Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
March 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१९ - २०.००
****
चौकीदारच्या रूपात आपण आपल्या कर्तव्याचं पालन करत असून
सार्वजनिक धनाचा दुरूपयोग होऊ देत नसल्याचं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मै भी चौकीदार कार्यक्रमांतर्गत
दूरदृश्य संवाद प्रणाली- व्हिडीओ कॉन्फरसिंग प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेशी
संवाद साधतांना ते आज बोलत होते. २०१४ मध्ये जनतेनं आपल्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रीय
लोकशाही आघाडीला बहुमत दिलं, आणि देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या काळात
आपण भ्रष्टाचारापासून देशाचं रक्षण करण्याचे अथक प्रयत्न केले असल्याचं ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात आपल्याला जे यश मिळालं त्याचं श्रेय लोकांच्या सहभागाला असल्याचं
ते म्हणाले. स्वच्छता अभियानाला लोकांच्या सहभागामुळे जनआंदोलनाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं
ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाचं सरकार केंद्रात
सत्तेत आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा बहाल करेल असं पक्षाध्यक्ष राहुल
गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज विजयवाडा इथं जाहीर सभेत बोलत होते. या संदर्भात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची टीका गांधी
यांनी केली. अत्याधिक गरीब परिवारांना काँग्रेसचं सरकार प्रतिवर्षी बहात्तर हजार रुपयांची
रक्कम किमान उत्पन्न योजनेच्या माध्यमातून देणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
उत्तरप्रदेशमधल्या अमेठी मतदारसंघाबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातूनही निवडणुक
लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.
के. अँटोनी यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना दिली. दक्षिण भारतातले कार्यकर्ते
आणि नेत्यांच्या आग्रहामुळे गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. या मतदारसंघातून डाव्या लोकशाही आघाडीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पी पी
सुनीर यांना उमेदवारी दिली आहे. गांधी यांच्या केरळमूधन निवडणूक लढवण्याच्या, निर्णयामागे,
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता बळकट करणं हे प्रमुख उद्दीष्ट असल्याची प्रतिक्रिया भारतीय
कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांनी व्यक्त केली आहे.
बड्या उद्योजक घराण्यांच्या
दबावामुळेच काँग्रेसनं भारतीय कम्युनिस्ट पक्ष- भा.क.प.ला ‘महाआघाडी’चा
घटक बनू दिलं नाही अशी टीका भाकपचे राष्ट्रीय
सचिव के. नारायण यांनी केली आहे. ते आज बिहारच्या पाटणा इथं बोलत होते. यामुळेच कन्हैया
कुमार यांनाही महाआघाडीमध्ये सहभागी करून घेतलं गेलं नाही असंही ते म्हणाले.
****
लोकसभा
निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षातले उमेदवार वगळता, अमान्यताप्राप्त
नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून
अधिक वाढ करण्यात आली आहे. यामध्ये १९८ निवडणूक चिन्हं ही मुक्त चिन्हं म्हणून घोषित
करण्यात आली असून, त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येत आहे. दैनंदिन वापरातल्या
वस्तू, व्यक्तिगत साधनं, दळणवळणाची साधनं, फळं, भाज्या, स्वयंपाक घरातल्या वस्तू, खेळ,
कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधनं अशी विविध क्षेत्रातील
चिन्हांचा समावेश करुन निवडणूक आयोगानं सर्वसमावेशकता जपल्याचं दिसून येत आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या
टप्प्यात होणाऱ्या ९१ मतदार संघांमध्ये प्रचारानं जोर धरला आहे. यवतमाळ -वाशिम मतदार
संघात प्रमुख उमेदवारांनी घरोघरी भेटी देणं, सोशल मिडिया, वर्तमानपत्रातल्या जाहिराती
आणि फलकं लावत प्रचार करत आहेत. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातून
तर शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी यवतमाळ जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात केली
आहे.
दरम्यान, वाशिम शहरात आज दोन
गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी अपक्ष आमदार नूर अली शाह यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
झाला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामं पाहता देशाला शिखरावर नेण्यासाठी त्यांना पुन्हा
संधी देणं गरजेचं असल्याचं मत, परभणीचे शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेवार संजय
जाधव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज परभणीत वार्ताहरांशी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment