Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2019
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस पक्षानं
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर
केली आहे. शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल. पक्षाच्या
ज्येष्ठ नेत्या मीराकुमार यांना बिहारमधल्या सासाराम इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली
आहे. पक्षानं आज एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं
आतापर्यंत देशभरातून तीनशे पाच उमेदवार घोषीत केले आहेत.
****
बिहारमध्ये महाआघाडीने
निवडणुकीच्या तिसऱ्या ते सातव्या टप्प्यासाठीचं जागावाटप आज जाहीर केलं. पाटलीपुत्र,
सारन, दरभंगा या जागा राष्ट्रीय जनता दल लढवेल, तर पाटणा लोकसभा मतदार संघ काँग्रेसला
देण्यात आला आहे.
****
गुजरातमधल्या
बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणातल्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुजरात सरकारने दंडात्मक
कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई
यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत बिल्किस बानोनं गुजरात सरकारनं
देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली. २००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणी, गुजरात
उच्च न्यायालयानं, २०१७ च्या मे महिन्यात, पाच पोलिस आणि दोन डॉक्टरांना दोषी ठरवलं
होतं. त्यांच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर आणि पुराव्यांशी छेडछाडीचा गुन्हा सिद्ध झाला
होता. या प्रकरणी येत्या २३ एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे.
****
पश्चिम बंगालमधल्या
बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या एका
याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं व्होडाफोन आणि एअरटेल कंपनीकडून उत्तर मागितलं
आहे. या दोन्ही कंपन्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या तपासकार्यात सहकार्य करत नसल्याची
तक्रार, सीबीआयनं केली आहे. या प्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी आठ एप्रिलपर्यंत उत्तर
देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाची शिकवण दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या जीवनातून प्रतिबिंबीत झाल्याचं, संघाचे
ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. गोव्यात पणजी इथं, पर्रिकरांना श्रद्धांजली
देण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. पर्रिकर यांनी सामाजिक जीवनाचा एक मापदंड उभारल्याचं,
जोशी यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, गोव्याच्या राज्यपाल मृदुला
सिन्हा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी पर्रिकर
यांच्या कार्याला उजाळा देऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
जालना इथले उर्दू
शायर राय हरिश्चंद्र साहनी ‘दुखी’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘दुखी राज्य
काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर झाला आहे. सहा एप्रिलला,
गुढीपाडव्याच्या दिवशी, जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित
‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती
कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी दिली आहे. २१ हजार रूपये, मानवस्त्र
आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
आयपीएल क्रिकेट
स्पर्धेत पंचांनी, डोळे उघडे ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असं रॉयल चॅलेजर्स बेंगलोर
संघाचा कर्णधार विराट कोहली यानं म्हटलं आहे. काल मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात
झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला
लाभ नाकारण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर कोहली बोलत होता. रोहित शर्मानेही कोहलीच्या
या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
****
नवी दिल्ली इथं
सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन अंजिक्यपद स्पर्धेत काल भारतीय संघाचे पाच स्पर्धक
उपांत्य फेरीत पोहचले. शुभांकर डे यानं इंडोनेशियाच्या टॉमी सूगियार्तो ला १४-२१, २२-२०,
२१-११ असं हरवूनं पुरूष एकेरीची उपांत्यफेरी गाठली. किदाम्बी श्रीकांत, एच.एस रॉय अणि
बी साईप्रणित याआधीच उपांत्यफेरी पोहचले आहे.
दरम्यान, महिला
एकेरी सामन्यात पी.व्ही. सिंधू हिनं मूग्धा आग्रे हिला २१-८, २१-१३ असं हरवत अंतिम
१६ मध्ये स्थान मिळवलं.
****
मलेशियात एपोह
इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात,
आज भारताचा सामना पोलंड सोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजेच्या
सुमारास हा सामना सुरू होईल. भारतीय संघ यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला असून, अंतिम
सामना येत्या शनिवारी दक्षिण कोरिया सोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment