Saturday, 20 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या १४३ पदांसाठी मतदान शांततेत सुरू आहे. ही मतदान प्रक्रीया सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहील. यापूर्वी, राज्यातील २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या सर्व मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायत आणि पैठण, गंगापूर नगर पालिकेतील प्रत्येकी दोन प्रभागांसाठी शांततेत मतदान सुरू आहे. फुलंब्रीत ३० पुर्णांक १५ टक्के आणि गंगापूर इथं १७ पुर्णांक ७५ टक्के मतदान झाल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद आणि रेणापूर नगरपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान सुरु आहे. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत निलंगा इथं २२ पूर्णांक १० टक्के आणि रेणापूरला २७ पूर्णांक ९४ टक्के मतदान झालं. निलंग्यात नगराध्यक्ष पदासाठी ७, आणि २३ नगरसेवक पदांसाठी ८७ उमेदवार तर रेणापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि १७ नगरसेवक पदांसाठी ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर ओझर चांदवड मधील सहा जागांसाठी मतदान सुरू असून सकाळच्या सत्रात पाच पूर्णांक ४६ शतांश टक्के मतदान झालं. मतदान करण्यासाठी सरकारी आणि अन्य खासगी नोकरदारांना दोन तासाची सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

****

गडचिरोली नगर परिषद आणि आरमोरी नगर पंचायतीसाठी मतदान सुरु असून गडचिरोलीत १६ पुर्णांक १७ आणि आरमोरीत १६ पुर्णांक ३४ टक्के इतकं मतदान झालं आहे.

****

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्धच्या मनी लॉन्ड्रिंग तक्रारीची दखल घेण्यास नकार देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला अंमलबजावणी संचालनालय-ईडीने आव्हान दिले आहे, ईडीने यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. ईडीने आपल्या याचिकेत कनिष्ठ न्यायालयाच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत एजन्सीच्या तक्रारीवर कारवाई करण्यास नकार देणाऱ्या निर्णयाचे अपिलीय पुनरावलोकन करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

****

आज सशस्त्र सीमा दलाचा स्थापना दिवस, यादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सशस्त्र सीमा दल अढळ समर्पण, सेवा आणि त्यागाच्या सर्वोच्च परंपरा प्रतिबिंबित करते असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी व्यक्त केले. कर्तव्याप्रती सशस्त्र सीमा सुरक्षा दलाची निष्ठा ही राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आव्हानात्मक भूप्रदेश आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत देशाचे रक्षण आणि सेवेसाठी सशस्त्र सीमा दल नेहमीच सतर्क असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

गृहमंत्री अमित शहा यांनीही सशस्त्र सीमा दलाच्या स्थापना दिनानिमित्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटकाळी नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा दलाने नेहमीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावल्याचं आपल्या संदेशात शहा यांनी म्हटलं आहे.

****

भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात काल 'अमूल्य' ही नवीन पिढीची 'फास्ट पेट्रोल व्हेसल' नौका दाखल झाली. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली ही नौका, 'अदम्य-श्रेणी' मालिकेतील आठपैकी तिसरी नौका ठरली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं वर्षा निवासस्थानी काल अंध महिलांच्या  जागतिक टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करून संवाद साधला.

भारतीय संघाने एकही सामना न हरता अपराजित राहून अंतिम सामना फक्त १२ षटकांत जिंकून इतिहास घडवला असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. या संघाने राष्ट्राचा, तिरंग्याचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान उंचावला असून संपूर्ण देश या कामगिरीने आनंदित झाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करून, अखंड मेहनतीच्या बळावर हार न मानता, प्रत्येक खेळाडूने आपली संघर्षकथा साकारली असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या नोकरी आणि आर्थिक मदतीबाबत सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत या १०० दिवसांच्या अभियानाअंतर्गत नांदेड शहरातील सर्व शासकीय कार्यालयं तसंच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंधासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथले छायाचित्रकार बैजू पाटील यांना जागतिक स्तरावरील अमेरिकेतील मानाचा ‘रिफोकस वर्ल्ड अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारे पाटील हे पहिले भारतीय आहेत. १०९ देशाच्या हजारो छायाचित्रकारांमधून बैजू पाटील यांची निवड झाली आहे. राजस्थानातील भरतपूर अभयारण्यात बैजू पाटील यांनी पाण्याखाली शिकार करणारा ‘स्नेक बर्ड’ आणि त्याच्या चोचीतील मासा हिसकावण्यासाठी आकाशातून झेप घेणारा राखाडी बगळा यांचे छायाचित्र टिपले होते, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

****

No comments: