Thursday, 28 March 2019

Tex - AIR News Bulletin Aurangabad 28.03.2019.......20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०१९ - २०.००

****

सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६१६ तर दुसऱ्या टप्प्यासाठी ६३१ अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक आयोगाकडून आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषेदत ही माहिती देण्यात आली.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या तिसऱ्या टप्प्यात चार एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. पाच एप्रिलला अर्जांची छाननी होईल, तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यात औरंगाबाद आणि जालना या दोन जागांसह, जळगाव, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणगंले या मतदार संघांत २३ एप्रिलला मतदान होईल.



आज पहिल्याच दिवशी, रायगड लोकसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी, हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी, जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर, रावेर मतदार संघातून भाजप शिवसेनेच्या उमेदवार रक्षा खडसे, तर औरंगाबादहून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. जालना तसंच रायगड मतदार संघातून प्रत्येकी एका अपक्ष उमेदवारानेही आज उमेदवारी अर्ज दाखल केला



जालना लोकसभा मतदार संघातून आज पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ अर्ज तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून, ४१ जणांनी ८७ अर्ज नेल्याचं वृत्त आहे.

****

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता या मतदार संघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातले भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार डॉ खुशाल बोपचे यांनी आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेन्द्र पटले यांनी मात्र अर्ज मागे घेतलेला नाही, या मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे सुनील मेंढे हे अधिकृत उमेदवार आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाना पंचबुदे यांचं त्यांच्यासमोर आव्हान असेल.

****

हातकणंगले मतदार संघातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. २०१४ मध्ये शेट्टी यांची एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार रुपये एवढी होती, ती आता दोन कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपयांची झाली आहे.

****

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावली आहे. काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये एकाच मथळ्याखाली ठाकरे यांच्याबाजूने सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणी ४८ तासात खुलासा न केल्यास, पेड न्यूज मार्गदर्शक तत्वानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

****

औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेना आणि एमआयएम अशी थेट लढत होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडी - एमआयएम पक्षाचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जाती धर्माचं राजकारण न करता शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या तीन एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं, इम्तियाज यांनी सांगितलं. ते सध्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

****

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं आज दिल्ली इथं आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. शेतीमालाला किमान हमी भाव, अनुसूचित जाती-जमातीला खाजगी क्षेत्रात नोकरी आणि शिक्षणात आरक्षण, संसद आणि राज्य विधिमंडळात महिलांना ३३ टक्के

 आरक्षण, उत्पन्नाच्या ५ टक्के सार्वजनिक आरोग्यावर खर्च, आदी मुद्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्रांवर १५ ‘अत्यावश्यक किमान सुविधा’ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या, यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरता, प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या तीन रांगा असतील.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...