Tuesday, 26 March 2019

Tex - AIR News Bulletin Aurangabad 26.03.2019.....20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०१९ - २०.००

****

भारतीय जनता पक्षानं, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांना लोकसभा निवडणूक लढवू नये, असं सांगितलं आहे. पक्षानं, यंदाच्या निवडणुकीत वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या अनेक विद्यमान खासदारांना संधी दिलेली नाही, लालकृष्ण अडवाणी, बी सी खंडुरी, करिया मुंडा यांच्यासह अनेक ज्येष्ठांच्या या यादीत आता मुरली मनोहर जोशी यांचं नावही समाविष्ट झालं आहे.

जोशी यांच्या कानपूर मतदार संघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षानं उत्तरप्रदेशातल्या २९ उमेदवारांची नावं आज जाहीर केली, यामध्ये केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुलतानपूर इथून, मनोज सिन्हा यांना गाझीपूर तर रिता बहुगुणा जोशी यांना प्रयागराज इथून, तर अभिनेत्री जया प्रदा यांना रामपूर इथून उमेदवारी देण्यात आली आहे. जया प्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. वरुण गांधी यांना पीलिभीत, तर भाजपचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांना चांदौलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधल्या दहा जागांचे उमेदवारही भाजपनं आज जाहीर केले.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या दुसऱ्या टप्प्यासाठी भरलेल्या अर्जांची उद्या छाननी होईल, २९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.



आज अखेरच्या दिवसापर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून २१ जणांनी, लातूर मधून १५ उमेदवारांनी, बीड मतदार संघातून ५९ उमेदवारांनी, नांदेड मतदार संघातून ३० जणांनी, तर अमरावती मतदार संघातून ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

उस्मानाबाद मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत, अर्ज दाखल केला.



परभणी लोकसभा मतदार संघातले शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव तसंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.



हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील, कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



अमरावती, इथं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, महाघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा यांच्यासह आज १७ उमेदवारांनी उमदेवारी अर्ज दाखल केले,

****

लातूर इथं, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचाराला आजपासून प्रारंभ झाला. शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून यावेळी प्रचार फेरी काढण्यात आली. भाजप प्रदेशाध्शक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून क़ॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ताळमेळ नसल्यामुळे ते पिछाडीवर गेले असल्याचं, दानवे म्हणाले.

****

परभणीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज परभणी इथं जाहीर सभा घेतली. विमुद्रीकरण, राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण, आदी मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

****

पालघरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेने प्रवेश केला. गावीत यांना पालघर मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

****

भंडारा-गोंदिया मतदारसंघात आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये ३४ पैकी २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

****

काँग्रेस महा आघाडीतला जागावाटपाचा तिढा सुटला नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर  लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं, संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मात्र, असं असलं तरीही, काँग्रेस आघाडीला मदत करण्याची आणि शिवसेना भाजप युतीला विरोध करण्याची आपली भूमिका कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

लातूर जिल्ह्यात आपण भारतीय जनता पक्षात काम करत होतो, मात्र पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष आघाडीकडून निवडणूक लढवत असल्याचं, डॉ सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उमेदवार निवडीसाठी पक्षानं, सामाजिक कार्याचा निकष न वापरता, धनशक्तीला अधिक महत्त्व दिल्याची टीका सूर्यवंशी यांनी केली.

****

No comments: