Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
March 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१९ - २०.००
****
सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना
उमेदवारांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे. निवडणूक
कार्यक्रम घोषित करण्यात आल्यानंतर सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून,
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या तीन पेक्षा
अधिक वाहनांना परवानगी नसेल, तसंच नामनिर्देशनपत्रं दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या
कक्षात पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. यासह इतर नियमांचं पालन
आवश्यक असल्याचं, पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात
शिवसेना भाजप युतीचे चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कन्नडचे आमदार
हर्षवर्धन जाधव आणि सुरेश फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. औरंगाबाद
मतदार संघात आतापर्यंत एकूण ७१ जणांनी १४१ अर्ज घेतले.
जालना लोकसभा मतदार संघातून आज
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी तर रामभाऊ उनगे यांनी
अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. औताडे आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना, त्यांच्या
सोबत असलेल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवल्यामुळे, पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये
वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार
संघात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज
दाखल केले. तर सातारा लोकसभा मतदार संघात, शिवसेना- भाजप युतीचे नरेंद्र पाटील यांनी
उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गती येत आहे.
सर्व उमदेवार मतदारांना भेट देत असून जिल्हा प्रशासनानंही मतदानाची पूर्ण तयारी केली
आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून…
काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत
यांनी पक्ष कार्यकर्ते आणि लातूर आणि ग्रामीण मतदार संघात जाऊन गाठीभेटी सुरु केलेल्या
आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. एकूणच प्रचाराला
आता वेग येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदानाचा टक्का वाढवून लातूर मतदारसंघाला
डिस्टींक्शन मध्ये आणण्याचं आमचा प्रयत्न आहे. अरुण समुद्रं, आकाशवाणी बातम्यांसाठी,
लातूर
****
बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांनी
आचारसंहितेचा भंग झाल्याच्या १९ तक्रारी दाखल केल्या आहेत. यापैकी ११ व्यक्तींवर चौकशी
करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री
केली असता शहरात अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे.
****
निवडणुकीसंदर्भात प्रत्येक तक्रारीचं
निवारण होईल यावर लक्ष देण्यात यावं, असं मुख्य निवडणूक निरीक्षक पार्थ सारथी मिश्रा
यांनी म्हटलं आहे. ते आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा बैठकीत बोलत
होते. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधांचा त्यांनी प्रामुख्याने
आढावा घेतला.
भंडारा-गोंदिया
लोकसभा मतदार संघात येत्या ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठीच्या ईव्हिएम-व्हीव्हीपॅट
यंत्राचं पार्थ सारथी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुसरं सरमिसळीकरण करण्यात
आलं. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
****
मुंबईत मुंब्रा इथं तीन व्यक्तींकडून
१६ लाख रूपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा आज जप्त करण्यात आल्या. या तिघांनाही
अटक करण्यात आली आहे
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातल्या
जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं, यासाठी उद्या रन फॉर डेमॉक्रसी स्पर्धेचं आयोजन
करण्यात आलं आहे. उद्या पहाटे सव्वापाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
प्रवेशद्वारापासून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
****
जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूर तालुक्यात एका कारचालकाकडे एक रिव्हॉल्वर,
नऊ जिवंत काडतुसं आणि दोन लाख १० हजार रुपये आढळून आले.
****
No comments:
Post a Comment