Saturday, 30 March 2019

Tex - AIR News Bulletin Aurangabad 30.03.2019......18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातल्या आलोमधून इशान्येकडील राज्यांमधल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या काळात या प्रदेशातल्या विकासाकडे सपशेल दुर्लक्ष केलं असल्याचं म्हटलं आहे. या भागातल्या पायाभूत सुविधांचा विकास करणं महत्वाचं असताना काँग्रेस राजवटीत फक्त नेत्यांचे गड मजबूत करण्यावरच भर दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. सात दशकांनंतर या चौकीदारानं अरुणाचल प्रदेशला रेल्वे रुळानं जोडून रेल्वे नकाशावर आणलं असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांनी आसाममधल्या दिब्रुगड मतदारसंघातल्या मोरानमध्येही एका सभेला संबोधित केलं.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज गांधीनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी बोलतांना, ही निवडणूक देशाचं नेतृत्व कोणी करायचे याच मुद्यावर लढली जाणार असल्याचं शाह म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

****

औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज १३ जणांनी २२ अर्ज घेतले. आतापर्यंत एकूण ७१ उमेदवारांनी १४१ अर्ज घेतले. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना-भाजप युतीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सुरेश फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.

जालना जिल्ह्यातून आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी तर रामभाऊ उनगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. भाजपा-सेना युतीकडून भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आज आणखी तेरा जणांनी २५ अर्ज नेले आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात आज काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर आणि शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी आज नरेंद्र पाटील यांनी शिवसेना- भाजप युतीकडून आपला उमेदवारी अर्ज सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सादर केला.

****

बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांनी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या १९ तक्रारी दाखल केल्या आहेत. यापैकी ११ व्यक्तींवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री केली असता शहरात ठिकठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे.

****

कोल्हापूर इथं निवडणुकीच्या काळात रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी ४६ हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हॉटेलचे परवाने रद्द करण्याची शिफारसही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिली. आचारसंहिता सुरू झाल्यापासून आज पर्यंत ३६ लाख रूपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर- जम्मू राज्य महामार्गावर आज सकाळी एका कारमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचा ताफा या ठिकाणाहून जात असताना हा स्फोट झाला. सीआरपीफच्या गाडीचं किरकोळ नुकसान वगळता या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये स्फोटात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. अद्याप कोणताही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

****

निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एक हजार २५३ कोटी रुपये किंमतीची बेहिशेबी रोकड, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातु आणि मतदारांना वाटण्यासाठीच्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे ५०६ कोटी रुपयांची बेहिशेबी जप्ती करण्यात आली आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये १५३ कोटी, आंध्र प्रदेशमध्ये १४२ कोटी आणि उत्तर प्रदेशमध्ये ११९ कोटी रुपयांची बेहिशेबी जप्ती करण्यात आली आहे. देशभरातून २५० कोटी रुपयांची रोकड, ६७५ रुपयांचे अंमली पदार्थ, १८३ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि १२२ कोटी रुपयांची दारू तर २२ कोटी रुपयांच्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

****

राजकीय नेत्यांविरोधात प्रलंबित असलेल्या निवडणूक याचिका आणि गुन्हेगारी प्रकरणांचा जलदगतीनं निपटारा केला जावा, असं आवाहन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. अशी प्रकरणं जास्तीत जास्त एक वर्षात संपवण्यासाठी स्वतंत्र खंडपीठे स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी मांडली. ते विशाखापट्टनम जिल्हा न्यायालय आणि विशाखापट्टनम वकिल संघाच्या १२५ वर्धापनदिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

****

No comments: