Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø प्रचार
सभा, मिरवणुका आणि रोड शो द्वारे विविध राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचाराला वेग
Ø शेतकरी कामगार
पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; रावेरमध्ये उल्हास पाटील यांना काँग्रेसची तर सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशाल
पाटील यांना उमेदवारी
Ø लोकसभा निवडणुकीत
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
आणि
Ø भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
किदंबी
श्रीकांत पुरूष एकेरीच्या
अंतिम फेरीत
****
प्रचार सभा, मिरवणुका
आणि रोड शो करत विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे
नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरूणाचल प्रदेशमध्ये पश्चिम सिंयांग जिल्ह्यात
सभा घेऊन ईशान्य भारतातल्या प्रचाराची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी आसाममध्ये गोहपुर
इथं सभा घेतली. त्यांनतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल रोड शो करत गांधीनगर मतदार
संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सरकारच्या पाच वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेचा बोजवारा वाजल्याचा आरोप काँग्रेसचे
वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काल नवी दिल्लीत वार्तांहरांशी बोलतांना केला. या शिवाय
निर्यात, गुंतवणूक, निर्मिती आणि उत्पादन क्षेत्र तसंच भांडवल निर्मितीतही घसरण झाल्याचं
ते म्हणाले.
****
सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी
अर्ज दाखल करताना उमेदवारांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं
म्हटलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या
तीन पेक्षा अधिक वाहनांना परवानगी नसेल, तसंच नामनिर्देशनपत्रं दाखल करताना निवडणूक
निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. यासह
इतर नियम जारी करण्यात आले असून, सर्व नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असल्याचं, पोलीस
प्रशासनानं म्हटलं आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघातून काल काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी तर रामभाऊ उनगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून
अर्ज दाखल केला. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून...
काल पर्यंत निवडणूक विभागातून ४६ जणांनी १४१ अर्ज नेले. काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विलास औताडे, यांच्यासह अपक्ष रामभाऊ वनगे यांनी काल जिल्हा
निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या
बैठकीत औताडे यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार भाजपा प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बाबासाहेब म्हस्के जालना.
दरम्यान, विलास औताडे अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना,
त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांना बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवल्यामुळे,
पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे
उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी युतीच्या नेत्यांसमवेत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. औरंगाबाद शहरात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सुरेश
फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या मतदार संघात आतापर्यंत ७१ जणांनी
१४१ अर्ज घेतले आहेत.
****
लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गती येत आहे.
याविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …
काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत
यांनी पक्ष कार्यकर्ते आणि लातूर आणि ग्रामीण मतदार संघात जाऊन गाठीभेटी सुरु केलेल्या
आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. एकूणच प्रचाराला
आता वेग येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदानाचा टक्का वाढवून लातूर मतदारसंघाला
डिस्टींक्शन मध्ये आणण्याचं आमचा प्रयत्न आहे.
अरुण समुद्रं, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर
****
बीड लोकसभेच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीच्या
उमेदवार खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल आष्टी तसंच पाटोदा तालुक्यात दौरा केला. डोंगरकिन्ही इथं
त्यांनी जाहीर सभा घेतली.
****
परभणी लोकसभा मतदार संघातही प्रचाराला हळुहळू वेग
येत आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून……….
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर यांनी परभणी तालुक्यातील
जांब सर्कल मधील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर
मोहम्मद खान यांनी काल मानवत शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क
साधला. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी काल पाथरी तालुक्यातील हदगाव,
रेना, खळी, वडी, निवळी आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर.
****
शेतकरी
कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काल मुंबईत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतले
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, यावेळी उपस्थित होते. गायकवाड यांना काँग्रेसतर्फे
पुण्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी, रावेर लोकसभा
मतदारसंघातून काँग्रेसनं उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत भाजप
सेना युतीच्या उमेदवार, रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे.
काँग्रेस महाआघाडीतर्फे सांगली मतदारसंघातून स्वाभिमानी
शेतकरी संघटनेनं, विशाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. विशाल पाटील हे माजी
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.
****
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात काँग्रेसचे नवीनचंद्र
बांदिवडेकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तर सातारा
लोकसभा मतदार संघात, शिवसेना- भाजप युतीचे नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल
केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य शासनानं लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात
एक अधिसूचना जारी करण्यात आली. कामानिमित्त आपल्या लोकसभा मतदार संघाच्या
क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही
ही सुट्टी लागू असेल. राज्यात पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात १८,
तिसऱ्या टप्प्यात २३, तर चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला, संबंधित मतदार संघात सुट्टी
राहणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत्त महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू
आहे.
****
मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत आज पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ परीसरात रन फॉर डेमॉक्रसी स्पर्धा घेण्यात आली. पोलिस महानिरीक्षक
विक्रमकुमार सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवा झेडा दाखवून या स्पर्धेला
सुरूवात केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चौधरी यांनी, मतदान हे पवित्र कार्य असून
देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी
केलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांनी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या
१९ तक्रारी दाखल केल्या आहेत. यापैकी ११ व्यक्तींवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री केली असता शहरात अनेक ठिकाणी
आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे.
****
सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज सयाजीराव देशमुख
यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगानं दाखल तक्रारीची, शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतनं पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत
प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं, चीनच्या हुआंग युशिआंग याचा
पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताच्या परूपल्ली कश्यपचा पराभव करून व्हिक्टर
ॲक्सेंसलनं अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत पी व्ही सिंधुचा चिनच्या बिंग जिआओ या
खेळाडूनं पराभव करून अंतिम फेरी गाठली.
****
अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल
दक्षिण कोरियानं भारताला चार - दोन अशा फरकानं पराभूत केलं. सामन्याच्या निर्धारित
वेळेत दोन्ही संघ एक - एक नं बरोबरीत होते. त्यामुळे पेनॉल्टी शुटआऊट नुसार सामन्याचा
निर्णय घेण्यात आला.
****
आज एकतीस मार्च, २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा
अखेरचा दिवस. भारतीय रिझर्व्ह बँकेनं, आज सर्व बँकांना कामकाज
सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं, एक स्वतंत्र
परिपत्रक काढून, ऑनलाईन व्यवहारही आज सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment