Wednesday, 27 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – डीआरडीओ नं उपग्रह मारक क्षेपणास्त्राची आज, यशस्वी चाचणी घेतली. पृथ्वीच्या कक्षेत, तीनशे किलोमीटर उंचावरचा एक उपग्रह, या क्षेपणास्त्रानं नष्ट केला. मिशन शक्ती नावाचं हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज सर्व प्रसार माध्यमांद्वारे देशवासियांशी बोलत होते. अवघ्या तीन मिनिटांत साध्य केलेल्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी डीआरडीओ च्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ अशी क्षमता असलेला भारत हा जगातला चौथा देश असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. दळण-वळणासह, कृषी, संरक्षण, प्रसार माध्यम, अशा सर्वच क्षेत्रात आपले उपग्रह उत्तम कार्य करत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****



 रेल्वेची तिकीटं तसंच विमानांच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असल्या प्रकरणी निवडणूक आयोगानं रेल्वे मंत्रालय, तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. गेल्या दहा मार्चला लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर, देशभरात आदर्श आचार-संहिता लागू झाली. त्यानंतर रेल्वे तिकीटं तसंच विमानाच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधानांचं छायाचित्र असणं हा  आचार-संहितेचा भंग असल्याचं, निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसनं याबाबत तक्रार दाखल केली होती. रेल्वेनं याबाबत उत्तर देताना, आपण गेल्या आठवड्यातच या  बाबतचा निर्णय घेतला असल्याचं सांगतानाच,  आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, सुमारे एक लाख तिकीटांची छपाई झालेली असल्याचं सांगितलं.

****



 लोकपाल समितीच्या आठ सदस्यांना आज मुख्य लोकपाल न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष यांनी शपथ दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकपाल वर चार न्यायिक सदस्यांसह एकूण आठ सदस्याची नेमणूक केली आहे. न्यायिक सदस्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, प्रदीपकुमार मोहंती, अभिलाषा कुमारी आणि छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अजयकुमार त्रिपाठी यांचा समावेश आहे. इतर सदस्यांमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या निवृत्त प्रमुख अर्चना रामसुंदरन, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेंद्रसिंह आणि इंद्रजीत प्रसाद यांचा समावेश आहे.

****



 पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यपर्णाच्या प्रक्रियेसाठी, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचं पथक लंडनला जाणार आहे. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे, त्याच्या जामीन अर्जावर परवा शुक्रवारी लंडन कोर्टात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात सह संचालक पदाच्या समकक्ष अधिकारी आवश्यक कागदपत्रांसह लंडनला रवाना होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 गोव्यात सुदीन ढवळीकर यांचं उपमुख्यमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी गोव्यात भाजप आमदारांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र गोमांतकवादी पक्षातले ढवळीकर यांचे दोन सहकारी मंत्री काल रात्री भारतीय जनता पक्षात आले. पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी या दोघांनी, विधिमंडळात आपला स्वतंत्र गट स्थापन करून तो भारतीय जनता पक्षात विलीन केला. ढवळीकर यांच्या जागी आमदार दीपक पावसकर यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.

****



 लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. शुक्रवार पर्यंत इच्छुकांना अर्ज मागे घेता येतील. या दुसऱ्या टप्प्यात, राज्यातल्या दहा मतदारसंघात कालपर्यंत एकूण २९५ अर्ज दाखल आहेत.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे दिंड्या पैठण नगरीत गोदावरीच्या किनाऱ्यावर डेरेदाखल आहेत. या यात्रेत काल निर्याण दिंडी काढण्यात आली, आज छबिना मिरवणूक काढण्यात येत आहे. उद्या सायंकाळी नाथषष्ठी यात्रेचा समारोप होणार आहे. भानुदास एकनाथ च्या जयघोषात भाविक नाथ समाधीचं दर्शन घेत आहेत.

****



 सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारत सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. काल भारतानं साखळी सामन्यांच्या तिसऱ्या लढतीत मलेशियाचा 4-2 असा पराभव केला. यजमान मलेशियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. या स्पर्धेत आज, भारताचा सामना कॅनडासोबत होणार आहे. पोलंड आणि जपान तसंच कोरिया आणि मलेशिया संघातही आज सामने होणार आहेत.

*****

***

No comments: