आकाशवाणी औरंगाबाद
बातमीपत्र
३० मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता
पक्षानं आणखी अकरा उमेदवारांची नावं आज जाहीर केली. आजच्या यादीत जम्मू - कश्मीर, कर्नाटक,
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे. बिहारमध्ये
महाआघाडीनंही २३ उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा, काँग्रेसच्या
मीरा कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे शरद यादव
आणि रघुवंश प्रसादसिंह यांची नावं समाविष्ट आहेत. तर कम्युनिस्ट पक्षानं, बिहारमधले
पूर्व चंपारण आणि मधुबनी या मतदारसंघाचे आपले उमेदवार जाहीर केले. काँग्रेस पक्षानंही
आज आणखी १२ उमेदवारांची नावं जाहीर केले. यामध्ये बिहारचे चार, ओरीसाचे सात, आणि उत्तर
प्रदेशच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गुजरात
मधील गांधीनगर इथून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. यानिमित्तानं अहमदाबाद मधल्या
सरदार पटेल यांच्या प्रतिमे पासून भव्य रोड शो आणि शोभा यात्रेचा कार्यक्रम तसेच मानवी
साखळीचंही अयोजन करण्यात आलं असल्याचं भाजपचे
प्रदेशाध्यक्ष जीतु वघानी यांनी सांगीतलं. शाह यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह घटक पक्षांचे इतर नेतेही
उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगानं कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातल्या
बारा जणांची ‘सदिच्छादूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. या
मध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, उषा जाधव, क्रिकेटपटू स्मृती मानधना, धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तसंच दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत
यांचा समावेश आहे.
****
काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना भाजप युतीचे गोपाळ
शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीराकुमार यांना
बिहार मधल्या सासाराम इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षानं आज एक पत्रक जारी
करून ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत देशभरातून तीनशे पाच
उमेदवार घोषित केले आहेत.
****
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी
मध्ये सुरु असलेला तिढा अखेर काल सुटला. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षासाठी
सोडली आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक
चव्हाण यांनी रात्री उशिरा डॉ. पाटील यांना कळवलं असल्याचे त्यांनी आकाशवाणी प्रतिनिधींशी
बोलताना सांगितले. दरम्यान भाजपाकडून अगोदरच विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव
खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.
****
केंद्र सरकारनं आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी
लघु बचत योजनांवरचे व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. भविष्य निधी तसंच राष्ट्रीय बचत पत्रावर
आठ टक्के तर किसान विकास पत्रावर सात दशांश सात टक्के असा दर लावण्यात आला आहे. ज्येष्ठ
नागरिकांसाठीच्या पाच वर्षांच्या बचत योजनेचे व्याज दर आठ दशांश सात टक्के करण्यात
आले असून बचत खात्यांवर वार्षिक चार टक्के
व्याज देण्यात येणार आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ दशांश पाच
टक्के असे निश्चित करण्यात आले आहेत.
****
मलेशियात एपोह इथं सुरू असलेल्या सुलतान
अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात, आज भारताचा सामना पोलंड सोबत
होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हा सामना सुरू होईल.
भारतीय संघ यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला असून, अंतिम सामना येत्या शनिवारी दक्षिण
कोरिया सोबत होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment