Sunday, 31 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 बिहारमध्ये, छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्स्प्रेसचे १३ डब्बे रुळावरुन घसरले. सारन जिल्ह्यातल्या गौतमेश रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ही घटना घडली. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. छपरा-गोरखपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक तूर्तास थांबविण्यात आली असून, गाड्यांना पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशातल्या अमेठीसह केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि दक्षिणेकडील राज्यांतल्या नेत्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचं अँटोनी म्हणाले.

****



 जम्मू-काश्मीर मध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, राजौरी जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा भागात उखळी तोफांचा मारा आणि गोळीबारही केला. भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं. कालही पाकीस्तानी सैन्यानं पूंछ जिल्ह्याच्या मानकोटे आणि कृष्णा खोऱ्यात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक नागरिक जखमी झाला होता.

****



 जम्मू -काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एक वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी जम्मूला पाठवण्यात आलं आहे.

****



 महाराष्ट्र - कर्नाटक सीमेला जोडणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी इथल्या कोगनोळी नाक्यावर पोलिसांनी काल रात्री संयुक्त नाकेबंदी केली होती. यात पकडण्यात आलेल्या एका संशयिताकडून पाच लाख रुपये रोख आणि साठ हजार रुपये किमतीची दीड किलो चांदी जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 परभणी इथले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा दगडानं ठेचून खून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त ते जायकवाडी परिसरात आले असता मारेकऱ्यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून, डोक्यात दगडानं वार केले. यात त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हल्ल्यानंतर मारेकरी स्वतः नवामोंढा पोलीस ठाण्यात हजर झाले. रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.

****



 कवी गणेश घुले यांच्या 'सुंदर माझी शाळा' बालकविता संग्रहाला अमरावती इथल्या 'सुदाम सावरकर राज्यस्तरीय उल्लेखनीय साहित्यकृती पुरस्कारा'नं गौरवण्यात आलं आहे. अमरावती इथं झालेल्या कार्यक्रमात आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****



 निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद शहर पोलिस दलानं आज सकाळी शहरातल्या संवेदनशील भागातून पथसंचलन केलं. यात सशस्त्र पोलिस जवानांसह दंगाकाबू पथक, शीघ्र कृती दलाचे जवानही सहभागी झाले होते.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबादमध्ये नागसेनवनातल्या आजी - माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित नागसेन फेस्टिवलचा आज समारोप होत आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलचं उद्घाटन पुण्यातल्या यशदाचे संशोधन अधिकारी डॉक्टर बबन जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रम करण्यात आलं.

****



 नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेंसल सोबत होणार आहे. काल झालेल्या सामन्यात ॲक्सेंसलनं पारुपल्ली कश्यपचा ११-१२, १७-२१ असा पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर किदंबी श्रीकांतनं चीनच्या हुआन युझियांगचा १४-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...