Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 March 2019
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या
दिवशी मदयविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई
करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात
आले आहेत. निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित
मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना
हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर
फौजदारी कारवाई करण्यात येईल.
****
भारत आणि
अमेरिका संयुक्त कार्य गटाची सोळावी बैठक काल वॉशिंग्टन इथं झाली. या बैठकीत दक्षिण
आशियातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी चर्चा झाली. पाकिस्तानच्या भूमीवरुन नियंत्रित
होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तान
सरकारला केलं आहे. बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तान सरकारला
हे आवाहन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्याच्या कामी
भारतानं दिलेल्या योगदानाची अमेरिकेनं प्रशंसा केली आहे.
****
अंतराळातील
उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, हे आदर्श आचारसंहितेचा
भंग करणारं नव्हतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भात चौकशी
समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला. अंतराळातील उपग्रह उध्वस्त करण्याची
ताकद असल्याच्या चार देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे आणि मिशन शक्तीच्या यशामुळे
भारताने स्वतःला जागतिक अंतराळ सत्ता म्हणून घोषित केलं आहे, असं मोदींनी आपल्या भाषणात
म्हटलं होतं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आसामधल्या मोरन आणि गोहपूर इथं निवडणूक प्रचारास सुरुवात करणार आहेत.
दरम्यान, आसाममध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या पाच जागांच्या निवडणूकीसाठी ५० उमेदवार तसंच करिमगंज इथून १४ उमेदवार उभे आहेत.
सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसमधून खासदार सुस्मिता देव,
राज्याचे माजी मंत्री प्रद्युत बोरडोलाई आणि वरिष्ठ नेते भूवनेश्वर कलिता तर भाजपकडून
विधानसभेचे उपसभापती कृपनाथ मल्ला, आमदार रुपक शर्मा आणि दिलीप सैकीया हे उमेदवार आहेत.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि दहशतवादाच्या
नाड्या आवळण्यासाठी केंद्र सरकारनं संबंधित सर्व विभागांचा समन्वय करण्यासाठी एक टेहळणी
गट तयार केला आहे. या गटामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिस दल प्रतिनिधी, गुप्तचर विभाग,
केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रतिनिधीचा
समावेश आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षकांमधून दहशतवादासा छुपा पाठिंबा देणाऱ्यांविरोधातही
हा गट कारवाई करणार आहे. तसंच हा गट दहशतवादाला निधी पुरवणाऱ्या जाळ्याचा तपास करून
कारवाई करणार आहे. या गटाची दर आठवड्यातून एकदा बैठक होणार आहे.
****
बोलिवियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
करण्यात आल्या. संस्कृती, व्हिसा, खाण, अंतराळ, पारंपरिक औषधी, माहिती तंत्रज्ञान आणि
रेल्वे प्रकल्प या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रपती कोविंद
यांना बोलिवियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच उभय देशांच्या
दोन्ही प्रमुखांमध्ये राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी अधिक चर्चा करण्यात आली.
भारतानं बोलिवियाला आर्थिक प्रकल्प राबवण्यासाठी १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची क्रेडिट
लाईन देण्याची तयारीही दाखवली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment