आकाशवाणी औरंगाबाद
बातमीपत्र
२९ मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या १०
मतदार संघांसह देशातल्या १३ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशातल्या एकूण ९७ मतदारसंघांमध्ये
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. यापैकी, नांदेड लोकसभा मतदारसंघातून
काल १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर उस्मानाबाद मतदार संघातून एका
उमेदवाराने काल माघार घेतली.
दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला राज्यात सात मतदार संघामध्ये मतदान
होणार आहे. यामध्ये विदर्भातल्या भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर, वर्धा,
चंद्रपूर, रामटेक आणि नागपूर मतदार संघांचा समावेश आहे. या सात जागांसाठी ११६ उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठीच्या
मतदान केंद्रांवर १५ ‘अत्यावश्यक किमान सुविधा’ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार, महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरता, प्रत्येक
मतदान केंद्रावर पाळणा घराची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक
मतदान केंद्रावर मतदानाच्या तीन रांगा असतील. त्यामध्ये एक रांग पुरुषांसाठी, दुसरी
महिलांसाठी आणि तिसरी ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांसाठी असेल, अशी माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.
****
दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत यादृष्टीनं
प्रयत्न करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे. काल नांदेड
इथं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. दिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग
नोंदवण्यासाठी सोशल मीडीयाचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी
पथकानं नांदेड जिल्ह्यात दोन आठवड्यात केलेल्या कारवाईत एकूण ११ लाख ४३ हजार रूपयांचा
माल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली.
****
यवतमाळ इथं, वाहन तपासणीच्या दोन घटनांमध्ये
बेहिशेबी रोकड आणि मद्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. काल रात्री झालेल्या या तपासणीत,
घाटंजी तालुक्यात एका कारमधून सहा लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. दुसऱ्या एका घटनेत
केळापूर तालुक्यात एका वाहनातून सुमारे बारा लाख रुपये किमतीचं मद्य जप्त करण्यात आलं.
या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
****
रायगड जिल्हयात आचारसंहिता भंगाचे
आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली.
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी लावलेले ६५५ फलक काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान,
३२० जणांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून ८३८ परवाना शस्त्रे जमा करून
घेण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जैश ए मोहम्मदच्या कारवायांकडे पाकिस्तानचं
अजूनही डोळेझाक करणं, निराशाजनक असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार
यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या सहभागाचे आणि पाकिस्तानातल्या
त्याच्या अस्तित्वाचे सविस्तर पुरावे देऊनही, पुलवामा इथली घटना हा दहशतवादी हल्ला
असल्याचं, पाकिस्तान स्वीकार करत नाही, हे खेदजनक असल्याचं ते म्हणाले. पाकिस्ताननं
त्यांच्या देशातल्या दहशतवादी संघटनांच्या विरूद्ध काय कारवाई केली, हे अद्यापही सांगितलेलं
नाही, असं रवीशकुमार यांनी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीर इथं बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या
चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले तर पाच सैनिक जखमी झाले. या परिसरात दहशतवादी लपून
असल्याची माहिती मिळाल्यावर दहशतवादविरोधी कारवाई केली असल्याचं जम्मू काश्मीर चे पोलीस
महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं.
****
मलेशियात एपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक
हॉकी स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात, आज भारताचा सामना पोलंड सोबत होणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हा सामना सुरू होईल. भारतीय
संघ यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला असून, अंतिम सामना येत्या शनिवारी दक्षिण कोरिया
सोबत होणार आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान
रॉयल्स या संघात सामना होणार आहे. हैदराबाद इथल्या राजीव गांधी क्रीडा संकुलावर रात्री
आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
//************//
No comments:
Post a Comment