Wednesday, 27 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.03.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७  मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****



v गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन पैकी दोन आमदारांचा गट भारतीय जनता पक्षामध्ये विली

v लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भरलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी 

v मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या याचिकांवरचा निर्णय न्यायालयाकडून राखीव

आणि

v उस उत्पादक शेतकऱ्यांची नावावर ३२८ कोटी रूपयांचं कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड शुगर कारखान्याचे अध्यक्ष आणि वित्त अधिकाऱ्याला अटक

****



 गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन पैकी दोन आमदारांनी विधीमंडळात आपला वेगळा गट स्थापन करून हा गट भारतीय जनता पक्षामध्ये विलीनीकरण केला आहे. या विलिनीकरणामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधीमंडळात भाजपच्या आमदारांची संख्या आता १४ झाली आहे. आज पहाटे पावणे दोन वाजता हे राजकीय नाट्य घडलं. पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या दोन आमदारांनी काल पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी विधीमंडळात आपला स्वतंत्र गट स्थापन केला होता, त्यानंतर मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार आपला हा गट भारतीय जनता पक्षात विलिन करण्याचं पत्र गोवा विधानसभेचे अध्यक्ष मायकेल लोबो यांच्याकडे सोपवलं. या पत्रावर आमदार मनोहर आजगावकर आणि आमदार दिपक पावसकर यांच्या  सह्या असून पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर यांची मात्र या पत्रावर सही नाही. आजगावकर हे सध्याच्या गोवा सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत तर ढवळीकर हे वाहतूक मंत्री आहेत.

****



 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या दुसऱ्या टप्प्यासाठी भरलेल्या अर्जांची आज छाननी होईल, शुक्रवार पर्यंत अर्ज मागे घेता येतील.



 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून २ जणांनी, लातूर मधून १५ उमेदवारांनी, बीड मतदार संघातून ५९ उमेदवारांनी, नांदेड मतदार संघातून ३० जणांनी, तर अमरावती मतदार संघातून ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

उस्मानाबाद मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत, अर्ज दाखल केला.



 परभणी लोकसभा मतदार संघातले शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव तसंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.



 हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील, कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप नेते ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



 लातूर लोकसभा मतदारसंघात काल एकूण हा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आतापर्यंत एकूण पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचारालाही प्रारंभ केला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..

भारतीय जनता पार्टी कडून सुधाकर शिंगारे, संजय थोर्वे यांचे अर्ज दाखल झाले. भाजपाने  उमेदवारी नाकारल्या मुळे भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर येथले पत्रकार डॉक्टर सिद्धार्थ सुर्यवंशी यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या वतीनं संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार म्हणून मच्छिंद्र कामन्तं यांनी पदाधिकाऱ्याच्या उपस्थित अर्ज दाखल केला. बहूजन वंचित विकास आघाडीच्या वतीने राम गारकर यांनीही अर्ज दाखल केला असून, इतर सारे अपक्ष आहेत. भाजपच्या प्रचाराची गतीशी इतर पक्ष कशी स्पर्धा करतात, हे येत्या काळात दिसून येईल.

आकाशवाणी बातम्यांसाठी अरुण समुद्रे लातूर .



 अमरावतीत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, महाघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा यांच्यासह १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बुलढाणा मतदारसंघात सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

****



 परभणीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल परभणी इथं जाहीर सभा घेतली. विमुद्रीकरण, राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण, आदी मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

****



 पालघरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार राजेंद्र गावित यांनी काल शिवसेने प्रवेश केला. गावीत यांना पालघर मतदार संघातून शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे.

