Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 30March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø लोकसभा निवडणुकीच्या
दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या दहा मतदार संघातून १७९ उमेदवार रिंगणात
Ø सर्वोच्च न्यायालयाच्या
अवमान प्रकरणी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस
Ø आगामी वित्त वर्षाच्या
पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर जैसे थे कायम
Ø यंदाचा ‘दुखी
राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर
आणि
Ø सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम लढत
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज मागे
घेण्याची मुदत काल संपली, राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर,
अकोला, अमरावती, बुलडाणा तसंच सोलापूर या दहा मतदारसंघात या टप्प्यात अठरा एप्रिलला
मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण १७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नांदेड मतदार संघातून एकूण ४१ जणांनी उमेदवारी अर्ज
मागे घेतले, आता या मतदार संघात काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर,
वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
परभणी मतदार संघात काल
चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे
आता १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं आमच्या वार्ताहरानी सांगितलं...
परभणी मतदार संघात विविध राजकीय पक्षाचे
१३ तर अपक्ष ४ उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार १७ असते तरी खरी लढत शिवसेना – भाजपचे
यूतीचे उमेदवार विजय जाधव, कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर आणि वंचित
बहूजन आघाडीचे अदमगीर खान मोहमद यांच्यात होईल.
आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीहून विनोद कापसीकर.
****
हिंगोली मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे हेमंत पाटील,
काँग्रेसचे सुभाष वानखेडे, आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार,
बीडमध्ये भाजपच्या डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे
बजरंग सोनवणे, यांच्यासह ३६ उमेदवार, तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसचे
मच्छिंद्र कामंत, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, आणि बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी,
यांच्यासह १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उस्मानाबादमध्ये एकूण १४ उमेदवार निवडणूक
रिंगणात असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानी
दिली.
उस्मानाबाद लोकसभा
मतदारसंघाच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उरले आहेत. यात शिवसेना भारतीय जनता पार्टीचे
ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे राणाजगजितसिंह पद्मसिंह
पाटील, बहुजन समाज पक्षाचे शिवाजी पंढरीनाथ वुमन आणि वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर
यांच्यासह अन्य दहा उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीतील चित्र स्पष्ट
झाले आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी बातम्यासाठी, उस्मानाबाद.
अमरावती मतदार संघातून सेना भाजप युतीचे आनंदराव
अडसूळ आणि काँग्रेस आघाडीच्या नवनीत राणा, बुलडाण्यातून सेना भाजप युतीचे प्रतापराव
जाधव आणि काँग्रेस आघाडीचे राजेंद्र शिंगणे, अकोल्यातून सेना भाजप युतीचे संजय धोत्रे,
काँग्रेस आघाडीचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, तर सोलापुरातून
भाजप सेना युतीचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे
आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
****
दरम्यान, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला
प्रारंभ झाला असून, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात कालपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल
झाले आहेत.
****
काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा
मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना
भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल.
****
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप
यांचे उमेदवारावरून एकमत होत नसेल तर हा मतदारसंघ भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास
आठवले यांच्यासाठी सोडावा, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, अविनाश महातेकर आणि
मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.
****
भारतीय
जनता पक्ष, लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात एक हजार प्रचार
फेऱ्यांचं आयोजन करणार आहे. या फेऱ्यांमध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप नेत्यांचा समावेश
असेल.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या कथित अवमान
प्रकरणी न्यायालयानं, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक
लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी, आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत निवडणूक आयोगाला
माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. हे निर्देश पाळले जात नसल्यासंदर्भात
दाखल, एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, ही नोटीस बजावली.
****
मतदान
पडताळणी पावती यंत्र - व्ही
व्ही पॅट मधून मिळणाऱ्या पावत्यांची पडताळणी
करण्याची सध्याची पध्दत, अधिक सुसंगत असल्याचं, निवडणूक आयोगानं, सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना पावती सर्वेक्षणाची संख्या वाढवता
येईल का, असं सर्वोच्च
न्यायालयानं, यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान,
आयोगाला विचारलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
केंद्र सरकारनं आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी
लघु बचत योजनांवरचे व्याज दर आहे तसेच ठेवले आहेत. भविष्य निधी तसंच राष्ट्रीय बचत
पत्रावर आठ टक्के तर किसान विकास पत्रावर व्याजाचा दर सात पूर्णांक सात दशांश टक्के
असा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पाच वर्षाच्या बचत योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक
सात दशांश टक्के कायम असून बचत खात्यांवर वार्षिक चार टक्के दरानं व्याज देण्यात येत
आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के असे आहेत.
****
जालना
इथले उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी ‘दुखी’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा
‘दुखी राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर झाला आहे. सहा एप्रिलला
गुढीपाडव्याच्या दिवशी जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे. २१ हजार रूपये, मान वस्त्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
आठवे अरविंद आत्माराम वैद्य स्मृती
पत्रकारिता पुरस्कार काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद
वैद्य यांना, प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला. तर युवा पत्रकारिता पुरस्कारानं पत्रकार विद्या गावंडे यांना सन्मानित करण्यात
आलं. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पुरस्कारला उत्तर देताना, वैद्य यांनी, लोकशाहीच्या लढ्यात आपणही खारीचा वाटा उचलल्याचं
सांगून तो सुवर्णक़ाळ आता येणे नाही असं मत व्यक्त केलं.
****
कोल्हापुरातले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत
शिंदे आणि त्यांचा सहकारी समीर शिनोळकर या दोघांना, लाचखोरी प्रकरणी गडहिंग्लज इथल्या
विशेष न्यायालयानं, तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तपासणी
नाक्यावर, ट्रकवर कारवाई करू नये यासाठी शिंदे यांनी दरमहा १० हजार रुपये लाच मागितली
होती. एप्रिल २०१५ मध्ये सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती.
****
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधील कापसाच्या गाठी ठेवलेल्या
गोदामाला काल सकाळी आग लागली. कापसाच्या गाठी जळाल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज
वर्तवण्यात येत आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी
विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची काल सांगता झाली, नवी दिल्ली इथल्या कृषी शास्त्रज्ञ
निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. के.पी विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलतांना ए.के.
मिश्रा यांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं.
****
उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती
कडून प्रमाणित केलेली जाहिरात प्रकाशित करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण
डोंगरे यांनी केलं आहे. उमेदवारांकडून प्रसारित होणाऱ्या, कोणत्याही माध्यम प्रकारातल्या
जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात
आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या किनवटचे नगराध्यक्ष, तसंच
नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध आचारसंहिता
भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना नगरपालिकेच्या नवीन टॅक्ट्ररचं लोकार्पण केल्याप्रकरणी
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मलेशियात
इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान
अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम
सामना, आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात होणार आहे. काल झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात
भारतानं पोलंडचा १०-० गोल अशा फरकानं पराभव केला.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू,
बी साईप्रणित, पारूपल्ली कश्यप, एच एस प्रणोय आणि कितांबी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व
फेरी गाठली आहे. तत्पूर्वी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उप-उपांत्य सामन्यांमध्ये पी
व्ही सिंधूनं, हाँगकाँगच्या डेंग जॉय झुऑनला, पुरूष एकेरीत साई प्रणितनं समीर वर्माला
पराभूत केलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंचांनी, डोळे उघडे ठेवून
आपली जबाबदारी पार पाडावी, असं रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानं
म्हटलं आहे. मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ
मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला लाभ नाकारण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर
कोहली बोलत होता.
*****
***
No comments:
Post a Comment