Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
March 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज नवी दिल्लीतून दूर दृश्य संवाद प्रणाली - व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या
पाचशे ठिकाणांवर संपर्क साधत आहेत. मैं भी चौकीदार या अभियानाच्या समर्थनाचा संकल्प
केलेल्या नागरिकांशी संवाद साधताना, ते अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. मै
भी चौकीदार ही संकल्पना महात्मा गांधी यांच्या विश्वस्त संकल्पनेशी संबंधित असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी कायदेशीरपणे लढत असताना अनेक
भ्रष्ट लोकांना आतापर्यंत तुरुंगाच्या दारात आणून ठेवल्याचं ते म्हणाले. यापुढेही अनेकांना
तुरुंगाची हवा खावी लागेल आणि देशातील व्यवस्था पारदर्शक होईल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
****
विजया बँक आणि देना बँकेचं
उद्या बँक ऑफ बडोदात विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे बडोदा बँक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची
मोठी बँक बनेल. विजया बँक आणि देना बँकेच्या ठेवीदारांसह, ग्राहकांना यावर्षी एक एप्रिलपासून
बँक ऑफ बडोदाचे ग्राहक मानलं जाईल, असं भारतीय रिजर्व बँकेनं काल दिलेल्या निवेदनात
म्हटलं आहे.
****
भारतीय हवाई दलाचं एक मिग-२७
जातीचं विमान आज दुपारी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातल्या गोदना भागात कोसळलं. या
विमानातून पायलट सुरक्षित बाहेर पडल्याचं सिरोहीच्या पोलीस अधिक्षक के. एल. मीणा यांनी
आकाशवाणीशी बोलतांना सांगितलं. हवाई दलाच्या उतेरलाई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर
इंजिनात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो उद्या देशातला एक नवीन उपग्रह- एमीसॅटचं प्रक्षेपण
करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी
पीएचएलव्ही-सी ४५ प्रक्षेपण वाहन, एमीसैट आणि २८ अन्य खासगी उपग्रहांसह अवकाशात उड्डाण
करणार आहे.
****
लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षातले उमेदवार वगळता,
अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये
यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. यामध्ये १९८ निवडणूक चिन्हे ही मुक्त चिन्हे
म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येत आहे. दैनंदिन
वापरातल्या वस्तू, व्यक्तिगत साधनं, दळणवळणाची साधनं, फळं, भाज्या, स्वयंपाक घरातल्या
वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधनं अशी विविध
क्षेत्रातील चिन्हांचा समावेश करुन निवडणूक आयोगानं सर्वसमावेशकता जपल्याचं दिसून येत
आहे.
****
निवडणूक
प्रचारासाठी प्रसार माध्यमांचा गैरवापर केला जाऊन,
आदर्श आचार संहितेचा भंग होऊ नये, यासाठी
जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे.
या माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यावर, तसेच विनापरवानगी
प्रचार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी अरुण डोंगरे दिले आहेत.
****
लोकसभा
सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे
आदेशही नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. नांदेड, हिंगोली
आणि लातूर या लोकसभा मतदारसंघांत १८ एप्रिलला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने
राज्य पणन संचालकांनीही मतदान दिनांकास त्या त्या जिल्ह्यात
भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे.
****
नांदेड
शहरात दुचाकीस्वार तिघांनी चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटल्याची घटना कौठा भागातील
अहिल्याबाई होळकर चौकात काल रात्री घडली. चोरट्यांनी वजिराबाद भागात राहणारे व्यापारी
जगजीतसिंग भाटीया यांच्याजवळील सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी
नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment