Tuesday, 26 March 2019

Tex - AIR News Bulletin Aurangabad 26.03.2019.......18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या दुसऱ्या टप्प्यासाठी भरलेल्या अर्जांची उद्या छाननी होणार असून, २९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.



आज अखेरच्या दिवशी अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

उस्मानाबाद मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवारा राणा जगजितसिंह पाटील यांनी  शक्तीप्रदर्शन करत, अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



परभणी लोकसभा मतदार संघातले शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव तसंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह प्रचार फेरी काढून उमेदवारी अर्ज दाखल केले



हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील, कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



अमरावती, इथं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, महाघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा यांनी आज शक्तिप्रदर्शन करून नामांकन पत्रं दाखल केलं. याशिवाय आणखी १७ उमेदवारांनी आज २४ उमदेवारी अर्ज दाखल केले, या मतदार संघात आजपर्यंत ३६ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत.

****

लातूर इथं, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचाराला आजपासून प्रारंभ झाला. शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून यावेळी प्रचार फेरी काढण्यात आली. भाजप प्रदेशाध्शक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून क़ॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ताळमेळ नसल्यामुळे ते बॅकफुटवर गेले असल्याचं, दानवे म्हणाले.

****

परभणीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज परभणी इथं जाहीर सभा घेतली. विमुद्रीकरण, राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण, आदी मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

****

पालघरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेने प्रवेश केला. शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात, पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मिळाला आहे. गावीत यांना पालघर मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

****

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजप नेते भुपेंद्र यादव यांनी जया प्रदा याचं स्वागत केलं. समाजवादी नेते अमरसिंह यांच्या निकटवर्तीय असलेल्या जयाप्रदा, उत्तरप्रदेशातल्या रामपूर लोकसभा मतदार संघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. भाजपकडून त्यांना रामपूर इथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

पुणे इथल्या वस्तू सेवा कर कार्यालयातल्या दोन अधीक्षकांना एक लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज अटक केली. सेवा कर पूर्तता करण्यासाठी या अधीक्षकांनी तक्रारदारांकडून तीन लाख रुपये लाच मागितली होती. यापैकी एक लाख रुपये लाच घेतांना या दोघांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर सीबआयनं या दोन्ही आरोपींच्या कार्यालयात आणि घरावर छापे घातले. त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता तसंच इतर कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे दिंड्या पैठण नगरीत गोदावरीच्या किनाऱ्यावर डेरेदाखल आहेत. गोदावरी नदीत स्नान करून भानुदास एकनाथांचा जयघोष करत भाविक, नाथ समाधीचं दर्शन घेत आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात, भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा, शासकीय व्यवहारासाठी येत्या शनिवारी ३० मार्चला रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...