Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
March 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०१९ सायंकाळी ६.००
****
सर्वोच्च न्यायालयाच्या कथित अवमान प्रकरणी न्यायालयानं,
केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी,
आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं
दिले होते. हे निर्देश पाळले जात नसल्यासंदर्भात दाखल, एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान
न्यायालयानं, ही नोटीस बजावली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या
घटनापीठानं, उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंबंधीचे हे दिशानिर्देश जारी केले
होते.
****
मतदान पडताळणी पावती यंत्र - व्ही व्ही पॅट मधून मिळणाऱ्या
पावत्यांची पडताळणी करण्याची सध्याची पध्दत योग्य असल्याचं, निवडणूक आयोगानं, सर्वोच्च
न्यायालयाला सांगितलं आहे. मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना पावती
सर्वेक्षणाची संख्या वाढवता येईल का, असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलं होतं. आंध्र
प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्यासह विरोधी पक्षाच्या २१ नेत्यांनी
ही याचिका दाखल केली होती. पुढच्या महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटच्या
किमान ५० टक्के यंत्रांतल्या पावत्यांची पडताळणी केली जावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी
केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ल्या मतदानासाठी उमेदवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली.
हिंगोली लोकसभा मतदार संघातून विधिज्ञ शिवाजी जाधव यांनी
अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या मतदार संघातून आज सहा जणांनी माघार घेतली, आता २८ उमेदवार
निवडणूक रिंगणात आहेत.
परभणी लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या
दिवसापर्यंत चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात
आता १७ उमेदवार राहिले आहेत. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून -
परभणी लोकसभा मतदार संघात विविध राजकीय पक्षांचे १३ तर
अपक्ष ४ उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार १७ असले तरी खरी लढत शिवसेना भाजप युतीचे
संजय जाधव, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे
आलम गीर मोहम्मद खान यांच्यात होईल.
आकाशवाणी बातम्यांसाठी, परभणीहून विनोद कापसीकर.
लातूर मतदार संघातून आज दोन उमेदवारांनी आपले उमेजवारी अर्ज
मागे घेतले, इथे आता १० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
उस्मानाबाद इथून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, या मतदार
संघात आता १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अमरावती लोकसभा मतदार संघात आज १० जणांनी उमेदवारी अर्ज मागे
घेतली असून आता २४ उमेदवार रिंगणात आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज तीन अपक्ष उमेदवारांनी
उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १७ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. तर जालना लोकसभा मतदार
संघातून आज आठ जणांनी ३० अर्ज नेले आहेत.
****
बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं,
रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार
धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील
तटकरे आणि अदिती सुनील तटकरे या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
****
कोल्हापुरातले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे
आणि सहआरोपी समीर शिनोळकर या दोघांना, लाचखोरी प्रकरणी गडहिंग्लज इथल्या विशेष न्यायालयानं,
तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तपासणी नाक्यावर, ट्रकवर
कारवाई करू नये यासाठी शिंदे यांनी दरमहा १० हजार रुपये लाच मागितली होती. एप्रिल २०१५
मध्ये सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती.
****
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधील कापसाच्या गाठी ठेवलेल्या
गोदामाला आज सकाळी आग लागली. कापसाच्या गाठी जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा
अंदाज वर्तवण्यात येत आहे.
****
मलेशिया इथल्या एपोह इथं सूरू असलेल्या सुलतान अझलन शाह कप
हॉकी स्पर्धेतल्या अखेरच्या साखळी सामन्यात आज भारतानं पोलंडला १०-० च्या फरकानं हरवलं.
भारतीय संघ, यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला असून उद्या भारताची अंतिम लढत दक्षिण
कोरिया संघासोबत होणार आहे
****
No comments:
Post a Comment