****



 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या विदर्भातल्या सात लोकसभा मतदार संघातल्या उमेदवारी अर्जाची छाननी काल झाली. यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघातल्या सहा आणि रामटेक मतदारसंघातल्या तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, रामटेक मतदार संघातून एका उमेदवाराने काल आपला अर्ज मागे घेतला. भंडारा-गोंदिया मतदारसंघात ३४ पैकी २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

****



 काँग्रेस महा आघाडीतला जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले मतदार संघात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवेल असं, संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मात्र, असं असलं तरीही, अन्य मतदार संघात उमेदवार उभे न करता काँग्रेस आघाडीला मदत करण्याची आणि शिवसेना भाजप युतीला विरोध करण्याची आपली भूमिका कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायद्याला आव्हान देणाऱ्या तसंच समर्थन करणाऱ्या याचिकांवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. या याचिकांवरची अंतिम सुनावणी काल न्यायालयात पूर्ण झाली. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के  आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मात्र ही प्रवेश प्रक्रिये न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन असणार आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाडा तसंच विदर्भातल्या उस उत्पादक शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रं तयार करून त्यांच्या नावावर ३२८ कोटी रूपयांचं कर्ज उचलणारे गंगाखेड शुगर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि वित्त अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना काल पोलिसांनी अटक केली. गुट्टे यांनी विविध बँकातून या शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज उचलले आहे. काल दोघांनाही प्रथम सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या ५ मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीच्या मुख्य महोत्सवाला, साडे चारशे वर्षांची परंपरा असलेल्या नाथांच्या  निर्वाण दिंडीने प्रारंभ झाला. काल दुपारी गावातल्या नाथ मंदिर परिसरापासून नाथ मंदिर समाधी मंदिरापर्यंत ही निर्वाण दिंडी काढण्यात आली. जरी पटका, भानुदास महाराजांचे  निशाण, झेंडेकरी, विणकरी, अमृतराय संस्थांची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्या, अशा मानाच्या छत्र्यांसह ही दिंडी काढण्यात येते.  मानाच्या  पहिल्या २१ दिंड्यांसह जवळपास पाचशे दिंड्या पैठण नगरीत गोदावरीच्या किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. गोदावरी नदीत स्नान करून भानुदास एकनाथांचा जयघोष करत भाविक, नाथ समाधीचं दर्शन घेत आहेत.



 दरम्यान, नाथ षष्ठी उत्सवात काल सामुहीक विश्वशांती प्रार्थना घेण्यात आली. एकाच वेळी, एकाच ताल-सुरात, एकाच जागेवर उभे राहून किंवा बसुन संपूर्ण फड, दिंड्यांमध्ये तसंच नाथ समाधी मंदिरातून ही विश्व शांती प्रार्थना घेण्यात आली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारे सामुहिक विश्वशांती प्रार्थना  घेण्याचं हे दुसरं वर्ष आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि  संत एकनाथ महाराज हे शांतीब्रंम्ह असून त्यांनी विश्व शांतीचा संदेश  जगाला दिलेला आहे, या पार्श्वभूमीवर ही प्रार्थना घेण्यात येते.

****



 औरंगाबाद शहरालगत असलेल्या वाळूज जवळ अंबेलोहोळ इथं एका स्कॉर्पिओ गाडीनं धडक दिल्यानं दोन जणांचा मृत्यु झाला. रमेश भालेकर आणि हरिश्चंद्र यादव अशी मृत व्यक्तींची नावं असून जेवणानंतर शतपावली करत असतांना या गाडीनं त्यांना धडक दिली.



 फुलंब्री- राजूर रस्त्यावर आडगाव खुर्द शिवारात झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पांढरवाढीजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि एका मोटारगाडीच्या टक्करीमध्ये मोटारगाडील्या तिघा जणाचां मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्यामंध्ये पाटनूरचे उपसरपंच काँग्रेस कार्यकर्ते बच्चूराज देशमुख यांचा तसंच त्यांच्या आई आणि बहिणीचा समावेश आहे.

****



 बीड जिल्ह्यातल्या तापमानात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलं आहे.

****



 पुण्याच्या वस्तू सेवा कर कार्यालयातल्या दोन अधीक्षकांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयनं अटक केली. सेवा कर पूर्तता करण्यासाठी या अधीक्षकांनी तक्रारदाराला तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी एक लाख रुपये घेतांना या दोघांना काल अटक करण्यात आली.

*****

***

No comments: