Friday, 29 March 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.03.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९  मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****

** पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी पुण्यात एका संशयितास अटक

** लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या ९७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत, मराठवाड्यातल्या सहा मतदारसंघांचा समावेश

** राज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या सर्व सात मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती

** औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेडून - ‘अ’ दर्जा कायम

आणि

** पैठणच्या नाथ षष्ठी यात्रेचा काल्यानं समारोप

****

पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी बिहार दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यात एका संशयितास अटक केली. शरीयत मंडल असं त्याचं नाव असून हल्ल्यापूर्वी भारतीय जवानांच्या तैनातीबद्दलची सविस्तर माहिती आणि लष्कराबद्दलची अन्य संवेदनशील कागदपत्रं दहशतवादी संघटनेला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पथकानं बिहारच्या पाटणा शहरामध्ये अलिकडेच या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. मंडल हा त्यांच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथगतीनं सुरू असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या तपासाचा आढावा घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का, असं न्यायालयानं विचारलं आहे. न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला यांच्या पीठानं, यासंदर्भात बोलताना, प्रत्येक तपासात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणं, हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

****

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला राज्यातल्या १० मतदार संघांसह देशातल्या १३ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशातल्या एकूण ९७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. यापैकी, नांदेड लोकसभा मतदारसंघातून काल १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर उस्मानाबाद मतदार संघातून एका उमेदवाराने काल माघार घेतली.

****

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात विदर्भातल्या सात मतदार संघांत एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी कांग्रेसचे नाना पंचबुधे, भारतीय जनता पार्टीचे सुनिल मेंढे आणि बहुजन समाज पक्षाच्या विजया नांदूरकर यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्धा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपाचे रामदास तडस, कांग्रेसच्या चारूलता टोकस आणि बसपाचे शैलेश कुमार अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवार, निवडणूक रिंगणात आहेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काल सात उमेदवारांनी माघार घेतली, आता या मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, भाजपाचे बंडखोर उमेदवार पी.व्ही. आडे यांच्यासह २४ उमेदवार तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्यासह एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि कांग्रेसचे नाना पटोले यांच्यासह ३० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, रामटेक या मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यासह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघात काल एका उमेदवाराने माघार घेतली, त्यामुळे या मतदारसंघात आता पाच उमेदवारांमध्ये लढत होईल. यात तीन उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तर दोन नोंदणीकृत राजकीय पक्षाचे आहेत. या मतदारसंघात एकही अपक्ष उमेदवार नाही.

****

सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६१६ तर दुसऱ्या टप्प्यासाठी ६३१ अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक आयोगाकडून काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषेदत ही माहिती देण्यात आली. सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली असून, सोशल मीडियालाही आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान, सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत २३ हजार तक्रारींची नोंद झाली असून, आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ६७३ कोटी रूपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

****

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. या तिसऱ्या टप्प्यात चार एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. पाच एप्रिलला अर्जांची छाननी होईल, तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यात औरंगाबाद आणि जालना या दोन जागांसह, जळगाव, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणगंले या मतदार संघांत २३ एप्रिलला मतदान होईल.



काल पहिल्याच दिवशी, रायगड लोकसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी, हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी, जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर, रावेर मतदार संघातून भाजप शिवसेनेच्या उमेदवार रक्षा खडसे, तर औरंगाबादहून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. जालना तसंच रायगड मतदार संघातून प्रत्येकी एका अपक्ष उमेदवारानेही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालना लोकसभा मतदार संघातून काल पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ अर्ज तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून, ४१ जणांनी ८७ अर्ज नेल्याचं वृत्त आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी दोन तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावली आहे. काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये एकाच मथळ्याखाली ठाकरे यांच्याबाजूने सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणी ४८ तासात खुलासा न केल्यास, पेड न्यूज मार्गदर्शक तत्वानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

****

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं काल दिल्ली इथं आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. शेतीमालाला किमान हमी भाव, अनुसूचित जाती-जमातीला खाजगी क्षेत्रात नोकरी आणि शिक्षणात आरक्षण, संसद आणि राज्य विधिमंडळात महिलांना ३३ आरक्षण, उत्पन्नाच्या पाच टक्के सार्वजनिक आरोग्यावर खर्च, आदी मुद्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

****

औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेना आणि एमआयएम अशी थेट लढत होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडी - एमआयएम पक्षाचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जाती धर्माचं राजकारण न करता शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या तीन एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं, इम्तियाज यांनी सांगितलं. ते सध्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

****

लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसंच सर्व समित्यांचे नोडल अधिकारी यांनी एक संघ म्हणून काम करावं, असं आवाहन निवडणूक निरीक्षक ऋषीरेंद्र कुमार यांनी केलं आहे. काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. निवडणूका निर्भय, नि:पक्ष आणि शांततामय वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

पेण नगरपालिकेतल्या भाजपच्या आठ नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्याला पक्षात सातत्यानं दुय्यम वागणूक मिळत होती शिवाय निष्ठावंताना डावलत आयारामांना प्रतिष्ठा दिली जात असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं माजी नगराध्यक्ष संतोष ऋृगारपुरे यांनी सांगितलं.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद- नॅकनं ‘अ’ दर्जा कायम ठेवला आहे. परिषदेनं नुकतीच विद्यापीठाला भेट देऊन सर्व शैक्षणिक सोयी सुविधांसह अन्य बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर हे मानांकन जाहीर केलं, असल्याचं विद्यापीठ विकास मंचचे डॉ. गजानन सानप यांनी सांगितलं. नवीन नियमानुसार विद्यापीठाला संकलित सरासरी श्रेणी गुणांकन- सीजीपीएमध्ये तीन पुर्णांक बावीस गुण मिळाले असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल नाथषष्ठी महोत्सवाची सांगता नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काल्याची हंडी फोडून झाली. भानुदास...एकनाथ चा जयघोष आणि टाळ - मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर निनादून गेला. या तीन दिवसीय नाथषष्ठी महोत्सव सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आले होते.

****

मध्ये रेल्वेनं, आपल्या सर्व स्थानकांवर, लिंबू सरबतासह इतर सर्व खुल्या सरबतांच्या विक्रीला बंदी घातली आहे. मुंबईत, कुर्ला स्थानकावर एक विक्रेता, लिंबू सरबत तयार करताना अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याची एक चित्रफीत नुकतीच, सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित झाली होती, त्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. अशा सरबतांचे विक्रेते सरबतासाठी शुद्ध पाण्याचा वापर करत आहेत, किंवा नाही, याकडे सतत लक्ष ठेवणं शक्य नसल्यामुळे, अशा खुल्या सरबतांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती, मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी दिल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

//************//

No comments: