Saturday, 30 March 2019

आकाशवाणी, औरंगाबाद – संध्याकाळी 06.00 चे बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 03 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 03 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१९ दुपारी १.०० वा.

****



 लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मदयविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

****



 भारत आणि अमेरिका संयुक्त कार्य गटाची सोळावी बैठक काल वॉशिंग्टन इथं झाली. या बैठकीत दक्षिण आशियातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी चर्चा झाली. पाकिस्तानच्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तान सरकारला केलं आहे. बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तान सरकारला हे आवाहन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्याच्या कामी भारतानं दिलेल्या योगदानाची अमेरिकेनं प्रशंसा केली आहे.

****



 अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं नव्हतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भात चौकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला. अंतराळातील उपग्रह उध्वस्त करण्याची ताकद असल्याच्या चार देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे आणि मिशन शक्तीच्या यशामुळे भारताने स्वतःला जागतिक अंतराळ सत्ता म्हणून घोषित केलं आहे, असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामधल्या मोरन आणि गोहपूर इथं निवडणूक प्रचारास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, आसाममध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या पाच जागांच्या निवडणूकीसाठी  ५० उमेदवार तसंच करिमगंज इथून १४ उमेदवार उभे आहेत. सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसमधून खासदार सुस्मिता देव, राज्याचे माजी मंत्री प्रद्युत बोरडोलाई आणि वरिष्ठ नेते भूवनेश्वर कलिता तर भाजपकडून विधानसभेचे उपसभापती कृपनाथ मल्ला, आमदार रुपक शर्मा आणि दिलीप सैकीया हे उमेदवार आहेत.

****



जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि दहशतवादाच्या नाड्या आवळण्यासाठी केंद्र सरकारनं संबंधित सर्व विभागांचा समन्वय करण्यासाठी एक टेहळणी गट तयार केला आहे. या गटामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिस दल प्रतिनिधी, गुप्तचर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षकांमधून दहशतवादासा छुपा पाठिंबा देणाऱ्यांविरोधातही हा गट कारवाई करणार आहे. तसंच हा गट दहशतवादाला निधी पुरवणाऱ्या जाळ्याचा तपास करून कारवाई करणार आहे. या गटाची दर आठवड्यातून एकदा बैठक होणार आहे.  

****



 बोलिवियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संस्कृती, व्हिसा, खाण, अंतराळ, पारंपरिक औषधी, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे प्रकल्प या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना बोलिवियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच उभय देशांच्या दोन्ही प्रमुखांमध्ये राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी अधिक चर्चा करण्यात आली. भारतानं बोलिवियाला आर्थिक प्रकल्प राबवण्यासाठी १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची क्रेडिट लाईन देण्याची तयारीही दाखवली आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 03 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 03 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.03.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

बातमीपत्र

३०  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आणखी अकरा उमेदवारांची नावं आज जाहीर केली. आजच्या यादीत जम्मू - कश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे. बिहारमध्ये महाआघाडीनंही २३ उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा, काँग्रेसच्या मीरा  कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे शरद यादव आणि रघुवंश प्रसादसिंह यांची नावं समाविष्ट आहेत. तर कम्युनिस्ट पक्षानं, बिहारमधले पूर्व चंपारण आणि मधुबनी या मतदारसंघाचे आपले उमेदवार जाहीर केले. काँग्रेस पक्षानंही आज आणखी १२ उमेदवारांची नावं जाहीर केले. यामध्ये बिहारचे चार, ओरीसाचे सात, आणि उत्तर प्रदेशच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.



 भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गुजरात मधील गांधीनगर इथून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. यानिमित्तानं अहमदाबाद मधल्या सरदार पटेल यांच्या प्रतिमे पासून भव्य रोड शो आणि शोभा यात्रेचा कार्यक्रम तसेच मानवी साखळीचंही अयोजन  करण्यात आलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतु वघानी यांनी सांगीतलं. शाह यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह घटक पक्षांचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

 लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगानं कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातल्या बारा जणांची ‘सदिच्छादूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. या मध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, उषा जाधव,  क्रिकेटपटू स्मृती मानधना, धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे,  नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तसंच दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

****



 काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीराकुमार यांना बिहार मधल्या सासाराम इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षानं आज एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत देशभरातून तीनशे पाच उमेदवार घोषित केले आहेत.

****



जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर काल सुटला. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षासाठी सोडली आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रात्री उशिरा डॉ. पाटील यांना कळवलं असल्याचे त्यांनी आकाशवाणी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दरम्यान भाजपाकडून अगोदरच विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.

****



 केंद्र सरकारनं आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. भविष्य निधी तसंच राष्ट्रीय बचत पत्रावर आठ टक्के तर किसान विकास पत्रावर सात दशांश सात टक्के असा दर लावण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पाच वर्षांच्या बचत योजनेचे व्याज दर आठ दशांश सात टक्के करण्यात आले असून बचत खात्यांवर वार्षिक चार टक्के  व्याज देण्यात येणार आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ दशांश पाच टक्के असे निश्चित करण्यात आले आहेत.

****



 मलेशियात एपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात, आज भारताचा सामना पोलंड सोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हा सामना सुरू होईल. भारतीय संघ यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला असून, अंतिम सामना येत्या शनिवारी दक्षिण कोरिया सोबत होणार आहे.

*****

***

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...