Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
March 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समिती सदस्यानं, ‘मैं भी चौकीदार हूं’
या नावाच्या जाहिरातीची चित्रफीत सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित केल्याबद्दल,
निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. ही जाहिरात प्रसारित करताना, निवडणूक आयोगाच्या
सूचनांचं पालन का केलं नाही, असं आयोगानं म्हटलं असून, या प्रकरणी तीन दिवसांत उत्तर
देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांनी, आपल्या प्रमुख प्रचारकांची
यादी आज जाहीर केली. शिवसेनेच्या प्रचारकांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना
प्रमुख आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, चंद्रकांत खैरे, यांच्यासह वीस जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय
मंत्री नीतीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू आदी मान्यवरांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या यादीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे.
****
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार
निलेश राणे येत्या एक एप्रिलला सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाचे संस्थापक
अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुभाष पाटील हे येत्या तीन एप्रिलला
उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं राणे यांनी सांगितलं. या दोन्ही प्रतिष्ठेच्या जागांसह
आणखी काही जागा पक्षाकडून लढवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.
****
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या
उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आपण निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं पक्षात
प्रवेश केलेला नसून, कॉंग्रेसच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन पक्षात आल्याचं त्यांनी
सांगितलं. काँग्रेसकडून, उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून
त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते.
****
गोव्याच्या राज्य सरकारमध्ये काल मध्यरात्रीपासून झालेल्या घडामोडी पाहता, जनतेच्या
मनातली आपली प्रतिमा डागाळेल, असं गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी
म्हटलं आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष गोवा राज्य सरकारचा घटक पक्ष आहे. काल रात्री महाराष्ट्र
गोमांतकवादी पक्ष या दुसऱ्या घटक पक्षातले दोन आमदार भाजपत आले, त्यानंतर सुदीप ढवळीकर
यांचं, उपमुख्यमंत्रिपद काढून घेण्यात आलं, या पार्श्वभूमीवर सरदेसाई बोलत होते.
****
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली.
अमरावतीत ३६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल होते, त्यापैकी दोन अर्ज अपात्र ठरले
आहेत. या टप्प्यात २९ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान
केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहेत, या मतदान केंद्रांमध्ये, सुरक्षेपासून ते मतदान
केंद्राधिकारी पर्यंत सर्व जबाबदारी महिला सांभाळतील. ही मतदान केंद्रं “सखी मतदान
केंद्र” म्हणून ओळखली जाणार आहेत.
****
नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसला येत्या १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत तर मुंबई
नांदेड तपोवन एक्सप्रेसला येत्या २ एप्रिल ते १ मेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात एक वातानुकुलित
द्वितीय श्रेणी डबा वाढवण्यात आला आहे. तर धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस आणि मनमाड-धर्माबाद
एक्सप्रेसला येत्या १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात एक वातानुकुलित
द्वितीय श्रेणी डबा वाढवण्यात आला आहे.
तिरुपती-नगरसोल-तिरुपती आणि नांदेड-तिरुपती-नांदेड या रेल्वे गाड्यांना जून
महिन्यात प्रत्येकी चार फेऱ्या वाढवून देण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी
आणि दुष्काळी अनुदानाच्या याद्या बँकेत तातडीनं जमा कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव शिरस्कर यांनी केली आहे. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना
त्यांनी या मागणीचं निवेदन सादर केलं आहे. शासनाचे पैसे दोन महिन्यापासून तहसील कार्यालयात
येऊनही, महसूल विभागाच्या विस्कळीत कारभारामुळे शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याचा
आरोप त्यांनी केला.
****
धुळे शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ, आज तिथल्या महिलांनी
महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. शहराला सध्या चार ते पाच दिवसांच्या खंडानं पाणी पुरवठा
होत आहे.
****
No comments:
Post a Comment