आकाशवाणी औरंगाबाद
बातमीपत्र
३१ मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क
बजावता यावा, यासाठी राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
जाहीर केली आहे. कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील, अशा कर्मचाऱ्यांनाही
ही सुटी लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, सार्वजनिक
उपक्रम, तसंच कृषी - अकृषी आणि अन्य विद्यापीठं,
अभिमत विद्यापीठं, शिक्षण संस्था या सर्वांना ही अधिसूचना लागू राहील.
मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद,
लातूर या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी १८ एप्रिल या दिवशी, तर तिसऱ्या टप्प्यातील
जालना, औरंगाबाद जिल्ह्यांना २३ एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.
केंद्र शासनाच्या अखत्यारितील स्वायत्त महामंडळं,
प्रतिष्ठानं यांनाही या अधिसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
आज एकतीस मार्च, २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अखेरचा
दिवस. भारतीय रिझर्व्ह बँकेनं,
आज सर्व बँकांना कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज सर्व शासकीय लेखा
आणि देयकांचं नियमित काम सुरू ठेवण्याचा सल्ला भारत सरकारनं दिला होता. रिझर्व्ह बँकेनं,
एक स्वतंत्र परिपत्रक काढून, ऑनलाईन व्यवहारही आज सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.
****
रेडिओ हे देशातील सर्व मतदारांपर्यंत पोहचणारं सर्वात
चांगलं माध्यम असल्याचं वरिष्ठ निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय
निवडणूक आयोगानं काल नवी दिल्ली इथं मतदार जागरुकता या विषयावर देशभरातल्या कम्युनिटी
रेडिओ स्टेशन्सच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी, मतदारांमध्ये
जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करू, असं आश्वासन या सर्व रेडिओ स्टेशन्सच्या
प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाला दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल दुपारी ढगांच्या गडगडाटासह
वादळी पाऊस झाला. वाशी, तेरखेडा परिसरात गारपीट झाली, तर येरमाळ्यासह लगतच्या काही
भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं.
वाशी तालुक्यात वीज पडून सुनीता शिंदे या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
****
मुंबई - गोवा महामार्गावर खासगी वातानुकूलित बसला
आग लागली. ही दुर्घटना मध्यरात्री एकच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून
काही अंतरावर घडली. कुडाळ येथून अग्निशमन दलाच्या पथकानं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.
या बसमध्ये देशी आणि विदेशी असे ४० पर्यटक होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
मात्र, रस्त्याचं काम सुरू असलेल्या जागेवर बसनं पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूनं वाहतूक
ठप्प झाली होती, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी शहरातल्या उड्डाण पुलाखाली सापळा रचून, पोलिसांनी
काल दोन संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. एक गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस
आणि धारदार शस्त्रं बाळगणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातल्या करतारसिंग टाक आणि कुलदिपसिंग
टाक या दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहनासह धारदार शस्त्रं, असा
७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
लोकशाही सुदृढ आणि सक्षम असेल, तर देशाच्या विविधांगी
विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकानं मतदानाचा हक्क
प्राध्यान्याने बजावणं नितांत गरजेचं असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या आंबेडकर महाविद्यालयापासून
आज सकाळी रन फॉर डेमॉक्रसी ही मतदान जागरुकता मॅरेथॉन दौड काढण्यात आली. यावेळी ते
बोलत होते. सुरुवातीला मतदानाच्या प्रतिज्ञेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. त्यानंतर
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्र सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी झेंडा
दाखवून मॅरेथॉनचं उद्घाटन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये सुमारे
५०० जणांनी सहभाग नोंदविला.
*****
***
No comments:
Post a Comment