Thursday, 28 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.03.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८  मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****



v  ए-सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;

v लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी आज अधिसूचना जारी होणार; मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघांचा समावेश

v नांदेड लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांचा अर्ज वैध; सर्व आक्षेप फेटाळले

v औरंगाबाद जिल्हा परीषदेतली काँग्रेस सोबतची युती तोडण्याचा शिवसेनेचा निर्णय

आणि

v गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट गौतम भालेराव, पाचोऱ्याचे माजी आमदार आर ओ पाटील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. गजानन सुराशे यांचं निधन

****



 संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं काल ए-सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ या नावाची ही मोहीम ओडीशा जवळच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन करण्यात आली. या यशामुळे अशी क्षमता असलेल्या अमेरिका, रशिया, आणि चीन या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत पोहोचला आहे. तसंच देशी बनावटीची अस्त्रं बनविण्याची क्षमता पुन्हा एकदा देशानं सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासिंयाशी संवाद साधून ही माहिती दिली. या क्षेपणास्त्रानं ३०० किलोमीटर उंचीवरचा कार्यरत उपग्रह केवळ तीन मिनिटांत नष्ट केल्याचं मोदी यांनी सांगितलं. या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना देत मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. तसंच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनीही सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार  आहे. या टप्प्यात ४ एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील तर ८ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या टप्प्यात १४ राज्यातल्या ११५ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होईल. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, जळगाव, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणगंले या १४ मतदारसंघांचा समावेश आहे.



 दरम्यान, आज औरंगाबाद जिल्ह्यात पैठणच्या नाथषष्ठी निमित्त शासकीय सुट्टी असली तरी औरंगाबाद लोकसभा निवडणूकीचं कामकाज सुरू राहणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळवलं आहे.

****



 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होत असलेल्या २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ९१ मतदारसंघात निवडणूक नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे. यात राज्यातले नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर, भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, आणि यवतमाळ- वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे.

****



 लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली.



 नांदेड लोकसभा मतदारसंघातले काँगेस पक्षाचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेले सर्व आक्षेप  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण डोंगरे यांनी काल रात्री उशिरा फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. एका अपक्ष उमेदवारानं चव्हाण यांच्या मालकीच्या गॅस एजन्सीच्या संबंधात काही कागदपत्रं सादर करुन त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यावर युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे यांनी निर्णय राखून ठेवला होता. 



 परभणी लोकसभा मतदार संघात सहा जणांचे तर लातूर लोकसभा मतदारसंघात पंधरा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आठ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले. वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये सुभाष वानखेडे नावाचे सहा उमेदवार आहेत.



 बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या  उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी सुनावणी अखेर वैध ठरवला. उमेदवार कालिदास आपेट यांनी मुंडे यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावण्यात आला. डॉ प्रीतम मुंडे यांनी आपल्या संपत्ती विवरणात काही बाबी लपवल्याची तक्रार, काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी केली होती, ही तक्रार देखील फेटाळण्यात आली. मात्र त्यानंतर दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.



 सोलापूर लोकसभा मतदार संघात सव्वीस उमेदवारांपैकी दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमदेवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरवले.

****



 अमरावती आणि बुलडाणा मतदार संघात प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

****



 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले आमदार दीपक पावसकर यांचा काल रात्री साडेअकरा वाजता गोवा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकमेव सदस्य असलेले उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांना मंत्रीमंडळातून वगळले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आपण निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने पक्षात प्रवेश केलेला नसून, कॉंग्रेस पक्षाच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन, पक्षात आल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद जिल्हा परीषदेतील काँग्रेस सोबतची युती तोडण्याचा निर्णय काल शिवसेनेनं घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय झाला. जिल्हा परीषदेत शिवसेनेनं काँग्रेससोबत युती करून सत्ता मिळवली होती. यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला होता. भाजपनं शिवसेनेला युती तोडली तरचं प्रचारात सहभागी होण्याची अट घातल्यानंतर काल हा निर्णय घेण्यात आलाद्य

****



 वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचं आमिष दाखवून जवळपास दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि तत्कालिन राज्य उत्पादन शुल्क मंत्री  दिलीप कांबळे यांच्याविरोधात औरंगाबाद शहराच्या सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांच्या साथीदारानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळं गुन्हा दाखल झाल्याचं उघडकीस आलं. अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यास परवाना मिळवून देऊ असं कांबळे यांनी संबंधितास आश्वासन दिलं होतं. मात्र परवाना न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

****



 सामाजिक माध्यमांच्या खोट्या माहितीला समाज बळी पडत असून या खोट्या माहितीच्या आधारे लोक स्कॉलर होत असल्याचं सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते.



 यावेळी “डॉ.गंगाधर पानतावणे यांचे वैचारिक योगदान” या विषयावर बोलतांना जेष्ठ साहित्यिक डॉ. जर्नादन वाघमारे यांनी,  मागासवर्गीय समाज एकसंघ नाही तो अनेक जातींमध्ये विखुरला आहे. त्यांना एकत्रित आणून या व्यवस्थेविरोधात उभं करण्याची व्यापक भूमिका डॉ. पानतावणे यांनी घेतली होती, असं ते म्हणाले.

****



 परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या पेठशिवणीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन, गंगाखेडचे  माजी नगराध्यक्ष तसंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय संघटक महासचिव ॲडव्होकेट गौतमदादा भालेराव यांचं काल रात्री हृदयविकारानं  निधन झालं.  त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता गंगाखेडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****



 जळगाव जिल्ह्यातले पाचोऱ्याचे माजी आमदार आणि निर्मल सीडसचे चेअरमन आर ओ पाटील यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. तात्यासाहेब या नावाने ते परिचित होते.  आज सायंकाळी ५ वाजता पाचोरा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. गजानन सुराशे यांचं काल निधन झालं, ते ७० वर्षाचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थीव देहावर औरंगाबादमधल्या सिडको एन-६ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

****



 हिंगोली जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक चांदोजी उपरे यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. ते १०५ वर्षांचे होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांचा सहभाग होता. उपरे यांच्यावर आज दुपारी १२ वाजता त्यांच्या कळमनुरी तालुक्यातल्या कृष्णापुर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी विनय बाबूराव पवार  आणि सारंग दिलीप अकोलकर यांची माहिती देणाऱ्यास १० लाखाऐवजी ५० लाख रुपयांचं बक्षिसं शासनानं जाहीर केलं आहे. कोल्हापूरचे  पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी काल कोल्हापूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह मंत्रालयानं बक्षिसाची ही रक्कम  वाढवली आहे.

****



 परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी तसंच  दुष्काळ अनुदानाच्या याद्या बँकेत तातडीनं जमा कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव शिरस्कर यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे काल एका  निवेदनाद्वारे केली आहे. शासनाचे दुष्काळ अनुदानाचे  दोन महिन्यांपासूनचे पैसे तहसील कार्यालयात येऊनही महसूल विभागाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना मिळालेले नाही असं या निवेदनात म्हटल आहे.

****



 परभणी महानगरपालिकेनं काल प्रभाग समिती अंतर्गत एकत्र स्वच्छता मोहीम राबवली. आयुक्त रमेश पवार यांनी या मोहिमेची  पाहणी केली, मोहिमेअंतर्गत दररोज एका प्रभागाची स्वच्छता करण्यात येत आहे.

*****

***

No comments: