सुमारे ४७ टक्के, अंबाजोगाई सुमारे ५०टक्के, किल्ले धारूर सुमारे ५४ टक्के, तर बीड नगर परिषदेसाठी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६२ टक्क्यांहून अधिक मतदान नोंदवलं गेलं.

 

जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि नऊसाठी आज शांततेत मतदान झालं.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीचे १६ प्रभाग तसंच नगराध्यक्ष पदासाठी मतदान झालं. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुमारे ८० टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पैठणच्या चार जागांसाठी सुमारे साठ टक्के, तर गंगापूर इथं ७५ टक्के मतदान झालं.

 

नांदेड जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत मुखेड नगर परिषदेसाठी ३६ टक्के धर्माबाद नगर परिषदेसाठी सुमारे ३० टक्के मतदान झालं. कुंडलवाडी, भोकर आणि लोहा नगरपरिषदेच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी अनुक्रमे ४३ टक्के, ३३ टक्के आणि ३७ टक्के मतदान झालं.

दरम्यान, धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरीत्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं आहे. पोलिस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, आज झालेल्या मतदानासह गेल्या दोन तारखेला झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक मुंबईत राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं चेन्निथला यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्मा-धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

शिवसंग्राम पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी सांगितलं आहे. लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तसंच पुणे इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी १७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांना जामीन मिळालेला आहे. त्यासाठी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे जामीन होते. पण चाकूरकर यांचं निधन झाल्यानं, नवीन जामीन देण्यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

****

सक्तवसुली संचलनालय - ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं मात्र याप्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे.

****

रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तके नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारी उत्तम मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. आज पुण्यात, पुणे पुस्तक महोत्सवात फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्सया विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारताचं परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायला हवं, असंही जयशंकर यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज - बजाजनगरात आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. सामाजिक विचार मंच, टेकडी पर्यावरण समिती, विघ्नहर्ता गणपती मंदिर समिती तसंच परिसरातील स्वच्छता प्रेमींच्या पुढाकाराने एक दिवस एक परिसर या प्रमाणे बजाजनगर इथं विविध परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. गाडगेबाबांनी दिलेला दशसूत्री संदेश प्रत्येकाने अंमलात आणण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंत व्यंकटराव कांबळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

****

टी -२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं आहे. सूर्यकुमार यादव कडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल याला उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात स्थान पुन्हा स्थान मिळालं आहे.

****

१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे. दुबईत सकाळी साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या दोन्ही संघांनी काल उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज देवीच्या मंचकी निद्रेने प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी सुरू होणाऱ्या या मंचकी निद्रेनंतर २८ डिसेंबरच्या पहाटे देवी सिंहासनारूढ होईल, त्याच दिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. चार जानेवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा, होम हवन, तसंच जलकुंभ यात्रा होणार आहे.

****

जालना-बीड मार्गावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक कंटनेर जालना पोलिसांनी आज ताब्यात घेतला, या कारवाईत पोलिसांनी ४३ लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक, मोबाईल, असा एकूण ७३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कंटेनर चालक शिवम देशमुख याच्या विरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका कारवाईत चंदनझिरा पोलिसांनी आज राजूर मार्गावर एका वाहनातून १२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

अजमेर उर्साकरीता रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी अजमेर – हैदराबाद रेल्वेची एक विशेष फेरी होणार आहे. ही रेल्वे नांदेड मार्गे धावेल, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या संपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

राज्यात आज सर्वात कमी सहा अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं सहा पूर्णांक चार, नाशिक इथं सहा पूर्णांक नऊ, पुण्यात आठ पूर्णांक एक तर यवतमाळ इथं नऊ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments: