आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७
मार्च २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
मानवी कल्याण साधण्यासाठी शांतता आणि सुरक्षा महत्वाची
असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी म्हटलं आहे. ते क्रोएशियाची राजधानी जरबेग
इथं भारतीय समुदायांकडून आयोजित स्वागत संमारंभा़च्या कार्यक्रमात बोलत होते. दहशतवादाला
आश्रय आणि मदत करणाऱ्यांच्या विरोधात जागतिक समुहानं कारवाई करण्यासाठी एकत्र यायला
हवं, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी
आवश्यक ते सर्व उपाय करेल असं राष्ट्रपती म्हणाले.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
मजुरीचे दर वाढवण्यास निवडणूक आयोगानं मंजुरी द्यावी, अशी विनंती ग्रामीण विकास मंत्रालयानं
आयोगाकडे केली आहे. शेत मजुरांसाठी रोजंदारीचे हे दर ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेले
असल्याने, येत्या एक एप्रिलपासून ते वाढीव दरानं लागू होणं अपेक्षित आहे. मंत्रालयाची
ही मागणी मंजूर होण्याचे संकेत आयोगाकडून मिळाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गोव्यात उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून
अर्धचंद्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र गोमांतकवादी पक्षाचे ढवळीकर
यांच्या दोन सहकारी मंत्र्यांनी काल रात्री भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षांतर
विरोधी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी या दोघांनी, विधिमंडळात आपला स्वतंत्र गट
स्थापन केला होता, हा गट भारतीय जनता पक्षात विलीन करण्याचं पत्र, त्यांनी गोवा विधानसभेचे
अध्यक्ष मायकेल लोबो यांच्याकडे सोपवलं. त्यानंतर आता ढवळीकर यांच्या जागी आमदार दीपक
पावसकर यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या
पार्श्वभूमीवर भाजपनं आज आपल्या आमदारांची एक तातडीची बैठक बोलावली आहे.
****
लोकसभेच्या
दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्प्यात
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. शुक्रवार पर्यंत इच्छुकांना अर्ज मागे घेता येतील.
या
दुसऱ्या टप्प्यात, राज्यातल्या दहा मतदारसंघात कालपर्यंत एकूण २९५ अर्ज दाखल झाले.
यामध्ये नांदेड आणि बीड मतदार संघात सर्वाधिक प्रत्येकी ५९ उमेदवारांनी तर बुलडाणा
मतदार संघात सर्वात कमी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काल अखेरपर्यंत परभणीत १८,
हिंगोली ३८, नांदेड ५९, लातूर १५, बीड ५९, उस्मानाबाद २१, अमरावती ३६, अकोला १६, बुलडाणा
७ आणि सोलापूर मतदार संघातून २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
परभणीच्या गंगाखेड शुगर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर
रत्नाकर गुट्टे आणि वित्त अधिकारी दत्तात्रय गायकवाड या दोघांना न्यायालयानं १४ दिवसांची
पोलिस कोठडी सुनावली आहे. मराठवाडा तसंच विदर्भातल्या उस उत्पादक शेतकऱ्यांची बनावट
कागदपत्रं तयार करून, या दोघांनी त्यांच्या नावावर ३२८ कोटी रूपयांचं कर्ज उचललं होतं.
काल पोलिसांनी या दोघांना अटक करून, प्रथम सत्र न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणी
गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये ५ मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या
नाथषष्ठी महोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. सुमारे साडेचारशे ते
पाचशे दिंड्या पैठण नगरीत गोदावरीच्या किनाऱ्यावर डेरेदाखल आहेत. या यात्रेत काल निर्याण
दिंडी काढण्यात आली, आज छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी नाथषष्ठी
यात्रेचा समारोप होणार आहे.
****
इंडीयन
प्रीमीयर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल नवी दिल्ली इथं झालेल्या सामन्यात चेन्नई
सुपर कींग्जनं, दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करुन दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई संघासमोर
१४८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात दिल्ली संघानं १४७
धावा केल्या, यात शिखर धवनच्या ५१ धावांचा वाटा होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना, शेर्न
वाट्सननं ४४, तर महेंद्रसिंग धोनीनं नाबाद ३२ धावांच्या बळावर, चेन्नई संघानं, चार
गड्यांच्या मोबदल्यात दीडशे धावा करत, विजय मिळवला.
****
सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ कॅनडाशी
पडणार आहे. काल भारतानं तिसऱ्या
लढतीत मलेशियाचा ४-२ असा पराभव केला.
या विजयामुळे सात गुण मिळवून भारत दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. यजमान मलेशियाची
तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आज पोलंड आणि जपान तसंच कोरिया आणि
मलेशिया संघात सामने होणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment